औपचारिक निवड

0
268

अमेरिकेत गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या ‘इलेक्टोरल कॉलेज’ ने अखेर ज्यो बायडन यांची त्या देशाचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी औपचारिक निवड केली. आता येत्या नववर्षी सहा जानेवारीला मतमोजणीचा औपचारिक सोपस्कार पार पडल्यानंतर वीस जानेवारीला बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील हे आता स्पष्ट झाले आहे.
बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीनंतरही विविध न्यायालयांमध्ये त्यांच्या निवडीलाच कायदेशीर आव्हान देत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वाटेमध्ये काटे पेरले होते, ते या औपचारिक निवडीनंतर यापुढे कुचकामी ठरतील. ट्रम्प आणि समर्थकांनी ठिकठिकाणच्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल करून बायडन यांची निवड कशी बेकायदेशीर आहे हे ठासून सांगण्याचा जोरदार प्रयत्न आजवर केला, परंतु ठिकठिकाणी बायडन यांच्याच बाजूने कौल गेला आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील बायडनविरोधकांची याचिका फेटाळून लावून निवडणूक वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने तो सारा आता इतिहास झाला आहे.
बायडन यांनी जी ‘पान उलटण्या’ची भाषा केली, तिला ही सारी पार्श्वभूमी कारणीभूत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेलाच धोक्यात आणणारी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, त्यातून डेमोक्रॅटस्‌‌ आणि रिपब्लिकन यांच्यामध्ये जी कमालीची कटुता आली, तो सगळा इतिहास मागे सोडून इतिहासाचे पान उलटवून पुढे जाण्याचा आपला मनोदय बायडन यांनी व्यक्त केला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या नव्या प्रमुखाने ‘आम्ही – तुम्ही’च्या क्षुद्र विचारांच्या चौकटींनी स्वतःला जखडून ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच झाले गेले विसरून पुढे जाण्यात केवळ अमेरिकेचेच नव्हे, तर जगाचे हित सामावलेले आहे, कारण आजच्या घडीस तर जागतिक व्यवहाराचे धागेदोरे अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वाशी घट्ट जोडले गेलेले आहेत. मग ती अर्थव्यवस्था असो, व्यापार असो, संरक्षण व्यवहार असो वा विज्ञान – तंत्रज्ञान असो. जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या देशाच्या वाटचालीमध्ये अमेरिकेची त्या देशासंदर्भातील भूमिका महत्त्वाची ठरत असते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये तर तिला अपरिमित महत्त्व आलेले आहे. त्यामुळे महासत्ता अमेरिकेमध्ये जर राजकीय स्थैर्य असेल, तिची लोकशाही बळकट असेल, तरच जगामध्ये शांतता नांदू शकते ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द ‘अमेरिका फर्स्ट’ चा नारा देत सुरू झाली खरी, परंतु ती एवढी वादळी ठरली की जागतिक उलथापालथींना ती कारण ठरते की काय अशा वळणावर ती एव्हाना येऊन ठेपलेली होती. इराणसंदर्भातील त्यांची भूमिका असो, ओबामा प्रशासनाने टाकलेल्या पावलांपासून फारकत घेणे असो, जागतिक व्यापारासंदर्भात घेतलेली यू टर्न असो, पॅरिस हवामान करारातून बाहेर पडणे असो किंवा स्थलांतरितांचा प्रश्न असो, प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या आधीच्या सरकारचे निर्णय उलथवून टाकण्याच्या नादामध्ये त्याचे जागतिक परिणाम काय संभवतात याची फिकीरही ट्रम्प यांना दिसून येत नव्हती. परंतु प्रगतीशील अमेरिकी जनतेने परंपरेनुसार दोन कार्यकाल न देता, एकाच कार्यकालामध्ये ट्रम्प यांची राजवट उलथवण्याची ऐतिहासिक कामगिरी करून बायडन यांच्या रूपाने एका नव्या व्यक्तीच्या – नव्हे वृत्तीच्या हाती आपल्या देशाचा राजदंड आता सोपवलेला आहे. ‘‘मी सर्व अमेरिकनांचा राष्ट्राध्यक्ष असेन’’ असे जेव्हा बायडन म्हणतात तेव्हा त्यामध्ये दिसून येणारी सर्वसमावेशकता आश्वस्त करणारी ठरते.
बायडन यांनी येत्या जानेवारीत सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर आपले सर्वोच्च प्राधान्य कोणकोणत्या गोष्टींना राहील त्याचा लेखाजोखा सादर केलाच आहे. सध्या संपूर्ण जगाप्रमाणेच अमेरिकेलाही कोरोनाने ग्रासले आहे. त्याचा तडाखा अर्थव्यवस्थेला बसला आहे. बेरोजगारी उफाळून वर आलेली आहे. त्यामुळे आपण सत्तासूत्रे हाती घेताच सर्वांत प्रथम कोविडसंदर्भात कृतिदलाद्वारे परिस्थिती सामान्य करण्यास आपले प्राधान्य राहील असे बायडन यांनी घोषित केलेले आहे. पॅरिस हवामान करारामध्ये अमेरिका पुन्हा भागिदारी घेणार आहे, व्यापारी नीतीचा फेरआढावा घेणार आहे, ट्रम्प यांनी वेगळे वळण दिलेल्या मुत्सद्देगिरीच्या धोरणांना पुन्हा तपासणार आहेत. अर्थात हे सर्व करण्यासाठी अमेरिकी कॉंग्रेसचे सहकार्य त्यांना लागेल, परंतु पुन्हा एकवार एक नवे पर्व अमेरिकेमध्ये येऊ घातले आहे आणि त्याचे भले बुरे परिणाम आपल्यावरही होणार आहेत आणि भारतानेही या बदललेल्या परिस्थितीचा साकल्याने विचार करून आपली भूमिका ठरवावी लागेल, दिशा आखावी लागेल याची चाहुल बायडन यांच्या निवडीवरील कालच्या शिक्कामोर्तबाने दिलेली आहे.