यापुढे १३ डिसेंबर दरवर्षी पिंटो हुतात्मा दिन पाळणार

0
203

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

यापुढे दरवर्षी १३ डिसेंबर हा दिवस गोवा सरकार पिंटो हुतात्मा दिन म्हणून पाळणार आहे, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल पणजी येथे पिंटो बंडातील हुतात्म्यांना साल्वादोर द सौझा उद्यानातील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र ठेवून श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
यापुढे राज्य सरकार १३ डिसेंबर हा दिवस पिंटो हुतात्मा दिन म्हणून अधिकृतरित्या पाळणार असून या बंडातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे सावंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेर्रात, पणजीचे महापौर उदय मडकईकर, महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, इतिहासकार व पिंटो बंडावर पुस्तक लिहिलेल्या व हुतात्मा झालेल्या पिंटो घराण्यातील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाच्या वंशज सेल्सा पिंटो, नगरसेवक सुरैय्या पिंटो, अन्य नगरसेवक आदी मंडळी यावेळी हजर होती.

२३३ वा स्मृतीदिन
पिंटो बंडाचा हा २३३ वा स्मृतीदिन आहे. १७८७ या वर्षी गुप्तपणे आखण्यात आलेले हे बंड उघडकीस आल्यानंतर त्यात सहभागी झालेल्या ४६ स्वातंत्र्यसैनिकांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यापैकी १५ जणांना १३ डिसेंबर १७८८ या दिवशी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या १५ जणांना अत्यंत क्रूररित्या कापून मारण्यात आले. त्यांची शिरे धडावेगळी करण्यात आली. हात-पाय कापण्यात आले. नंतर त्यांच्या शरिराचे कापलेले अवयव भर चौकात लटकवण्यात आले.

खटल्यातील अन्य आरोपी
स्वातंत्र्यसैनिकांपैकी ५ जणांना तडिपार करण्यात आले. अन्य ५ जणांना सश्रम कामाची शिक्षा ठोठावण्यात आली. १५ धर्मगुरुंना माफ करण्यात आले होते. मात्र, त्यांना पोर्तुगालला तुरुंगात डांबण्यात आले. कित्येक वर्षांनंतर त्यांची सुटका झाली.