गोवा सरकारने १९ डिसेंबर रोजीच्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाच्या निविदेत भ्रष्टाचार करता येईल अशा प्रकारे सदर निविदा काढली असल्याचा आरोप काल कॉंग्रेस पक्षाने केला.
दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी त्यासंबंधी केलेल्या आरोपात भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या सुचनेनुसार एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला या कामाचे कंत्राट देण्याचे यापूर्वीच ठरले असल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या निविदेत एकंदर कामाची अंदाजे रक्कमच नमूद करण्यात आलेली नाही. वित्त खात्याने अंदाजे रक्कम नसताना सदर निविदेला मान्यता कशी दिली हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही डायस यांनी केली आहे.
या निविदेसाठी केवळ पर्यटन खात्याकडे नोंदणी झालेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना सहभागी होता येणार असल्याची अट घालण्यात आलेली आहे. इफ्फीसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहभागी होणार्या कंपन्यांना यात भाग घेता येणार नसल्याचे सांगून अशा कंपन्यांना बाहेर ठेवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे, असेही डायस यांनी म्हटले आहे. सदर निविदा तसेच तांत्रिक, आर्थिक बोली सादर करण्याची तारीख मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२० पासून असून त्याच दिवशी सर्व कंपन्यांना कलात्मक सादरीकरण करण्याची अट निविदेत आहे. एकाच दिवसात या सर्व गोष्टी कशा काय पूर्ण होऊ शकतात, असा प्रश्न डायस यांनी केला आहे.
सरकार आता सदर कंपनीला कमी रकमेचे कंत्राट देण्याची शक्यता असून कालांतराने अतिरिक्त कामाच्या नावे आडमार्गाने सर्व रक्कम फेडल्याचा प्रयत्न असू शकेल, अशी शंका डायस यांनी व्यक्त केली आहे.