जिल्हा पंचायतींसाठी आज मतदान

0
258

>> ४८ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात, सर्वच पक्षांकडून विजयाचा दावा

सत्ताधारी भाजप तसेच प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेली जिल्हा पंचायत निवडणूक आज शनिवार दि. १२ रोजी होत असून आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. राज्यातील उत्तर व दक्षिण जिल्हा अशा दोन पंचायतींच्या ४८ जागांसाठी आज हे मतदान होणार आहे.

काल शुक्रवारी या निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू होती. ४८ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात असून ७ लाख ९१ हजार ८१४ मतदार या २०० उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. भाजप ४८ मतदारसंघापैकी ४१ जागा लढवत आहे. भाजप उत्तर गोव्यातील सर्व म्हणजे २५ जागा लढवीत असून दक्षिणेत मात्र गोव्यातील सर्व म्हणजे २५ जागा लढवीत असून. दक्षिणेत मात्र २३ मतदारसंघांपैकी १६ जागा लढवीत आहे. या उलट कॉंग्रेसने उत्तर जिल्हा पंचायतीत २१ व दक्षिण जिल्हा पंचायतीत १६ उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या दोन्हीकडच्या मिळून एकूण उमेदवारांची संख्या ही ३७ एवढी आहे.

मगो पक्ष १७ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ७ जागांवर निवडणूक लढवीत आहे. तर आम आदमी पक्षाने आपले २० उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. भाजप तसेच कॉंगे्रस पक्षाने ज्या मतदारसंघात त्यांचे उमेदवार नाहीत अशा मतदारसंघांत प्रबळ अशा उमेदवारांना आपला पाठिंबा दिलेला आहे. उत्तर गोव्यात १०४ तर दक्षिण गोव्यात ९६ उमेदवार रिंगणात आहेत.

११८७ मतदान केंद्रे
या निवडणुकीसाठी ११८७ मतदान केंद्रे असून आज सकाळी ८ वाजल्यापासून या केंद्रांवर मतदान सुरू होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मतदान केंद्रे मतदानासाठी सुसज्ज बनवण्याचे काम काल शुक्रवारी चालू होते. मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती काल पोलीस सूत्रांनी दिली.

भाजपला घवघवीत
यश मिळणार : मुख्यमंत्री

उत्तर व दक्षिण जिल्हा या दोन्ही पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. भाजप सरकारने केलेल्या कार्यावर व विशेष करून भाजप सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजनांवर जनता खुष असल्याचे सावंत म्हणाले. आपण सर्व मतदारसंघांना भेटी दिलेल्या असून लोकांकडून भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मतदार कॉंग्रेसला मतदान
करतील : दिगंबर कामत

दरम्यान, काल जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस आमदार दिगंबर कामत म्हणाले की जनता या निवडणुकीत कॉंग्रेसच्या पाठीशी राहील. जनता भाजप सरकारवर नाराज असल्याचा दावाही त्यांनी केला. मतदारांनी मोठ्या संख्येने कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मगोला भरघोस पाठिंबा : सुदिन
मगो नेते सुदिन ढवळीकर म्हणाले की मतदारांकडून मगो पक्षाला भरघोस पाठिंबा मिळत असून शनिवारी होत असलेल्या मतदानाच्या वेळीही मतदार मोठ्या संख्येने मगो उमेदवारांना मते देतील.

आम आदमी पक्षाला
वाढते समर्थन : तिळवे

जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाला वाढता पाठिंबा मिळाला असून पक्षाचा विजय निश्‍चित असल्याचे पक्षाचे नेते ऍड. सुरेल तिळवे यांनी म्हटले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार्‍या दोघा उमेदवारांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगून धारगळ येथील उमेदवार पुंडलीक धारगळकर व कोलवाळ येथील उमेदवार उमेश कवठणकर हे ते उमेदवार असल्याचे तिळवे यांनी म्हटले आहे.
आपने ताळगांवमधील अपक्ष उमेदवार सेसील रॉड्रिग्ज व दवर्ली येथील अपक्ष उमेदवार अब्दुल कादिर शेख यांना पाठिंबा दिला असल्याचेही आपने स्पष्ट केले आहे.

सांकवाळमधून भाजप
उमेदवार विजयी

दरम्यान, सांकवाळ मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार अनिता थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आज शनिवारी मतदानादिवशी सांकवाळ मतदारसंघात मतदान होणार नाही.

मुख्यमंत्री सावंत करणार
कोठंबी-पाळीत मतदान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज शनिवारी सकाळी ९ वा. पाळी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोठंबी पाळी येथील सरकारी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.
दरम्यान, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे.