सनईचे सूर झाले बेसूर …

0
438
  • मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर

अशा मिनी लग्नसमारंभामुळे सर्वांचा विरस झालेला असला तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या इंटरनेटच्या जमान्यातल्या ‘गुगल मीट’ सिस्टममुळे घरबसल्या सर्वांना लग्नसमारंभ बघण्याचीच नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातून ‘लॉग इन’ करून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्याची सुविधाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे दुरूनही आपल्या वधूवरांना आशीर्वाद देऊन दुधाची तहान ताकावर भागवता येते, हेही नसे थोडके!

विवाह हा एक धर्मसंस्कार आणि जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. जीवनाची प्रामुख्याने दोन भागात विभागणी केल्यास विवाहपूर्व आणि विवाहोत्तर जीवन असं म्हणता येईल. विवाहानंतर उपवराची पूर्वीची स्वैर- स्वच्छंदी- बेजबाबदार वृत्ती, जबाबदारीत आणि कर्तव्याच्या जाणिवेत परिवर्तित होते, नव्हे व्हावंच लागतं. मुलांचं शिक्षण योग्य वयात संपून ती कर्माने, अर्थाने सक्षम झाली की त्यांना चतुर्भुज करण्याकडे सर्व जन्मदात्यांचा कल असतो. त्या दृष्टीने त्यांचं आणि उपवराचंही संशोधन सुरू होतं. मुलांना एकदा त्यांचा जीवनसाथी मिळाला की आई-बाप आपल्या मोठ्या कर्तव्यातून मुक्त झाल्यासारखे वाटतात आणि ते मोकळा श्‍वास घेतात. अशा वेळी त्यांच्या आनंदाला पारावारच उरत नाही. कायद्याने लग्न रजिस्टर नोंदणी करून पक्के केले तरी सग्यासोयर्‍यांच्या, मित्रमंडळींच्या, परिचितांच्या साक्षीने वधू-वरांच्या मस्तकावर अक्षता आणि आशीर्वादाचे हात पडल्याशिवाय लग्नसमारंभाला लग्नाचं स्वरूप येत नाही. वैदिक पद्धतीने लग्न केल्यासच ते पार पाडल्याचं खरं समाधान मिळतं. फार पुरातन काळापासून ही पारंपरिक लग्नपद्धती प्रचलित आहे.
लग्नाचं निमंत्रण आलं की वधू-वराला आशीर्वाद देणे या हेतूबरोबर अनेकांच्या भेटी घेणे हा एक अंतस्थ हेतू असतो. कधीही भेट होऊ न शकणार्‍या आपल्या दूरवरच्या नातलगांना किंवा मित्र-मैत्रिणींना भेटण्याची आस बाळगून लग्नमंडपात आवर्जून हजेरी लावणारे अनेकजण असतात. अनपेक्षितपणे कितीतरी परिचितांची भेट होऊन मिळालेल्या आनंदाला तोड नसते. लग्नमंडप हे एकमेव अनपेक्षित भेटींचं स्थळ असतं. त्यामुळे संसारातील अनेक अडचणींवर तोडगा काढून लग्नाला न चुकता हजेरी लावणे हा एक प्रघातच आहे. निमंत्रितांनी कारणं सांगून लग्न चुकवलं तर यजमानांच्या रुसव्या-फुगव्याला ते निमंत्रणच असतं.

तर ही प्रस्तावना देण्याचे कारण हेच की, नेमकं लग्नाच्या हंगामकाळात कोरोना नावाच्या असुराने हैदोस घालून सर्वांना घराच्या कडी-कुलुपात बंद करून टाकले. अशा परिस्थितीत लग्न करावीत तरी कशी असा यक्षप्रश्‍न वाङ्‌निश्‍चय करून ठेवलेल्यांसमोर उभा ठाकला. लॉकडाउन उठवल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला खरा. परंतु लग्नसमारंभ मनवण्यावर अनेक मर्यादा पडल्या. कायदेशीर बंधनं टाकली आणि त्यानुसार लग्नाचा चेहरामोहरा पूर्णतया बदलला. पूर्वनियोजित योजनांचा विचका झाला. कसा ते पाहा.

लग्नमंडपात किंवा लग्नाच्या हॉलमध्ये शुभारंभ केला जायचा तो सनईच्या मधुर सुरांनी. आता या कोरोना नावाच्या असुराने सारे सूरच बेसूर करून टाकले. गुलाबपाणी, अत्तर यांचा दरवळ हॉलभर दरवळे. वातावरण प्रसन्न, सुगंधित होई. आता..? शेतामध्ये जंतुनाशकाची जशी फवारणी केली जाते तशी हॉलमध्ये पाहुणे पोचण्याच्या तास-दोन तास आधी सॅनिटायझरची फवारणी केली जाते. पाहुण्यांचं स्वागत गुलाब, अत्तर, सुगंधित टिश्युपेपर देऊन केलं जाई. आता पाहुण्यांचे पाय उंबरठ्याला लागले रे लागले की त्यांच्या शरीर-तापमानाची तपासणी केली जाते. तापमान नॉर्मल असेल तर ठीक. अन्यथा उलट पावली परत. असा अवमान या कोरोनाकाळात करावा लागत आहे. यात दोष कुणाचाच नाही. हे प्रसारविरोधी उपाय आहेत एवढा समंजसपणा सर्वांमध्ये नक्कीच असतो. सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे, हात सॅनिटाइझ करणे या प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे आवश्यक ठरते.

आता जरा लग्नाच्या हॉलमध्ये डोकावू. शरीर तापमान तपासणीत पास झालेल्यांना हॉलमध्ये प्रवेश मिळतो. घामाघूम झालेल्या पाहुण्यांना तृष्णाशामक म्हणून सरबत, कोक, लिम्का, कोकम सरबत अशा विविध थंडगार पेयांपैकी आवडीचं पेय निवडून त्याचा आस्वाद घेता येईल ही आशा सपशेल फोल ठरतेय. हो. कारण या शीतपेयांची जागा आता पुदिना, आलं, मिरे, तुळशी यांचा इम्युनिटीबुस्टर काढा ऍपेटायझर म्हणून सक्तीने पाहुण्यांच्या गळी उतरवला जातोय (बिच्चारे!). पांढर्‍या युनिफॉर्ममध्ये स्टार्टर घेऊन हॉलभर फिरणार्‍या वेटर्सची जागा आता हाताला ग्लोव्ह्ज, फेसशील्ड, कॅप अशा पोशाखातल्या सर्व्हिस बॉईजने घेतलेली दिसते. हॉलच्या लग्नमंचावर पी.पी.ई. (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) लपेटून मंत्रपठण करणारे भटजी आहेत, गिर्यारोहक आहेत की डॉक्टर्स?… हा लग्नाचा हॉल आहे की इस्पितळ अशा संभ्रमात कोणीही पडल्यास त्यात नवल नाही. विनोदाचा भाग सोडा, परंतु खरोखर या कोरोनाने दिलेल्या मास्कच्या भेटीमुळे लग्नस्थळाचं आकर्षक गोड स्वरूप कुरूप करून टाकलंय असंच म्हणावसं वाटतं.

हळदीसमारंभाला उपस्थित सवाष्णींना संसाराला उपयोगी पडतील अशा वाटल्या जाणार्‍या वस्तूंच्या बदल्यात आता जरीकाठाचे मास्क आणि काढ्याच्या मसाल्यांची पाकिटंही वाटण्याची तरकीब कोणाच्या सुपीक डोक्यात पिकली हे न कळे! परंतु असाही अजब प्रकार या कोरोनाने दाखवला. ही गिफ्ट पाहून कपाळावर आठ्या चढलेल्या महिला त्यातही आपल्या भरजरी साडीवर मॅचिंग जाईल असा मास्क मिळवण्यासाठी समोर आलेल्या ताटात हात घालून मास्कसाठी झटापट करताना दिसतात. आहे की नाही गंमत?
आता सर्वांत मोठी पंचाईत म्हणजे वाट्याला आलेल्या पंचवीस जणांच्या यादीत कुणाकुणाला घ्यावे आणि कुणाला सोडावे हा मोठा बिकट प्रश्‍न वधू-वराच्या पक्षांना संकटात टाकणारा आहे. ‘माझ्याहून यांना ‘ती’ जास्त जवळची का?’ हा अनिमंत्रित नातेवाइकांच्या मनात वळवळणारा किडा रुसव्या- फुगव्यांना आमंत्रण देऊन नात्यात कटुता निर्माण करू शकतो. जुने मित्रमैत्रीणी, बुजुर्ग मंडळींना वगैरे लग्नाच्या निमित्ताने भेटण्याची मनातली आस कोमेजून जाते. सामाजिक अंतर ठेवण्याच्या बंधनामुळे हस्तांदोलन आणि कडकडून पडणार्‍या गळामिठीवर खीळ बसल्याने केवळ दृष्टीभेटीतच सुख मानणे क्रमप्राप्त ठरते. लग्नात आपलं सौंदर्य खुलवून मिरवण्याची युवतींचीच नाही तर प्रौढ महिलांचीही स्त्रीसुलभ उमेद मावळल्याने सर्वजणी नाउमेद झालेल्या आहेत. कारण मास्कच्या मागे दडलेला तो मुखवटा आता कुणाला दिसणार आहे? परंतु खास लग्नात वापरण्यासाठी जे अलंकृत मास्क्‌स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते पाहून हौसेला तोटा नाही हे पटून गेले. रंगवलेल्या ओठांचे आणि नथ-चमक्या लटकवलेल्या मास्कच्या आयडियाची कल्पना अजबच बुवा!

कोरोनाच्या अकस्मात झालेल्या हल्ल्यामुळे, पूर्वनियोजित योजनांवर पाणी तर पडलेलं आहेच. शिवाय लग्नाच्या हॉलसाठी भरलेला, वधू-वराच्या वर्‍हाडी मंडळींच्या निवासासाठी बुक केलेल्या हॉटेलची भरलेली आगाऊ रक्कम बुडीत खात्यात जमा झाली. छापलेल्या शेकडो लग्नपत्रिकांपैकी फक्त पंचवीस पत्रिकांचा उपयोग होणार आहे. कोरोनापूर्व काळात केलेल्या या काही गोष्टी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं अतोनात नुकसान करून गेलेल्या आहेत. सोन्याचे भाव आज गगनाला भिडले आहेत. कोरोनापूर्व काळात ऑर्डर केलेले दागिने आताच्या नव्या दरात बनवून घेणे वधू-वरपक्षांच्या आर्थिक कुवतीवर कुर्‍हाड बसवणारे आहे. पूर्वीच्या भावात होणार्‍या चार बांगड्यांच्या जागी आजच्या भावात दोनच होऊ शकतात. तसंच पूर्वी ऑर्डर केलेले दागिने पूर्वीच्या दरात बनवून देणे सराफांना परवडणारे नाही. अशी मोठी पंचाईत उभी झालेली आहे. ठरवल्याप्रमाणे वधूपक्षाने वधूच्या अंगावर दागिने चढवले नाहीत तर कदाचित वरपक्षाचा रुसवा होऊ शकतो. फक्त एक गोष्ट मात्र खरी की या कोरोनाकाळात, पूर्वी लग्नांवर होणारा भरमसाठ खर्च आपसूकच आटोक्यात येईल. लग्नं स्वस्तात पार पडतील. केटरर्सचा आणि बाकीचा खर्च घटल्यामुळे वाचलेल्या पैशाचा विनियोग चांगल्या हेतूसाठी यजमानांना करता येणे शक्य आहे. सामाजिक कार्य करणार्‍या संस्था, वृद्धाश्रम, ग्रंथालयं अशा ठिकाणी किंवा वधूवरांच्या नवीन संसारासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टींसाठी वापरता येईल.

कॅटरर्स, फोटोग्राफर्ससारख्या लग्नाच्या उद्योजकांच्या धंद्यावरही फटका बसलेला आहे. केटरर्सना मिळणार्‍या ऑर्डर्स कमी झाल्या. उपस्थितांच्या संख्येवर फोटो शूटिंग अवलंबून असल्याने फोटोग्राफर्सच्या धंद्यावरही परिणाम झालेला दिसतो. परंतु आलेल्या संकटातून मार्ग नाही काढला तर ते व्यावसायिक कसले?
तेव्हा सद्यःस्थितीत केटरर्सनी कोरोना पॅकेज देण्याची शक्कल लढवली आहे. वेलकम् गिफ्ट म्हणून एक तीन पदरी मास्क, छोटी सॅनिटायझरची कुपी दिली जाते. अत्तर फवारणीऐवजी सॅनिटायझेशन, थर्मल गन आणि ऑक्सीमीटरची सोयही करण्यात आलेली आहे. स्टार्टर्स देण्याऐवजी वेलकम् ड्रिंक म्हणून हळदीचं दूध देण्याचा पर्याय निवडला आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची घोषणा ठरावीक कालावधीत दिली जाते तर धंद्यातली मंदी कशी खंदी करावी हे तेच जाणोत. नुकतंच वाचनात आलं की महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जाहीर केलंय की विवाहासाठी पोलिसांची परवानगी सक्तीची होणार आहे. ही तर लोकांसाठी अतिरिक्त डोकेदुखी. लग्नात विघ्न ती अशी!
कोरोनाच्या भयाने नवविवाहितांच्या मधुचंद्राचे बेत रद्द करावे लागत आहेत. त्याची सावली नवविवाहितांच्या सुहागरातीवर पडल्यामुळे त्यांचा विरस झालाय. सोशल डिस्टंसिंगचा नियम वधूवरांनाही पाळावा लागत असेल तर मात्र मधुर मधुप्राशनाविना खिडकीतून दिसणार्‍या चंद्राकडे पाहात ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ अशा अवस्थेत ‘बीती ना बीताए रैना’ म्हणत बिचार्‍यांना सुहागरात कोरडीच काढावी लागेल.

अशा मिनी लग्नसमारंभामुळे सर्वांचा विरस झालेला असला तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या इंटरनेटच्या जमान्यातल्या ‘गुगल मीट’ सिस्टममुळे घरबसल्या सर्वांना लग्नसमारंभ बघण्याचीच नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातून ‘लॉग इन’ करून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्याची सुविधाही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे दुरूनही आपल्या वधूवरांना आशीर्वाद देऊन दुधाची तहान ताकावर भागवता येते हेही नसे थोडके!
चला तर – कोरोनासाठी ‘क्यों रोना?’ दिस येतील, दिस जातील… या आशेवर ‘आलिया भोगासी….’ म्हणत लस येण्याच्या प्रतीक्षेत राहणं एवढंच आपल्या हाती!