प्रतीक्षा नववर्षाच्या पहाटेची….

0
279
  • सौ. माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

लवकरच कोरोनाचे दुष्टचक्र संपेल, नव्हे आपण आपल्या जिद्दीने ते हद्दपार करणार आहोतच. पण तोपर्यंत नकारात्मकतेच्या जळमटात घुसमटत न राहता जीवनातील अवीट गोडीचा आनंद उपभोगू. येत्या २०२१ नववर्षाच्या नव्या पहाटेची आत्मविश्‍वासाने प्रतीक्षा करू.

२०२० या वर्षाच्या प्रारंभापासून एका कोरोना विषाणूने उच्छाद मांडलेला आहे. कधी कल्पनाही केली नव्हती. या विषाणूचे उगमस्थान ‘वुहान’ या चीनच्या गावात झाले आणि एक एक देश काबीज करीत त्याने भारताचाही पिच्छा सोडला नाही. पूर्ण विश्‍वात कोरोना महामारीचा संचार सुरू झाला. मानवजातीला सळो की पळो करून सोडलं.
आजही मानवजात कोरोना महामारीच्या विळख्यातून मुक्त झालेली नाही. चीनची देणगी कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर मानवी जीवनाची वाटचाल सुरू आहे. वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर विषाणू पोहोचला. आज-उद्या तो संपेल हे निश्‍चित, पण तोपर्यंत सजगता, सावधानी राखणे गरजेचे आहे, हे बहुतांश लोकांना पटले आहे.

मात्र सुरुवातीच्या काळात कोरोना विषयाच्या संभ्रमामुळे भीतिदायक अफवा पसरल्या. मानवाची दिशाभूल झाली. लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा उगीचच अति साठा करणे, सदोदित फेसमास्क चेहर्‍यावर बांधणे हे चालूच होतं.
पण हळूहळू कोरोनाच्या भीतीचं दडपण कमी होत गेलं आणि मानव जागृत झाला, सावरला. या महामारीनं आम्हाला खूप काही शिकवलं. मुख्य म्हणजे आपल्या अफाट अनावश्यक गरजांवर नियंत्रण आलं. उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय लोकात दर वीकएंडला हॉटेलचं खाण्याचं फॅड कमी झालं. सुट्टीत बाहेर फिरायचे, सिनेमे पाहायचे, मेजवान्या झोडायच्या आणि उशिरा मध्यरात्री घरी पोचणं अशा फंड्यात वावरणार्‍या वर्गाला घराचं घरपण कळून आलं.

या काळात नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं. मुलांना सुटी त्यामुळे ऑनलाइन अभ्यासपद्धती. घरी राहून शिक्षणप्रणाली सुरू झाली. पालकांचंही वरचेवर मुलांवर लक्ष राहतं. तसंच बाहेरचं जंक फूड न घेता होम मेड खाना यावर भर देण्यात आला.
पूर्वीच्या काळी बाहेरून आले की हातपाय धुतल्यानंतरच घरात प्रवेश व्हायचा. आजच्या या इन्स्टंटच्या काळात अहो आश्‍चर्यम्! गतकालीन स्मृतीतील कृती प्रत्यक्षात घडताना अनुभवायास मिळताहेत, हा केवढा सकारात्मक बदल म्हणावा!
भाज्या- फळे लगेचच स्वच्छ धुवून घेतली जातात. सॅनिटायझर वा साबणाने वारंवार हात धुतले जातात. स्वच्छता आणि दक्षता याचे भान राखले जाते. कामधंद्याच्या धबडग्यात कुणाला फुरसत मिळत नव्हती. आता घरी एकमेकांशी संवाद साधून आहेत. जे सतत मोबाइलला चिकटलेले होते ते घरकामातही गृहिणींना मदत करत आहेत. परिवारातील सदस्यांकडून मुलांचे होणारे कौतुक, देखभाल संयुक्त कुटुंबपद्धतीची आठवण करून देते. कपाटातील बंदिस्त पुस्तके वाचली जातात. काहींची वाचनाची, लेखनाची हौस पुरी होते आहे. सगळेच घरी असल्याने घराचे गोकुळ बनले आहे. गानप्रेमींच्या ओठावर स्वर उमटू लागले. सामाजिक अंतर राखून योग, आध्यात्मिक पठन, श्रमदान इ.स्तुत्य उपक्रम हौशी मंडळींकडून राबवलेले दिसून येतात.

वाहनांची वर्दळ नसल्याने हवेतील प्रदूषण कमी झाले. सकाळी सकाळी निसर्गातील भावतरंगांनी मन भावुक होतं. चिमण्यांची चिवचिव स्पष्ट ऐकू येते. नोकरीनिमित्त निघण्याची घाई नसल्याने सकाळचे मनोहारी दृश्य पाहण्यात आनंदी सकाळ अनुभवता येते. जीवनात नवचैतन्याची अनुभूती येते. ध्यान- धारणा उत्तम होते. ताजं- तवानं वाटतं. जगणे ही एक कला आहे. ‘जगायचं कसं कण्हत कण्हत की हसत हसत…’ कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्ती स्मरतात.
जीवन हे क्षणभंगूर आहे.. प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे. स्वतः सुगंधी राहून इतरांनाही सुगंधाने सुगंधित करायचं. शेवटी जीवन हे व्यक्तीनुरूप स्वभावावर अवलंबून असतं.
या महामारी संक्रमणापासून सुरक्षित कसं राहायचं आणि संक्रमित झाल्यास उपाययोजना कोणती याचं ज्ञान शासनाद्वारे, विविध माध्यमांद्वारे झालं आहे, होत आहे. ज्ञान हे महत्त्वाचे साधन असून ते जीवनाचा स्तर बदलू शकते.

कोरोना पसरू नये म्हणून सॅनिटायझर, वाफ घेणे, गुळण्या करणे, काढा घेणे या गोष्टी आज दैनंदिन जीवनात आवश्यक ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक अंतराची जाण, मास्कचा वापर, आहारनियमन, प्रतिबंधात्मक उपाय हे आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडले आहेत.
कोरोना संक्रमित झाल्यास कोणत्या चाचण्या करायच्या- उदा. रॅपिड टेस्ट, स्वॅब टेस्ट डॉक्टरी सल्ल्यानुसार करून घेणं, ऑक्सीजन पातळी, तापमान तपासण्‌ं याची जाण सामान्य माणसालाही झाली आहे. त्यामुळे कोरोनासदृश परिस्थितीत न घाबरता त्याच्याशी सामना करत जगणे याला पर्याय नाही. कोण जगेल कोण टिकेल? अशा या संकट काळात माणसं माणसांसाठी मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा मंत्र जपत आहेत. खरंच, कोरोनाने माणुसकी शिकवली.
सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात महामारीच्या काळात सगळे व्यवहार ठप्प झाले होते. लोकांना बाहेर पडणं मुश्कील होत होतं. अशा वेळी रोजचा लागणारा किराणामाल कोठून आणायचा.. हा एक गंभीर प्रश्‍न सर्वांसमोर उभा होता. अशा वेळी काही धाडसी स्वयंसेवकांनी जबाबदारीने किराणामालाचे कीट्‌स लोकांच्या घरी पोहोचवले. निःस्वार्थी सेवाकार्य केलं. कोरोनामुळे निःस्वार्थी, निष्काम मनोवृत्ती म्हणजे काय असते याचाही प्रत्यय आणून दिला. सामाजिक बांधिलकीचा विलक्षण भाव निर्माण झाला. कुठलाही आकस न ठेवता एकमेकांना मदत करण्याची वृत्ती बळावली. खरं तर कुणीच कुणाला ओळखत नव्हतं. पण या परिस्थितीत एक एक घर जोडलं जाऊ लागलं. गंभीर परिस्थितीत माणसातील माणूस जागा झाला ही तर दिव्यत्वाची प्रचिती. अजूनही ते अविस्मरणीय मंतरलेले दिवस आठवतात.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा विविध ऑनलाइन स्पर्धा सतर्कतेने घेतल्या जात आहेत. लेखनस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बालशिबिर तसेच रांगोळी, आकाशकंदील बनवण्याच्या स्पर्धा वृत्तपत्रातून, व्हॉट्‌सऍपद्वारे माहिती मिळते. ज्ञानरंजनाबरोबर मनोरंजनही होते.
लवकरच कोरोनाचे दुष्टचक्र संपेल, नव्हे आपण आपल्या जिद्दीने ते हद्दपार करणार आहोतच. पण तोपर्यंत नकारात्मकतेच्या जळमटात घुसमटत न राहता जीवनातील अवीट गोडीचा आनंद उपभोगू. येत्या २०२१ नववर्षाच्या नव्या पहाटेची आत्मविश्‍वासाने प्रतीक्षा करू. विघ्नहर्ता आहे. विघ्नविनाशक विघ्न निवारण करेलच, असा श्रद्धाभाव बाळगूया.