रंग देतात बळ जगण्याचे

0
350
  • गौरी भालचंद्र

या जगात जेवढे रंग अस्तित्वात नाहीत तेवढे रंग आहेत माणसांचे आणि ते रंग बदलण्याचा वेग इतका आहे की काय सांगू… पण आपण मात्र आपलं मन स्थिर ठेवलं पाहिजे.

काही फुलं तर अगदी छोट्याशा ठिपक्याएवढी पण त्यांची रंगसंगती पाहावी. पानं, फुलं, त्यांच्या पाकळ्या, त्यांचे आकार… अगदी पाहात राहावसं … हिरव्या मखमलीवर रानफुलांचा सोहळा तर अप्रतिम वाटतो. पाहताना सारं भान हरपून जातं… खरं तर हा ऋतूच मुळी रंगांचा सोहळा! जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वत्र नाना रंगांच्या छटा पसरलेल्या. साधं डोंगराकडे पाहिलं तरी तो तुम्हाला हिरवा, कधी उन्हात चकाकणारा पोपटी, तर कधी निळा-जांभळा भासतो. अनेक रंगांची, आकारांची, वासांची, रसांची सुंदर सुंदर फुले एकाच सुंदर अशा बागेमध्ये एकत्रितपणे पाहायला मिळतात… खुलून दिसतात, त्याचप्रमाणे एका लहान मुलामध्येसुद्धा अनेक रंगछटांचे मिश्रण आढळून येते… मनाला सुखावणारे…

हिरव्या रंगांच्या… हिरवाईलाही किती म्हणून छटा! झाडाच्या उमलू पाहणार्‍या प्रत्येक दलाचा रंग निराळा. हिरवाच; पण त्यातही गडद-फिक्याच्या अनेक जाती. परमेश्वराची ही किमया पाहून मन भारावून जातं अगदी … हिरवा रंग मनाची हिरवाई अधिक गडद करून टवटवीतपणा देतो
आकाशातील रंगांची मोहिनी! अचानक कुठंतरी इंद्रधनूची कमान उमटते.. पाहत राहावीशी वाटणारी…आणि मनाला खूप बरं वाटतं… निळ्याशार ढगांचा खेळ मनाला लोभस वाटतो पाहताना… रोज नव्या ऊर्जेने सूर्य आपली कोवळी किरणं सर्वत्र पसरवत असतो, त्यांचा रंग काही वेगळाच जाणवतो आसमंताकडे पाहताना… छोटी छोटी पाखरं झाडांच्या फांद्यांवर बसून मंजूळ गीत गात असतात, त्यांचा गोडवा सुखावून जातो… जगण्याला नवी ऊर्मी नवी ऊर्जा मिळत असते… त्यांच्या सान्निध्यात … !
पिवळा रंग सोनेरी झळाळी देऊन मनाची श्रीमंती वाढवतो. .. पांढरा रंग मनाला प्रकाशमान करून नवचैतन्य देतो ..रंगांना पाहताना… जीवनाचे रंग शोधता शोधता जगण्यातले रंगही खुलवत जायचे…
या जगात जेवढे रंग अस्तित्वात नाहीत तेवढे रंग आहेत माणसांचे आणि ते रंग बदलण्याचा वेग इतका आहे की काय सांगू… पण आपण मात्र आपलं मन स्थिर ठेवलं पाहिजे असं वाटतं मला … मीपणा सोडून इतरांना समजून घेण्याची गरज आहे. एक वाक्य बोलताना दहा वेळा विचार करावा. म्हणजेच आपल्यासोबत इतरांच्या मनालाही जपता येते… सहजपणे