>> शिक्षण खात्याकडून स्पष्ट
एखाद्या विद्यालयातील विद्यार्थी अथवा शिक्षकाला जर कोरोनाचा संसर्ग झाला तर विद्यालय बंद करावे की काय त्यासंबंधीचा निर्णय सदर विद्यालयाचे व्यवस्थापन घेऊ शकते, असे काल शिक्षण खात्याने स्पष्ट केले.
राज्यात दहावी व बारावी इयत्तेचे वर्ग सुरू झाल्यापासून उसगाव येथील सर्वोदय हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय व कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने काल वरील स्पष्टीकरण केले.
दरम्यान राज्यात लवकरच नववी व अकरावी इयत्तेचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत, असे वृत्त असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की आम्ही नववी व अकरावी इयत्तेचे वर्ग सुरू करण्यास कुणालाही परवानगी दिलेली नाही.
सर्वोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपले दहावी तसेच बारावी इयत्तेचे वर्ग आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुष्टिफंड विद्यालयाने बुधवारी आपले वर्ग बंद ठेवले. तसेच काल गुरूवारी विद्यालयात तसेच विद्यालय प्रांगणात सॅनिटायझिंगचे काम हाती घेतली. सोमवारपासून त्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. तोपर्यंत शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घेण्यास सांगितले आहे.
नॅशनल स्टुण्डस युनियन ऑफ इंडियाने शिक्षण संचालकाची भेट घेऊन विद्यालयांचे वर्ग तात्काळ बंद करावेत, अशी त्यांच्याकडे मागणी केली.
कुडचडे येथे बारावीचा
विद्यार्थी कोरोनाबाधित
कुडचडे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे सदर उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या विज्ञान शाखेचे वर्ग तात्पुरते स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे.
दरम्यान, सदर विद्यार्थ्याचे वडील काही दिवसांअगोदर कोरोनाबाधित झाले होते. मात्र तरीही सदर विद्यार्थी हायस्कूलमध्ये येत होता. अचानक काल गुरूवारी सदर विद्यार्थी कोरोना संक्रमित झाला. त्यामुळे हायस्कूलच्या व्यवस्थापनाने हायस्कूलचा वर्ग स्थगित करून पुढील काही दिवस ऑनलाइन वर्ग घेणार असल्याचे सांगितले आहे. सदर विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गात आणखी १५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सदर विद्यार्थी बुधवारी वर्गात अनुपस्थित राहिला. त्या विद्यार्थ्याची बुधवारी चाचणी करण्यात आली व गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.