>> निवडणूक आयोगाकडून एसओपी जारी
जिल्हा पंचायतीसाठी मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर काल राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या मतदारांचाही समावेश आहे. ज्या मतदारांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्यांना पीपीई कीट परिधान करून सध्याकाळी ४ ते ५ या मतदानासाठीच्या शेवटच्या तासाला मतदान करता येईल, असे आयोगाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वातून स्पष्ट केले आहे.
मतदान करण्यासाठी जाणारे मतदार तसेच ड्युटीवरील निवडणूक अधिकारी यांना मास्क परिधान करावे लागेल. तसेच हातांसाठी सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. तसेच सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच थर्मल स्कॅनिंगचही अवलंब करावा लागेल. मतदान केंद्रातील सर्वांनाच खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड व नाक रूमाल अथवा टिश्यू पेपरने झाकावे लागेल. बीएलओना दर एका मतदान केंद्रावर कोरोना मतदारांनी ओळखावे लागेल. त्यानुसार त्यांना पीपीई कीट व हातमोजे देण्यात येतील. कोरोना रुग्णांना मतदान केंद्रावर आपला ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. राज्यात सध्याच्या रुग्णांची संख्या १३०० आहे. तर एकूण मतदारांचा आकडा हा ७.१९ लाख एवढा आहे.
मतदानासाठी येणार्या सर्व मतदारांची थर्मल गनने तापमानाची तपासणी करण्यात येईल. जर मतदानाचे तापमान जास्त असेल तर त्याला शेडमध्ये १० मिनिटांसाठी बसावे लागेल. त्यानंतर परत एकदा तपासणी करण्यात येईल.