रेल्वेच्या दुपदरीकरणास आमचा पाठिंबा आहे, पण रेल्वेतून कोळशाची वाहतूक करण्यास विरोध असल्याचे मगोपचे नेते सुदिन ढवळीकर पत्रकार परिषदेत म्हणाले. रेल्वे दुपदरीकरणाचा राज्याला फायदा होणार असल्याचा दावा करून या दुपदरीकरणामुळे गोव्यात अन्नधान्याचा पुरवठा वेगाने होईल. तसेच धान्य परराज्यातून गोव्यात आणण्याचा खर्चही कमी होईल. परिणामी अन्नधान्याचे दर खाली येतील असे ढवळीकर म्हणाले.
१२ उमेदवारांचा
विजय निश्चित
जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्षाचे १७ उमेदवार रिंगणात असून त्यातील १२ उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. या १७ पैकी १६ उमेदवारही जिंकू शकतात पण १२ उमेदवार मात्र कोणत्याही परिस्थितीत निश्चितपणे जिंकणार असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
सध्या प्रचारावर बंदी असतानाही भाजपचे नेते तसेच मंत्री प्रचार करत असून विरोधकांना मात्र प्रचार करू दिला जात नसल्याचा आरोप यावेळी ढवळीकर यांनी केला.
जीत आरोलकर हे मगोचे उमेदवार बनल्यापासून सरकारने त्यांची सतावणूक सुरू करत ईडीवाल्यांना त्यांच्यामागे लावल्याचे ढवळीकर म्हणाले. आरोलकर यांच्यावरील खटला न्यायप्रविष्ट असताना सरकार त्यांच्यामागे ईडीवाल्यांचा ससेमिरा कसा काय लावू शकते असा सवाल ढवळीकर यांनी यावेळी केला.
दर निवडणुकीच्यावेळी सरकार मतदारांना खाणी सुरू करण्याचे व नोकर्या देण्याचे आश्वासन देत असल्याचाही आरोप यावेळी ढवळीकर यांनी केला.