आत्मशक्ती वाढवू या योगसाधना – ४८४ अंतरंग योग – ६९

0
316
  • डॉ. सीताकांत घाणेकर

असे हे असुर आपल्यातील प्रत्येकामध्ये आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी शक्ती पाहिजे – हीच ती दैवी सामना करण्याची शक्ती. कारण हे असुर जर असेच वाढत राहिले तर ते त्या व्यक्तीचा नाश करतीलच पण त्याचबरोबर समाजाचा व विश्वाचासुद्धा.

भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला की लक्षात येते – आपले आद्य ऋषी प्रगल्भ बुद्धी असलेले ज्ञानी होते. जीव- जगत- जगदीश यांच्याबद्दल सखोल अभ्यास व चिंतन करीत होते. पींडी ते ब्रह्मांडी… अशा विषयांवर त्यांची विचारसत्रे होत असत. मानवाचा सर्व पैलूत जीवनविकास कसा घडेल यासाठी ते मार्गदर्शन करीत असत जसे- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक त्याचबरोबर सामाजिक पैलूदेखील अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे.
भारताचे सर्व साहित्य बघितले की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते – वेद, उपनिषद, इतर शास्त्रे- योग, व्याकरण… त्याचबरोबर महाकाव्ये – रामायण, महाभारत… भागवत. भगवान स्वतः भगवद् अवतार श्रीकृष्ण यांची श्रीमद्भगवद्गीता तर उच्च कोटीचे तत्त्वज्ञान आहे. जाणकार सांगतात की गीतेत जे ज्ञान आहे ते अन्य कुठेही नाही.

जे कुठेही नाही ते गीतेत आहे. अठरा अध्यायात सर्व तर्‍हेचे योग आहेत. मानवाला एका दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे. स्वतः भगवंताने गायिलेले एक मधुर गीत आहे.
गीता तर श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्राच्या युद्धभूमीवरच सांगितली आहे. हे विश्व हे एक फार मोठे कुरूक्षेत्र आहे, ही समज प्रत्येक सुजाण व्यक्तीला असायला पाहिजे. जे विचार करतात त्या सर्वांना क्षणोक्षणी हाच विचार येतो- मग ते वैयक्तिक, कौटुंबिक अथवा सामाजिक जीवन असू दे. प्रत्येक पैलूमध्ये काही ना काही समस्या आहेतच व असणारच.
अर्थात कारणे अनेक आहेत पण मुख्य कारण आहे विश्‍वातील विविधता- राष्ट्र, वर्ण, रंग, भाषा, संस्कृती इ. त्यामुळे मतभेद असतीलच. त्याशिवाय मानव अत्यंत आत्मकेंद्रित, स्वार्थी झाला आहे. म्हणून लहानमोठ्या लढाया, महायुद्धे चालूच आहेत.

आता सध्या सार्‍या विश्वाला ग्रासणारे एक महायुद्ध म्हणजे ‘कोरोना’चे. सर्व पैलूंनी उपाययोजना, संशोधन चालू आहे. थोड्या प्रमाणात यश मिळते आहे आणि मिळणारही आहे. एक दिवस जग कोरोनामुक्त होणार. पण त्यासाठी किती वेळ लागेल हे कुणीदेखील सांगू शकत नाही. पण तोपर्यंत प्रत्येकाला या युद्धाला सामोरे जाण्यासाठी गरज आहे ती सर्वबाजूंनी शक्तीची आणि अगदी हाच विचार योगसाधनेमध्ये चालू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आपण उपासना करतो त्या अष्टशक्तींची. सर्वच शक्ती उपयुक्त, उपयोगी आहेतच पण सातवी शक्ती ही फारच महत्त्वाची आहे-
७) सामना करण्याची शक्ती – देवी महाकाली…
भारत देशात कठीण तत्त्वज्ञान साधे, सोपे व आकर्षक करण्याची एक चांगली पद्धत आहे ती म्हणजे त्यावर आधारित एक छान गोष्ट सांगण्याची.
या संदर्भात बघितले तर गोष्टीप्रमाणे महाकाली या देवीने असुरांचा संहार केला. हे असुर अनेक होते – शुम्भ, निशुम्भ, चण्ड, मुण्ड, रक्तबीज…वगैरे.
रक्तबीज राक्षसाची एक विशेष शक्ती म्हणजे त्याचा वध केला की त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून नवा असुर प्रगट व्हायचा. असे करून लाखो- करोडो असुर तयार झाले. या सर्वांचा संहार करणे हे अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्य होते. कधीकधी शक्तीपेक्षा युक्तीच जास्त उपयोगात येते.
कथेप्रमाणे चण्डिकादेवीने महाकालीला एक युक्ती सांगितली की तू तुझे मुख मोठे कर व सगळीकडे पसरून घे. आणि रक्ताचा थेंब पृथ्वीवर पडू देऊ नकोस. त्यामुळे नवीन असुर तयार होणार नाही. असे केल्यामुळे त्या असुराचा नाश झाला.
या रोचक कथा लहान मुलांसाठी ठीक आहेत. त्यामुळे त्यांना काही बोध मिळतो- जसे आपण असुरांप्रमाणे स्वार्थी व दुष्ट होऊ नये.

  • देवदेवतांबद्दल त्यांचे प्रेम, श्रद्धा वाढते. स्वतःलादेखील त्यांची उपासना केल्यावर त्यांच्याकडून रक्षण मिळेल हे आश्‍वासन मिळते.
    ज्ञानी व्यक्तींनी अशा या रूपकांतून बोध घेणे आवश्यक आहे.
  • हे असुर म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेले विकार व दुर्गुण. मुख्यत्वे काम- क्रोध- लोभ- मोह- मद- मत्सर व अहंकार तसेच ईर्ष्या, द्वेष, आळस, हिंसा, प्रतिशोध.
    असे हे असुर आपल्यातील प्रत्येकामध्ये आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी शक्ती पाहिजे – हीच ती दैवी सामना करण्याची शक्ती. कारण हे असुर जर असेच वाढत राहिले तर ते त्या व्यक्तीचा नाश करतीलच पण त्याचबरोबर समाजाचा व विश्वाचा सुद्धा. याचेच नाव कलीयुग. सध्याच्या जगात हे असुर कसा हाहाःकार माजवतात व सर्वनाश घडवून आणतात हे कुणालाही वेगळे सांगण्याची जरुरी नाही.
    अशा या महाभयंकर असुरांना संपवण्यासाठी या अष्टशक्तींची फारच आवश्यकता आहे. सुरवातीपासून वेगवेगळ्या शक्तींचा उपयोग करून शेवटी सामना करण्याच्या शक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीला पोचायचे आहे.
    १. विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती, २. समेट करण्याची शक्ती, ३. सहन करण्याची शक्ती, ४. सामावून घेण्याची शक्ती, ५. परखण्याची शक्ती,
    ६. निर्णय घेण्याची शक्ती.
    आपण कथेतदेखील बघतो की सुरुवातीला या देवी-देवता असुरांना सर्व तर्‍हेने समजावण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांचा सामना करून त्यांचा वध करावाच लागतो. कारण हे शक्तीशाली असुर फारच अहंकारी असतात.
    रामायणाकडे नजर फिरविली तर लक्षात येते की वेदशास्त्रपारंगत ब्राह्मण- रावण किती स्वार्थी, आत्मकेंद्रित, अहंकारी होता तो. अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला- त्याची पत्नी मंदोदरी, भाऊ बिभीषण, कुंभकर्ण. पण शेवटी युद्ध अटळ झाले तरीसुद्धा श्रीरामाला ते टाळायचे होते, तेव्हा मारुती, अंगद… असे काही लोक त्याच्याकडे गेले. पण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. स्वतःची शक्ती- भगवान शंकराकडून मिळवलेली (तीही एवढ्या कठोर तपश्‍चर्येनंतर)
  • अस्त्र-शस्त्रांची व मायावी शक्ती- यांवर त्याचा विश्‍वास होता. म्हणून तो असुर ठरला. तो काय अक्राळविक्राळ, दहा मुखांचा आणि त्याची मुख्य शक्ती म्हणजे ‘माया’.
    महाभारतातही तेच दृश्य दिसते – शंभर कौरव व पाच पांडव. त्यांना मानवी रूपातच दाखवतात पण त्यांची वृत्ती विकारी होती. म्हणजे सारांश तोच.
    सर्व प्रकारचे उपाय संपले की सामना आणि नाश. हे जीवनाचे सत्य आहे. त्यासाठीच या आपल्यामध्ये असणार्‍या असुरांबद्दल संपूर्ण ज्ञान हवे. त्यासाठीच नियमित अभ्यास व साधना हवी.
    आजचा मानव फारच चिंतेत आहे. समस्यांमुळे त्याचे मन विचलित झालेले आहे आणि त्या वाढत्या समस्या क्षणोक्षणी जाणवत असतात.
  • व्यक्तिगत समस्या – पेशा-नोकरी, कमाई, आरोग्य
  • कौटुंबिक – मतभेद, भांडणं, घटस्फोट, मुलांचे शिक्षण, कुटुंबियांचे आरोग्य.
  • सामाजिक – लाचलुचपत, संप, अनैतिकता, असत्य, व्यसने
  • राष्ट्रीय (वैश्विक) – लढाया, युद्ध, प्रदूषण
    त्यातच प्रत्येक क्षेत्रात आरोग्याच्या समस्या आहेत. आणखी भर म्हणजे नैसर्गिक आपत्ती- पूर, दुष्काळ, वादळं, भूकंप… आणि आताचा महाराजा – कोरोना.
    या सर्वांचे परीक्षण केले तर समजेल की या सर्व संकटांना आपणच जबाबदार आहोत. उदा. पंचमहाभूतांचा नाश- पृथ्वी, जल, वायु, अग्नी.
    पूर्वीचे ऋषी यांच्याबरोबर सहयोग करत असत. त्यांचा प्रेमाने सांभाळ करत असत. त्यांच्याबरोबर संघर्ष नाही.

आरोग्य बिघडायला प्रत्येक व्यक्ती जबाबदार. प्रत्येक पैलूत. ४ प्रदूषण- जेवण (सात्विक नसून तामसिक व राजसिक) – विचार व विकार (नियंत्रण नाही) म्हणून योगशास्त्रासारखे एक सुंदर विज्ञान आपल्या ऋषींनी विकसित केले होते.
भारतीय परंपरा फक्त नकारात्मक विचार करीत नाही तर या अशा गोष्टींवर विचार व चिंतन करते. योगसाधनेमध्ये तर आपण हेच करतो.
माउंट अबू येथे प्रमुख केंद्र असलेल्या व सर्व विश्‍वांत पसरलेल्या हजारो केंद्रातून हेच ज्ञान दिले जाते.

  • अमृतवेळा म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर ध्यान
  • मुरली (ईश्‍वराकडून मिळालेले प्रत्यक्ष ज्ञान)
  • प्रवचने, संमेलने – स्थानिक, वैश्‍विक (प्रत्यक्ष, दूरदर्शनऽर)
  • सांस्कृतिक कार्यक्रम
  • स्वतःचे टीव्ही चॅनेल – पीस ऑफ माइंड अवेकनिंग.
    इथे प्रत्येक वयोगटासाठी विविध सुंदर आकर्षक कार्यक्रम आहेत… अत्यंत ज्ञानपूर्ण व उपयुक्त.
    असे हे ईश्‍वरीय ज्ञान मिळवून आपण आपली आत्मशक्ती वाढवू या. त्यासाठी अभ्यास, तपश्‍चर्या, धारणा महत्त्वाची.