गोवा प्रांत संघ मूळ संघात विसर्जित

0
122

>> सुभाष वेलिंगकर यांची घोषणा

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतापासून फारकत घेत संघाचे माजी गोवा विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी स्थापन केलेला ‘गोवा प्रांत संघ’ पुन्हा मूळ संघात विसर्जित करीत असल्याची घोषणा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे सर्व स्वयंसेवक मूळ संघाच्या शाखांवर जाण्यास मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे विद्यमान गोवा विभाग संघचालक लक्ष्मण बेहरे यांच्या मार्गदर्शनाखालीच संघाचे काम चालू राहील असेही वेलिंगकर यांनी जाहीर

१५ सप्टेंबर रोजी गोवा प्रातं संघाची स्थापना झाली होती. निवडणुकीनंतर गोवा प्रांत संघ विसर्जित करण्यात येणार असल्याचे त्यावेळी आपण सांगितले होते व त्यानुसारच वरील निर्णय झाल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.
बंडखोरीतून भारतीय जनता पक्षाला व देशाला एक वेगळा संदेश देण्यात आला. यापुढे भाजपला संघाला कोणत्याही बाबतीत गृहित धरता येणार नाही. एका सिद्धांतावर म्हणजे तत्त्वाच्या मुद्यावर स्वयंसेवकांनी बंडखोरी केली होती. संघाच्या स्वयंसेवकाने केवळ भाजपासाठीच काम करावे असे बंधन नाही या आशयाचे पत्र नागपूरच्या संघ मुख्यालयातून आल्याचे त्यांनी सांगितले.
संघ म्हणून गोवा प्रांत विसर्जित केला असला तरी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या वेगवेगळ्या समित्यांवर स्वयंसेवकांना असलेल्या जबाबदार्‍या अबाधित राहतील तसेच गोवा सुरक्षा मंचाचे अस्तित्वही कायम राहील असे वेलिंगकर यांनी यावेळी सांगितले.
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करण्यासाठीच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनास अखेरपर्यंत संघाचा पाठिंबा असेल असेही त्यांनी जाहीर केले. गेल्या निवडणुकीत आपल्या पक्षासाठी काम करावे म्हणून भाजपच्या नेत्यांनी स्वयंसेवकांना सर्व प्रकारची आमिषे दाखवली. स्वयंसेवकांचा छळ केला, धमक्या दिल्या, परंतु संघातील ९५ टक्के स्वयंसेवक त्यांना बळी पडले नाहीत. त्यांनी ज्या तत्त्वावर, ज्या सिद्धान्तांवर संघ उभा आहे, त्याचाच स्वीकार केला असे वेलिंगकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने संघाचा विश्वासघात केला. स्वयंसेवकांना गृहित धरले गेले. त्याचा परिणाम ११ मार्चच्या निवडणूक निकालातून दिसेल असा दावा वेलिंगकर यांनी केला.
बंडखोरी करताना गोवा प्रांत असो किंवा नागपूर मुख्यालय असो, कोणालाही विश्वासात घेतले नव्हते व आता गोवा प्रांत विसर्जित करण्याच्या बाबतीतही त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. हा निर्णय ठरल्याप्रमाणेच घेतल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले. संघ ही निःस्वार्थीपणाने देशप्रेमाने ओथंबून भरलेली संघटना आहे असे सांगून खरे म्हणजे बंडखोरी करण्याची पाळीच यायला नको होती, परंतु तत्त्वाच्या प्रश्नावर नको होती, परंतु तत्त्वाच्या प्रश्नावर अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो असे वेलिंगकर म्हणाले.
पत्रकार परिषदेस सुभाष देसाई, किरण नायक, राजू सुकेरकर, रामदास सराफ, प्रवीण नेसवणकर, अवधूत कामत, दत्ता पु. नायक, आशीश प्रभुदेसाई, प्रकाश कवळेकर, कृष्णकांत बांदोडकर, संदीप नाईक, सूर्यकांत गावस, प्रा. गजानन मांद्रेकर, अभय खंवटे, विनायक च्यारी आदी उपस्थित होते.

वेलिंगकरांच्या घरवापसीला रा. स्व. संघाचा थंडा प्रतिसाद
सुभाष वेलिंगकर यांनी मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये परत येण्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत जरी केली असली, तरी संघ सोडण्याचा निर्णय घेताना त्यांनी संघाला विचारले नव्हते, त्यामुळे संघात परतण्याच्या त्यांच्या निर्णयावर संघ मतप्रदर्शन करू इच्छित नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत पदाधिकारी अभिजित ऊर्फ दादा गोखले यांनी काल ‘नवप्रभा’ ला सांगितले. रा. स्व. संघाला वेलिंगकरांच्या पुनःप्रवेशावर काहीही मतप्रदर्शन करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात संघाचे कोकण प्रांत प्रचारप्रमुख प्रमोद बापट यांच्याशी संपर्क साधला असता, संघातून बाहेर पडण्याची पहिली घोषणा वेलिंगकरांनीच केली होती व आता पुन्हा संघात येण्याची घोषणाही तेच करीत आहेत. त्यांचे हे दोन्ही निर्णय एकतर्फीच आहेत. त्यामुळे संघ त्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शेवटी सगळ्यांचाच आहे. तो कोणाविषयीही वैरभाव ठेवीत नाही. संघाच्या शाखा सर्वांना खुल्याच असतात, शाखेला काही कुंपणे नसतात. ज्याला शाखेवर यायचे आहे तो शाखेवर येऊ शकतो असे श्री. बापट पुढे म्हणाले.
गुढीपाडव्याला व्हायच्या संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नव्या नियुक्त्या या बंडखोरांना पदांवर यायची संधी मिळू नये म्हणून आधी करण्यात आल्याचा जो आरोप केला गेला आहे, त्याविषयी विचारले असता प्रांत स्तरावरील नियुक्त्या ह्या दरवर्षी आधीच निश्‍चित होत असतात. त्यांची घोषणा केवळ वर्षप्रतिपदेला होत असते. यंदाही अधिकृत घोषणा वर्षप्रतिपदेलाच होणार आहे असे बापट यांनी स्पष्ट केले. विभाग संंघचालक आणि इतर प्रमुख पदांची नियुक्ती कोकण प्रांतामार्फत दरवर्षी ज्या पद्धतीने केली जाते, त्याच प्रकारे ती यंदाही करण्यात आलेली आहे. तो निर्णय सर्वांशी बोलूनच झालेला आहे. जानेवारी – फेब्रुवारीमध्ये प्रांतिक बैठक असते. त्यात विभागाच्या पदाधिकार्‍यांना बोलावले जाते. त्यानुसार सर्व विचारविमर्श करून निर्णय झालेला असून त्यात कोणाचा ‘कात्रजचा घाट’ करण्याचा प्रयत्न नव्हता, असेही बापट यांनी सांगितले.
जे बंडखोर पुन्हा संघात परतले आहेत, त्यांच्यापाशी संघशाखांवरील विविध पदे होती, ती त्यांना पुन्हा मिळणार आहेत का, असे विचारले असता त्या सर्व पदांची निवड ही जिल्हा कार्यवाहांद्वारे केली जाते. त्यासंदर्भात बोलणी, भेटीगाठी सुरू आहेत. व्यक्ती देऊ शकत असलेला वेळ, तिची उपयुक्तता, तिला स्वयंसेवकांमध्ये असलेली स्वीकारार्हता आदी मुद्द्यांच्या आधारे त्या पदांवर पदाधिकारी निवडले जातील. शेवटी स्वयंसेवकांना ती व्यक्ती स्वीकारार्ह आहे का याचाही विचार करावा लागणार आहे. वैयक्तिक रागलोभ हा घटक त्या निवडीमागे नसतो. संघ सगळ्यांचाच आहे. असे श्री. बापट
म्हणाले.
गोवा विभाग संघचालक लक्ष्मण तथा नाना बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्यांना संघात परत यायचे असेल त्यांनी आधी शाखेवर यावे, प्रार्थना म्हणावी, कार्यक्रमांत सहभागी व्हावे एवढेच मी म्हणेन अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. संघाच्या पदांसाठी बंडखोरांचा पुन्हा विचार होऊ शकतो का या प्रश्नावर त्यांनी आधी शाखेत यावे असे ते पुढे म्हणाले.