चालू वर्षी आतापर्यंत गोवा विधानसभेचे फक्त सहा दिवसच अधिवेशन झालेले असून डिसेंबर महिन्यात किमान वीस दिवसांचे अधिवेशन घेण्याची आवश्यकता असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.
गेल्या जानेवारी महिन्यात पाच दिवसांचे अधिवेशन झाले. नंतर ऑगस्ट महिन्यात केवळ एका दिवसाचे अधिवेशन घेण्यात आल्याचे कामत म्हणाले. ऑगस्ट महिन्यात जेव्हा सरकारने कोरोना महामारीमुळे अधिवेशन केवळ एका दिवसावर आणले तेव्हाच आपण डिसेंबर महिन्यात सरकारने पूर्ण क्षमतेचे वीस दिवसांचे अधिवेशन घ्यावे, अशी सरकारला सूचना केली होती, असे कामत म्हणाले.
एक अधिवेशन झाल्यानंतर दुसरे अधिवेशन सहा महिन्यांच्या आत घ्यावे लागते. मागचे अधिवेशन ऑगस्ट महिन्यात झाले होते. त्यामुळे पुढील अधिवेशन सरकार फेबु्रवारीत घेऊ शकते. पण यावर्षी मूळातच गोवा विधानसभेचे अधिवेशन केवळ सहा दिवस भरले असल्याने सरकारने चालू डिसेंबर महिन्यात वीस दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी विरोधकांची मागणी असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनतेचे कित्येक प्रश्न व समस्या असून यावर विधानसभेत चर्चा होण्याची गरज आहे, असे कामत म्हणाले.
दरम्यान, अपक्ष आमदार रोहन खंवटे म्हणाले की, सरकारने खरे तर जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच विधानसभा अधिवेशन बोलवायला हवे होते. म्हादई, रेल्वे दुपदरीकरण, कोळसा, बेरोजगारी, कोविड अशा कित्येक प्रश्नांवर राज्य विधानसभेत चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे खंवटे म्हणाले. सध्या अधिवेशन आखले जात नसल्याने विरोधी आमदारांना सरकारला प्रश्न विचारता येत नाहीत आणि विधानसभेबाहेर विचारल्या जाणार्या विरोधी आमदारांच्या प्रश्नांची मंत्री उत्तरे देत नसल्याचे खंवटे म्हणाले.