गोव्यातील महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल …

0
244
  • सौ. अमिता नायक सलत्री

आपल्या पूर्वज आजी-मातांनी खूपच अन्याय-अत्याचार सहन केले. आपली चूक असतानासुद्धा सगळं काही पोटात ठेवणे, पोटातून वर आलंच तर ओठ शिवून ठेवणे… असं करत करत कित्येक महिलांनी नाहक छळ सोसला. टोकाचा मनःस्ताप सहन करत करत त्या मुक्या जनावरांसारख्या असहाय्य जीवन जगल्या. अंधश्रद्धा, अनावश्यक चालीरीती यांना त्या बळी पडल्या.
वयात येण्याआधीच मुलींची कोवळ्या वयात लग्ने व्हायची. वयात आल्यावर काय ते नवर्‍याबरोबर नांदणं- तेही अत्यंत बावरलेल्या मनःस्थितीत. शिवाय सासूबाईंची अगदी कडक देखरेख असायचीच. अत्यंत क्रूर अशी तेव्हाची चालीरीती म्हणजे वयात येण्याआधीच जर तिच्या त्या पतीला मृत्यू आला, तर त्या बालवयापासून तर पुढील सर्व आयुष्य तिने एका विधवेचं आयुष्य म्हणून जगायचं… तेही कसं?… तर तिचे केस कापले जायचे… आयुष्यभर तिने फक्त पांढर्‍या रंगाचीच साडी नेसायची…तिने कधीच आणि कुठेच पुढे पुढे करायचं नाही…कसल्याही सणासमारंभावेळी तिने अगदी आतल्या खोलीत राहायचं… कोणत्याही शुभ कार्याला तिने उपस्थित राहायचं नाही. विधवा झाली म्हणजेच ती वाकड्या पायांची… अशुभ वृत्तीची… तिच्याच या अभद्र नशिबामुळे तिच्या नवर्‍याला मरण आलं… असे टोमणे सतत मारले जायचे. वाढत्या वयाबरोबर ती सुडौल होऊ नये म्हणून सदोदित तिला कुपोषित ठेवले जायचे. म्हणजे तिला मुद्दामहून पौष्टिक आहार न देता उरलेलं.. शिल्लक राहिलेलं जेवण दिलं जायचं. असा हा तिचा अमानुष छळ तिच्या आयुष्यभर केला जायचा.

कसं कसं सहन केलं असेल त्या बिचार्‍या स्त्रियांनी! हे विचार मनात येऊन स्त्रीजन्माचीच किळस वाटते…घृणा वाटते… त्या सार्‍या दुष्ट चालीरीतींची. अशा वेळी रक्तातला थेंब- थेंब आक्रोशतो… ‘‘स्त्रियांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा. दुर्गा व्हा तुम्ही चंडी व्हा तुम्ही… पण असा स्त्रीत्वाचा छळवाद सहन करू नका’’…असेच अगदी आवाज उंचावून सांगावेसे वाटते. कित्येक समाजसुधारकांनी असेच आपले आवाज चढवले या अशा अमानवी गोष्टींबद्दल. स्त्रियांनी सुशिक्षित व्हावे, म्हणजे त्या अशा जुलमातून बाहेर पडतील. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले- सावित्रीबाई फुले यांनी खूप खूप प्रयत्न केले. …स्त्रियांसाठी शाळा उघडल्या. हळूहळू अशा कित्येक समाजकार्यकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली की स्त्रियांच्या विकासासाठी अमुक अमुक गोष्टी घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याप्रमाणे एकेक गोष्ट घडत गेली. गावागावांनी- वाड्यावाड्यांनी शाळा सुरू झाल्या. प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाणे सक्तीचे केले गेले. आधी प्राथमिक शाळा सुरू केल्या गेल्या. काही काळाने तिथे माध्यमिक शाळाही सुरू झाल्या. काही प्रमुख शहरात उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या. अवघ्याच प्रमुख शहरात महाविद्यालये सुरू झाली. कला- वाणिज्य- विज्ञान शाखांबरोबरच हळूहळू इतर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले. सुरुवातीला वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शिक्षण फक्त मुंबई आणि देशातील काही प्रमुख अशा शहरातच सुरू झाले.

पण हळूहळू हेही चित्र बदलले. आपल्या घरापासून लांब राहून हे सारे उच्च शिक्षण घेणे कठीण होऊन जाते… याचा विचारही समाजसुधारकांनी सरकारला करायला भाग पाडला. त्याचेच फळ म्हणून की काय प्रत्येक राज्यात अशी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग महाविद्यालये सुरू झाली. प्रत्येक राज्यात युनिव्हर्सिटीजही सुरू झाल्या… एम.एस. बोर्ड, हायर सेकंडरी बोर्ड सुरू झाले. इतकेच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये आता कित्येक हायर सेकंडरीज आणि कॉलेजेस सुरू झालेली पाहून खूप खूप आनंद होतो.

आजच्या मुलामुलींना आता लांब प्रवास करण्याची गरजच उरली नाही. ते ते शिक्षण घेण्यासाठी … शिवाय मुलींसाठी वेगळ्या हॉस्टेल्सची व्यवस्थाही केली गेली. नोकरी करणार्‍या मुलींना, स्त्रियांना या वुमन हॉस्टेल्सची खूप मदत होते आहे. काही मुली शिक्षणात तेवढ्या हुशार असत नाहीत. अशा मुलींसाठी वेगवेगळे कलात्मक शिक्षणही सरकारने सुरू केले आहे- टेलरिंग (शिवणकाम); पॉटरिंग वर्क (मातीकाम), होम नर्सिंग (परिचारिका अभ्यासक्रम); ज्यूट बॅग्ज बनविण्याचे प्रशिक्षण, विणकाम, भरतकाम, कपड्यावरील पेंटिंग्ज. शंख-शिंपले वापरून केलेली कलाकुसर, कृत्रिम दागिने वगैरे कित्येक प्रकारचे प्रशिक्षण मुलींना देण्याची सुविधा सरकारने कार्यरत केली.
पूर्वीच्या काळी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून तेव्हाच्या महिला अर्थार्जन करायच्या. पापड, लोणचे, सांडगे, वोड्यो, शिवाय त्या त्या सणावेळी ते ते पारंपरिक खाद्यपदार्थ केले जायचे. आजही याबाबतीत विचार करून त्या त्या गोष्टी घडवून आणायला सरकार महिलांना मदत करत आहे. प्रमुख शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी अशा वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून सरकारने विविध महिला संघटनांना आऊटलेट्‌स मिळवून दिल्या आहेत. उदाहरणार्थ – पणजी बसस्थानकावर असेच एक दालन आहे, जे खास महिलांसाठी आहे. आपापले जिन्नस, विविध खाद्यपदार्थ त्या त्या महिला तेथे आणून ठेवतात. या सर्व जिन्नसांना खूप मागणी असते. त्यामुळेच की काय आज त्या सर्व महिला महिन्याला चार पैसे कमावू शकतात.

अन्नपदार्थांबरोबरच एक ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध आभूषणे, पर्सेस-बॅगा, शिवाय इतर गरजू वस्तू बनवून विकण्याचे दालन सरकारने या लघू-व्यावसायिक महिलांना मिळवून दिले आहे.
आर्थिकदृष्ट्या महिला ही परिपूर्ण असावी, याच हेतूने आपल्या देशभर सरकारने सुरू केलेली अत्यंत उल्लेखनीय योजना म्हणजे ‘सेल्फ-हेल्प-ग्रुप’ संघटना. ही संघटना आज प्रत्येक वाड्या-वाड्यावर अत्यंत यशस्वीपणे कार्यरत होत चाललेली पाहून मनाला खूपच सुखद वाटते. त्यांच्या त्या कित्येक कार्यक्रमांना ‘प्रमुख पाहुणी’ म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळते… आणि त्या महिलांनी अगदी जीव ओतून केलेल्या त्या त्या वस्तू पाहताना माझे मन भरून येते. नोकरीच्याच मागे न लागता अशा या सेल्फहेल्प ग्रुपमधून स्वयंसिद्धा झालेल्या या महिलांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.

शिवाय या सेल्फ-हेल्प-ग्रुप (स्वयंरोजगार)मध्ये सामील होण्यास कित्येक महिलांना मनस्वीपणे मदत करणार्‍या त्यातील प्रमुख सौ. हेमश्री गडेकर यांचेही मी मनःपूर्वक अभिनंदन करते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज जवळजवळ संपूर्ण गोव्यामध्ये असे शेकडो स्वयंरोजगार गट कार्यरत आहेत आणि हजारो महिलांना त्यातून पुरेसा रोजगार मिळतोय. म्हापसा येथील सौ. प्रीती केरकर या महिलेने अशाच एका स्वयंरोजगार गटातफेर् कर्ज काढून एक बसही विकत घेतली. स्वतःच्या पतीला तिने त्या बसचा ड्रायव्हर व्हायला तयार केले आणि ती स्वतः त्या बसची कंडक्टर बनली. पैशांचा व्यवहार व्यवस्थित चालू ठेवून काही वर्षातच तिने त्या बसचे सर्व कर्ज फेडले. या अशा ‘यशस्वी’ कथा ऐकून प्रीतीसारख्या महिलांचा खूपच अभिमान वाटतो. महिला विकासासाठी सरकारने सुरू केलेल्या या अशा विविध योजना, ज्यांचा उपयोग करून आज कित्येक गरीब महिलांनी आपले आयुष्य सुखकर केले आहे… अशीच एक संस्था म्हणजे जनशिक्षण संस्था. या संस्थेतर्फे कित्येक कोर्सेस आयोजित केले जातात. कुकिंग, बेकिंग, टेलरिंग, जरीवर्क, बीडवर्क, ब्युटिशियन कोर्स, ज्यूटवर्क अशा कित्येक गोष्टींचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. पुढे त्याच प्रशिक्षणार्थींना इथे प्रशिक्षक म्हणून नेमलेही जाते. श्रीहरी आठल्ये, निमिषा पळ वगैरे तिथले अधिकारी अगदी जिवाचे रान करून ही संस्था यशस्वीपणे चालविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरही कित्येकदा गौरविण्यात आले आहे. कित्येक गरजू महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी ही जनशिक्षण संस्था सातत्याने वावरते आहे. पेडणे येथील विद्या पोखरे हिने वरील संस्थेतर्फे आयोजित बेकिंग कोर्स पूर्ण केला आणि राष्ट्रीय पातळीवरील ‘मास्टर शेफ’ स्पर्धेत तिला सहभागी होता आले. आज विद्या पोखरे वाड्यावाड्यावर जाऊन कित्येक महिलांना ‘बेकिंग’चे प्रशिक्षण देत असते. अशा कित्येक यशस्वी कर्तृत्ववान महिलांवर आधारित ‘इन-गोवा’ चॅनलवर मी सादर केलेली ‘यशोदामिनी’ मालिका खूपच लोकप्रिय झाली.

सरकारची आणखी एक गौरवास्पद योजना म्हणजे ‘गृहआधार योजना’. प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या सशक्त असणे ही काळाची गरज आहे. सगळ्यानाच सरकारी नोकरी मिळणे शक्य नसते. पण प्रत्येक निराधार किंवा दारिद्य्ररेषेखाली येणार्‍या महिलेला थोडीतरी आर्थिक मदत या गृहआधार योजनेतर्फे केली जाते. ही एक खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
मुलींबाबतीत सरकारने अजून एक लाखमोलाची योजना सुरू केली ती म्हणजे ‘लाडली लक्ष्मी’ योजना. दारिद्य्ररेषेखालील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नखर्चासाठी जवळजवळ एक लाख रुपये या योजनेखाली दिले जातात. मुलीचा लग्नखर्च ही प्रत्येक गरीब मायबापाची एक मोठी चिंतेची समस्या असते. हुंडा देणे आणि हुंडा घेणे हे दोन जणू पापरूपी व्यवहार आहेत… पण पूर्वापार ही गोष्ट चालत आली आहे, त्याचसाठी प्रत्येक वधूपक्षाला थोडीतरी मदत व्हावी या हेतूने सरकारने ही लाडली-लक्ष्मी योजना सुरू केली. ज्याचा कित्येक गरीब मुलींना लाभ झालेला आहे.

शिक्षणाच्या बाबतीतही सरकारने कित्येक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे मुलींचा सर्वांगीण विकास व्हायला मदत झाली आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब या माध्यमातून विविध विषयांचे शिक्षण घरबसल्या मिळवून द्यायला सरकार प्रयत्न करीत आहे. त्यातून आव्हानात्मक अशी मानसिकता आजच्या मुलींमध्ये रुजताना दिसते आहे. दुर्दैवाने अलीकडे मुलींवर- महिलांवर होणारे अत्याचार वाढतातच आहेत. एकदा घरातून बाहेर पडलेली मुलगी घरी परत येईपर्यंत तिच्यावर काय काय ओढवेल, हे काही सांगता येत नाही… याचाच विचार करून सरकारने सर्व शाळांना बालरथ दिले. घरापासून शाळेपर्यंत आणि परत शाळा ते घर असे काम या बालरथांतर्फे केले जाते. मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने सुरू केलेली ही बससेवा म्हणजे एकदमच गरजेची आणि स्तुत्य अशीच गोष्ट आहे.

प्रत्येक शाळेमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, वाचनालयातले पुस्तकभांडार यांचाही मुलींचा ज्ञानविकास व्हायला मदतच होते आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येक मुलगी शाळेमध्ये पूर्णपणे सुरक्षित असायची… पण पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या विळख्यात सापडलेल्या आजच्या समाजामध्ये चंगळवाद- भोगवाद- व्यभिचार- हिंसाचार आणि अश्‍लीलता- बिभत्सता हे विषाणू सर्वत्र पसरले आहेत. दुःखद गोष्ट म्हणजे काही शाळांतही हे असले घाणेरडे प्रकार सुरू व्हायला लागलेत. त्यातून मुलींचा विनयभंग करणे, त्यांच्याशी असभ्य वागणे, मुलींचे अपहरण करणे… वगैरे टोकाचे प्रकार सुरू झालेत. शाळेजवळ उभे राहून मुलांना ड्रग्ज विकणे, त्यांना स्मार्ट फोनवरील डर्टी क्लिपिंग्ज दाखवणे, वगैरे वगैरे विकृत प्रकारही सुरू झाले. या सर्व गोष्टींची गंभीरपणे दखल घेत सरकारने आता सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत… ज्यामुळे वरील सर्व भयानक गोष्टींवर आळाबंदी बसवायला मदत झाली आहे.

सरकार सर्व प्रकारची अशी विकासकामे करायला कटिबद्ध आहेच, शिवाय रोटरीसारख्या कित्येक बिगर सरकारी संस्थांतर्फे मुलींना वेळोवेळी तर्‍हेतर्‍हेची मदत केली जाते. मी पर्वरी रोटरीची अध्यक्ष असताना साल्वादोर-द-मुंद येथील सुनंदाबाई मेमोरियल हायस्कूल आमच्या रोटरी क्लबने दत्तक घेतले. तेव्हापासून आत्तापर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे त्या शाळेला क्लबतर्फे मदत केली जाते- वॉटर कूलर्स, म्युझिक सिस्टीम, गणवेश, वह्या, पुस्तके याबरोबरच यावर्षी कित्येक गरीब मुलांना स्मार्ट मोबाइलही देण्यात आले. कोविडमुळे ऑनलाइन शिकवणी घेताना असे महागडे फोन कित्येकांना विकत घेणे कठीण जात होते… अशाच कित्येक संस्थांनी मुलींना सायकलीही प्रदान केल्या आहेत.

सरकारने गरीब मुलांसाठी सुरू केलेली अजून एक उल्लेखनीय योजना म्हणजे ‘मध्यान्ह आहार’ योजना.. टोकाची गरिबी असल्यामुळे कित्येक मुलांना घरी पौष्टिक नाश्ता मिळत नसतो. अशा मुलांना या मध्यान्ह आहार योजनेमुळे सशक्त होण्यास मदत होत आहे. काही मुली विविध भानगडीत सापडलेल्या असतात. जंक फूड आणि स्मार्ट फोनचे रेडिएशन यामुळे कोवळ्या वयातच मुली ‘जाणत्या’ होतात. म्हणजेच त्यांना मासिक पाळी येते. एकदा हे असे झाले की त्यांचे मन चलबिचल होते. प्रेम- चाळे यांचा मोहर त्यांच्या मनात सतत जागा व्हायला लागतो… आणि नेमके याच वेळी त्यांची पावले चुकीच्या दिशेने पडतात… बाद वृत्तीच्या पोरांना ती बळी पडतात. याचाही विचार सरकारने केला आणि आता प्रत्येक शाळेमध्ये ‘कौन्सिलिंग’ करणार्‍या कौन्सीलरची म्हणजेच समुपदेशकाची नेमणूक केली गेली आहे. अशा समुपदेशकांतर्फे समुपदेशन त्या त्या मुलींचे केले जाते, ही एक काळाची गरज होती जी सरकारने पूर्ण केली आहे.
एकूण आढावा घेतला तर बालिका आणि महिला यांचा असा हा सर्वांगीण विकास करायला सरकार सदोदित कटिबद्ध असते. तसेच त्यांची बौद्धिक पातळी वाढावी म्हणूनही सरकारने कित्येक ठिकाणी फिरती वाचनालयेही सुरू केली आहेत.

प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक महिला ही घरात आणि घराबाहेर पूर्णपणे सुरक्षित राहावी, तसेच तिच्यावर होणार्‍या अन्याय- अत्याचारांचा तिला जाब विचारता यावा… तिची घरात होणारी अवहेलना, मारझोड आणि छळवाद यावर तिला तक्रार करता यावी आणि तिला पूर्णपणे न्याय मिळावा यासाठी सरकारने महिला आयोगाची स्थापना केली. शिवाय घरगुती छळवाद कायदाही अमलात आणला. यामुळे कित्येक पीडित महिलांना न्याय मिळत गेला.
सर्वांगीण विकासाच्या वरील सर्व गोष्टी सरकारने महिलांपुढे ठेवल्या आहेत. वेळ आली आहे सर्वांनी त्याचा आधार घेण्याची. आपण कितीही सशक्तीकरणाच्या बाता मारल्या तरी अशा सत्तर टक्के महिला आज क्लेशदायी जीवन जगत आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पूर्वापार आमच्या स्त्रियांच्या पिढ्या गुदमरल्या. पण आज स्त्रीप्रधान संस्कृतीने घट्ट पाय रोवूनसुद्धा आजच्या कित्येक स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या क्रूर अन्यायाने का बरे होरपळत आहेत?
‘झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा’… या गाण्याप्रमाणे प्रत्येक अशा दुर्बल स्वभावाच्या महिलेने आपल्यातली असमर्थता काढून टाकली पाहिजे. जुलूम- अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे… तरंच मला वाटते, प्रत्येक स्त्री ही निरोगी मनाने जगू शकेल… मान-सन्मानाने जगू शकेल!!