श्रम एव देव

0
270
  • नागेश गोसावी
    (मुख्याध्यापक, वळपे-विर्नोडा)

त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात ते आपले अधिराज्य गाजवत होते. दादांना कोणत्याही कामासाठी फोन केला म्हणजे ते काम झालेच म्हणून समजावे.

एकदा मी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेण्यासाठी पेडणे टपाल कार्यालयात गेलो. आपल्या कामात व्यस्त असलेल्या एका व्यक्तीने मला आश्‍चर्यचकित करून टाकले. आपले काम करत असतानाच अनेकांना ते एका भारावलेल्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन करत होते. ते बर्‍या बर्‍या पोस्टाच्या योजना समजावून सांगत होते. मी त्यांना कोणी पाठवले ते सांगितले. त्यांनी अत्यंत आपुलकीने, ‘‘जरा थांबा. मी काम करून देतो’’, असे सांगितले. एवढ्याशा सहवासाने त्यांनी मला… ‘विलस तू तव वाची सर्वदा देववाणी’.. याचा प्रत्यय आणून दिला.

या देशातील जनतेला अशा प्रकारच्या माणसांची नितांत गरज आहे हे माझ्या लक्षात आले. तुकोबा ज. नाईक हे ‘दादा’ या नावाने परिचित होते. टपाल खात्यातून ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले, पण टपाल खाते त्यांना व ते टपाल खात्याला सोडायला तयार नव्हते. पुढे २२ वर्षे टपाल खात्याला त्यांनी ऐच्छिक सेवा दिली. कोणीही केव्हाही टपाल खात्यात कधी काहीही मदत मागितली तर ते आनंदाने सहकार्य करत असत.

‘श्रम एव देव’ श्रम हाच खरा परमेश्‍वर आहे हे दादांनी जीवनाच्या शेवटपर्यंत कृतीत ठेवले. दादा संसार सोडून गेले पण जाण्यापूर्वी ६ महिन्यांपर्यंत त्यांनी टपाल खात्यात जनतेची सेवा केली.
कामानिमित्त आलेल्या परिचित किंवा अपरिचित व्यक्तीस मान कसा द्यावा, आदर कसा राखावा… हे ज्यांच्याकडून शिकावं, असं जिवंत उदाहरण म्हणजे दादा. या त्यांच्या स्वभावावरून तेव्हा सहज विचारले असता ते म्हणाले, ‘‘अहो, आम्ही काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार? ही लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे हीच माझ्यासाठी ईश्‍वरसेवा आहे’’.
त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात ते आपले अधिराज्य गाजवत होते. दादांना कोणत्याही कामासाठी फोन केला म्हणजे ते काम झालेच म्हणून समजावे.

तपोभूमी आश्रमाशी जोडलेले दादा हे अध्यात्माशीसुद्धा आपली नाळ जोडून होते. समाजाचे देणे- समाजऋण हे आपण समाजकार्य करून फेडले पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांचेच एक नातेवाईक संगीतकार आणि शास्त्रीय गायक, नाना आसोलकर यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला आणि मला उमगले की दादा हे मी समजायचो त्याच्यापेक्षाही मोठे होते.
गावचे भूषण असलेल्या दादांचा धारगळ ग्रामपंचायतीने २०१६ साली सन्मान केला होता. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाने ‘अहम्’च्या जागी ‘वयम्’ला स्थापित करून आपल्या जीवनाचा प्रवास केला. अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करून अनंताच्या प्रवासास निघून गेले. समाजाशी संबंध येणार्‍या सरकारी व बिनसरकारी खात्यात अशा प्रकारची माणसं (वाढली) घडली तर निश्‍चितच हा देश जगात आपलं नाव पुढे नेईल.