कर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा

0
159
  • ज्योती कुंकळ्ळकर

साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज आपल्यात नाहीत. आपल्या हयातीत भारतीय स्त्रीविषयक चर्चा आणि परिवार सशक्तीकरणाचा शंखनाद त्यांनी केला. ‘संपूर्ण कुटुंबाचे सशक्तीकरण झाले पाहिजे; नुसते स्त्री-सशक्तीकरण नव्हे!’ हे त्यांनी स्त्रियांना पटवून दिले. त्यांच्याविषयीच्या या काही आठवणी…

भारतीय स्त्रीविषयक चर्चा आणि परिवार सशक्तीकरणाचा शंखनाद राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केला. ‘संपूर्ण कुटुंबाचे सशक्तीकरण झाले पाहिजे; नुसते स्त्री-सशक्तीकरण नव्हे!’ हे त्यांनी स्त्रियांना पटवून दिले. जीवनातले रचनात्मक विचार त्यांनी मांडले. आम्ही नेहमी मुलगा आणि मुलगी समान म्हणतो, पण मृदुलाजी म्हणायच्या- ‘बिटियॉं है विशेष!’
साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज आपल्यात नाहीत. येत्या २७ तारीखला त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाला नऊ दिवस असताना त्या इहलोक सोडून गेल्या. श्रीमती मृदुला सिन्हा यांचा ७५ वा वाढदिवस गोव्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी ७०० पानांचा एक मोठा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथाचे संपादन बलदेव भाई शर्मा यांनी केले. या ग्रंथाच्या संपादक मंडळात सात मान्यवरांची नावे आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविद आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हणतात- ‘मृदुलाजींनी आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात जनजीवन सुंदर बनवण्यासाठी आपले चिंतन आणि लेखन यांचं सुंदर योगदान दिलं आहे.’ उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी लिहिलंय- ‘मृदुला सिन्हा यांचे साहित्यकार म्हणून भारतीय साहित्यात खूप मोठे योगदान आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रामाणिकपणाचं दर्शन घडवतं.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हणतात, ‘त्यांनी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकारणात आपल्या कार्याद्वारे उच्च मानदंड स्थापित केला आहे. त्यांनी साहित्यात घडवलेले भारतातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागांतील समस्यांचे वर्णन हृदयस्पर्शी आहे. स्वच्छ भारत अभियान आणि कल्याणकारी योजना यांद्वारे लोकांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांचा मृदू स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि साहित्य लोकांना प्रेरणा देईल.’ असे कितीतरी मान्यवरांचे शुभेच्छापर विचार त्यात अंतर्भूत आहेत. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यापासून मित्रमंडळ, परिवार, सखी, भाची, पुतणी, मुलगी असे अनेकांचे लेख या ग्रंथात आहेत. हा ग्रंथ वाचण्यासाठी मला दोन महिने लागले. वाचताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, सगळ्या लेखांत त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे- तसेच भाषणातही त्या सांगतात- ‘स्त्री के लिए परिवार सबसे महत्त्वपूर्ण है|’ त्यांच्या पुतणीने फार छोट्या-छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्या वाचून मृदुलाजींविषयी नितांत आदर आणि अभिमान वाटतो.
गेली चाळीस वर्षे लेखन, तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गृह मंत्रालयाच्या राजभाषा समिती सदस्यापासून ते रेल्वे मंत्रालय, महिला आयोग तसेच केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून पेपर वाचन केले. २०१४ पासून ते २०१८ पर्यंत त्या गोव्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. गोव्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. राजकारणाबरोबर त्यांचे साहित्यही तेवढेच लोकप्रिय आहे. त्या नेहमी सांगायच्या, ‘साहित्यकार को मधुमक्खी की भूमिका में होना चाहिए| उसका साहित्य उसी समाज जीवन के लिए स्वास्थ्यवर्धक होना चाहिए|’
एक कर्तव्यदक्ष राज्यपाल आणि संवेदनशील लेखिका अशी त्यांची ओळख सगळीकडे होती. मी नेहमीच म्हणते, ‘माझी काहीतरी पुण्याई असेल म्हणून त्यांचा भरपूर सहवास मला लाभला. त्यांची पुस्तके, काही लेख अनुवादित करायची संधी मला मिळाली. माझ्या चार पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले होते. एक गोष्ट आठवते- रवींद्रबाब यांच्यावरच्या सीडीचे प्रकाशन मला करायचे होते. रवींद्रबाबांवरचा माहितीपट पाहिल्यावर त्या सद्गदित झाल्या. एवढा मोठा लेखक- पद्मश्री, ज्ञानपीठकार- त्याचे योग्य व्यक्तीकडूनच आपण प्रकाशन करूया, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविद गोवा भेटीवर आले होते. राजभवनावर ते थांबले होते. मी त्यांना आठवण करून दिली. पण त्यावेळी राष्ट्रपती खूपच व्यस्त होते, त्यामुळे सीडीचे प्रकाशन होऊ शकले नाही. मात्र नंतर राजभवनात उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आले होते. मृदुलाजींनी मुद्दाम माझ्यासाठी त्यांची वेळ मागून घेतली आणि राजभवनावर एक छोटेखानी समारंभ घडवून आणला. मला फार समाधान वाटले.

त्यांची-माझी ओळख कशी झाली हे मला चांगले आठवते. गेली कित्येक वर्षे मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १९ डिसेंबरला संध्याकाळी राजभावनात जाते. अनेक मान्यवर तिथे भेटतात. तर अशाच एका समारंभाला मी गेले होते. राष्ट्रगीत संपल्यानंतर सगळ्यांपाशी जाऊन त्या बोलत होत्या. तेव्हा त्या गोव्यात नव्या होत्या. ओळख करून घेत होत्या. आणि जेव्हा त्या माझ्यापाशी आल्या, तेव्हा ‘मी लेखिका’ असे म्हटल्यावर त्या मला पाहतच राहिल्या. ‘ये झगमग सुंदर साडी पहेनने वाली लेखिका मुझे बहुत पसंत आयी!’ मी लगेच म्हणाले, ‘मी फिल्मनिर्मातीसुद्धा आहे!’ त्यावर त्या खळखळून हसल्या. तिथेच आमचे सूर जुळले! एकदा अचानक राजभवनातून फोन आला, राज्यपालांनी तुम्हाला बोलावलंय. मी लगेच त्यांना भेटायला गेले. आम्ही खूप बोललो. त्यांना एक साहित्यिक कार्यक्रम करायचा होता. तेव्हापासून त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मी त्यांना अनेकदा भेटले. पुस्तकाच्या अनुवादाविषयी आम्ही जास्त भेटलो. एकदा तर ‘बिटियॉं है विशेष’ या पुस्तकातील निवडक उतारे वाचण्याचा त्यांचा कार्यक्रम त्यांनी आमंत्रित केलेल्या लेखकांसमोर झाला. त्या हिंदीतून वाचत होत्या, तर मी कोकणीतून. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसून वाचताना मी खूप अवघडले. तेव्हा त्यांनी मला धीर दिला. हा आमचा कार्यक्रम खूप छान झाला. असे कितीतरी कार्यक्रम आम्ही केले. त्यांची दोन पुस्तके मी अनुवादित केली आहेत- ‘बिटिया है विशेष’ आणि ‘औरत अविकसित पुरुष नहीं हैं|’
‘पत्नी मनोरमा देवी’- त्यांच्या लग्नाला साठ वर्षे पूर्ण झाली त्यावेळी या दांपत्याने या पुस्तकाची रचना केली. हे फार सुंदर पुस्तक आहे. त्यात ४५ लेख आहेत. ‘चार पैरों पर चलना सिखाता है विवाह’ असे त्यांचे अनेक लेख काळजाला भिडतात.

‘महिला’ हा त्यांच्या लेखनाचा, भाषणाचा आणि आमच्या बोलण्याचा केंद्रबिंदू होता. त्या नेहमी मला सांगत, आपण नेहमीच महिलांना पुरुषांपेक्षा वरचढ का मानतो, कारण महिला आणि पुरुष यांच्यात असणार्‍या भिन्न गुणांच्या जोरावरच त्यांच्या कुटुंबातील भूमिका स्पष्ट होतात. निसर्गाने दिलेल्या मातृत्वासारख्या गुणाव्यतिरिक्त महिलांनी आता आपली प्रागतिक लढाईही सुरू केली आहे. मुळातच निसर्गाने तिला असे काही गुण असे दिले आहेत की तिला स्वतःपासून ते वेगळे करणे अशक्य आहे. आणि याच गुणांचा वापर संसाराचा रहाटगाडगा ओढण्यासाठी होतो. महिलांकडे असणार्‍या समता, सहिष्णुता, सहयोग या गुणांव्यतिरिक्त घर चालवणे अशक्य असल्याचे त्या मला नेहमी सांगत. महिलांना विशेष सुविधा, सन्मान आणि शिक्षणाचा अधिकार असणेही महत्त्वाचे आहे हे त्यांचे ठाम मत होते. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला संदेशच ‘महिला विशेष असण्या’चा आहे. महिला विशेष होती, आणि विशेषच राहील असे त्या भाषणात ठणकावून सांगत.

‘‘गोवा मला फार आवडते. गोवा एक शांत राज्य आहे. शांततेचा आणि परंपरेचा वारसा गोवेकरांना लाभला आहे. गोव्याचे आकर्षण संपूर्ण जगाला आहे. मला व कुटुंबाला इथं राहायला आवडतं. इथली संस्कृती, सण, उत्सव आवडतात. दरवर्षी चतुर्थीला मी महनीय व्यक्तींकडे जाते. त्यांचा उत्साह, गणपतीची सजावट, आरास, पंचपक्वान्न पाहून मला फार आनंद होतो,’’ असे कौतुक त्या मला सांगायच्या.

त्यांना येथील सणवार फार आवडायचे. राजभवनात तुळस होती. त्या तुळशीचे उद्यापन वा तुलसीविवाह त्यांनी केला. राजभवनात छोटंसं गणेशाचं मंदिर बांधलं. त्याची पूजा त्यांनी स्वतः केली. संपूर्ण दिवस त्यांनी तिथं बसून विधी केल्या. मान्यवरांना आग्रहाने प्रसाद दिला. दिवसभर थांबून मी थकले होते. मात्र राज्यपाल मोठ्या उत्साहाने सगळ्यांशी बोलत, निरोप घेत होत्या. त्यांना प्रत्येक कामाची आवड होती. घरसंसार, समाज, राजकारण आणि साहित्य या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्या सगळ्यांत त्या जीव ओतून काम करायच्या.
त्यांना मराठी येत नव्हती. त्यांच्या लेखाचा कॉलम मी लिहीत होते. सकाळी मी पेपर वाचण्याअगोदर मला त्यांचा फोन यायचा. माजी मंत्री डॉ. राम कृपाल सिन्हा त्यांचे पती. त्यांना मराठी येत होती. तेव्हा शब्द मागे-पुढे झाला किंवा चपखल बसला नाही तर त्या लगेच मला सांगायच्या. एक स्वच्छ हृदयाचा माणूस म्हणून मला त्या फार आवडायच्या.

एका पत्रकाराने त्यांच्या एका पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिले होते- ‘हम आम पत्रकारों की सोच में एक आक्रमकता होती है| वह लेखन में भी दिखती है| यह सब हमारे पत्रकारिय लेखन में या टीव्ही की बहस में दिखता है और दुरावा पैदा हो रहा है|
मृदुलाजी ठिक इसके उलट है| मैने अपने पुरे जीवन में रामकृपाल बाबू या मृदुलाजी ने किसी की आलोचना करते हुये नहीं सुना; निंदा की तो बात ही छोडिए| किसी को नकारते कभी नहीं सुना!’
समाजात सामाजिक-मानसिक बदल व्हावा म्हणून त्यांची जी काही तळमळ होती ती मी काही प्रमाणात पाहिली होती. साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. वेगवेगळ्या पदांवर काम करून त्यांनी लेखनकार्य चालू ठेवले याचे सगळ्यांना कौतुक आणि आश्‍चर्य वाटते. मला तर त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. अशा महान व्यक्तीला विनम्र आदरांजली!