बालपण दे गा देवा!

0
193
  • मीना समुद्र

ही लहानगी सदासतेज, चैतन्याने रसरसलेली, कुतूहलानं टुकूटुकू सगळं पाहणारी, बोबड्या चिमखड्या बोलांनी सर्वांना रिझवणारी, गळामिठी घालून गहिंवर आणणारी आणि आपल्या लाघवानं जवळच्या सार्‍यांना प्रसन्न करणारी असतात. त्यांच्या हसण्या-खिदळण्याने, खेळण्या-कुदण्याने घरात ऊबदार ऊन पसरते.

‘मग काय? आज बालदिन झाला वाटतं!’ आपल्या लहरीनुसार आमच्याकडे खेळायला येणार्‍या पिल्लोबाला विचारलं तेव्हा त्याचा हात झटकन् डोक्याकडे गेला आणि डोळ्यांत मिस्किल हसू चमकलं. आणि मग मोठा झाल्याचा आव आणून तो म्हणाला, ‘‘हां हां! दिवाळी आली ना म्हणून केला!’’ (वय वर्षे ५)
आता दिवाळी आणि बालदिनाचा काय संबंध असा प्रश्‍न पडला ना? तर ते आमच्यातलं एक गुपीत आहे. परवा दिवाळीच्या आदल्या दिवशी १४ नोव्हेंबरला पं. नेहरूंच्या जन्मदिनी येणारा तो ‘चिल्ड्रन्स डे’ आणि दीड-दोन महिन्यांतून साजरा होणारा ‘बालदिन’ म्हणजे ‘बाल’कटाई. बालवर्गात हिंदी शिकू-बोलू लागल्यावर त्याला ‘बाल’चा अर्थ माहीत झाला होता. त्यामुळेच चमनगोटा, नाहीतर घेरा, नाहीतर पालथा कटोरा किंवा पक्ष्याचा तुरा अशी वेगवेगळ्या प्रकारची त्याची ‘कटिंग’ झाली की आंघोळ करायच्या आत त्याला ते आम्हाला दाखवायचं असतं आणि ‘छान छान’ म्हणत त्याच्या ‘बालदिना’चं केलेलं कौतुकही ऐकायचं असतं. असं काहीही नवीन केलं किंवा त्याच्या शाळेत घडलं तर ते दाखवायचं, सांगायचं असतं त्याला. तशी हौस असतेच मुलांना.

कपडे असोत, खेळणं असो, काढलेलं चित्र असो, मिळालेलं बक्षीस असो… शाळेतून आल्याआल्या पायांतले बूट काढायच्या आधीच माझ्या पहिलीतल्या नातवानं मिळवलेला बक्षिसाचा कप दाखवत ‘मला पोएम रेसिटेशनमध्ये फर्स्ट प्राईस मिल्लं’ असं सांगताना त्याचा आनंदानं फुललेला चेहरा आज दहाबारा वर्षांनंतरही अजून डोळ्यांसमोर आहे. काहीवेळा वाटतं, किती अल्पसंतुष्ट असतात मुलं! पाठीवर दिलेली कौतुकाची थाप, घेतलेली गोड पापी, एखादी चॉकलेट गोळी, बिस्किट, खडीसाखरेचा किंवा गुळाचा खडा त्यांना खूश करायला पुरेसा असतो. पिल्लोबांना कधी मधाचा चमचा नाहीतर गुलाबसरबत लागतं. घरातलं मूल म्हणजे आनंदाचं मूळ असतं. त्याच्या अस्तित्वातूनच आनंद प्रकटतो, वाढतो, पसरतो; पुष्पपल्लवीत होतो; सुगंधित, सुफलित होतो. म्हणून तर सानेगुरुजींनी त्यांना ‘देवाघरची फुलं’ म्हटलं असेल ना? ही लहानगी सदासतेज, चैतन्याने रसरसलेली, कुतूहलानं टुकूटुकू सगळं पाहणारी, बोबड्या चिमखड्या बोलांनी सर्वांना रिझवणारी, गळामिठी घालून गहिंवर आणणारी आणि आपल्या लाघवानं जवळच्या सार्‍यांना प्रसन्न करणारी असतात. त्यांच्या हसण्या-खिदळण्याने, खेळण्या-कुदण्याने घरात ऊबदार ऊन पसरते. एकटेपणाच्या, विफलतेच्या काळोखात चांदण्याचे शिंपण होते. कविवर्य भा. रा. तांबे यांनी उगीच नाही म्हटलेलं- ‘घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे!’ आकाशातले तारे, त्यांचा प्रकाश, त्यांचे तेज जणू या छोट्या-छोट्या बालकांच्या रूपाने धरेवर अवतरते. देवाच्या कृपामय आशीर्वादाचा हात त्यांच्या रूपाने घराघरांत प्रसन्नता आणतो, आनंद आणतो. घरात स्वर्ग अवतरतो आणि आनंदाचे सडे पडतात. या शीतलजलाच्या शिडकाव्याने सार्‍यांची मने प्रफुल्लित होतात. मनाची मरगळ दूर होते आणि ते ताजेतवाने बनते. जिथे हे सुख नसेल तिथे मात्र घरदार, गाड्या-घोडे, नोकरचाकर, ऐश्‍वर्य असूनही ‘लेकुरे उदंड जाहली’मधल्या नायकासारखी-
‘या गोजिरवाण्या घरात माणसाला लागलंय खूळ, यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल’ अशी स्थिती होते.

मूल होणं न होणं या काहीशा दैवाधीन गोष्टी असल्या तरी आजच्या वैज्ञानिक युगात विज्ञानाच्या मदतीने अनेक मार्गांनी त्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि खटपट केली जाते. यशही येते. नवससायासांचीही जोड असतेच. शाळेत, घरात आणि जातील तिथे आपल्या निरागसपणानं ही मुलं आनंदाचे मळे फुलवीत असतात; त्यांच्याही नकळत सर्वत्र आनंदाची बाग फुलवत राहतात. त्यांच्या अचाट अफाट कल्पनांनी त्यांच्याशी बोलण्यानं, हसण्या-खेळण्यानं मनाचं नंदनवन होऊन जातं. मनाला अरलतरल पंख लागतात. नवसंजीवन प्राप्त होतं. ‘करी मनरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयांचे’ असं उगीच नाही म्हटलेलं. हे अनुभवाचे बोल आहेत. सानेगुरुजींनी म्हणून तर मुलांसाठी ‘गोड गोष्टी’ लिहिल्या. पत्रातून सुसंस्कार केले. बालकासारखं निर्व्याज हसू हसणार्‍या म. गांधींनीही मुलांवर प्रेम केलं. राजा असो वा रंक, बालकांवर प्रेम करणं आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणं, त्या ओळखून वागणं ही मानव्याची रीत आहे. केवळ वंशसातत्य एवढा एकच उद्देश त्यामागे नसतोच. नाहीतर अनाथ, अपंग अशा समाजातील बालकांवर प्रेम करणारी, त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारी माणसं कशी निर्माण झाली असती?
बालपणाची कोवळीक, त्यातला मुक्त निर्भरपणा, निर्व्याजता आणि त्यांचे अफाट कुतूहल; त्यांचा निरागसपणा हे सारंच किती हवंहवंसं वाटणारं खरं तर. त्यामुळेच त्यांचा सहवास, त्यांची संगतसोबत, नित्य नवा चैतन्याविष्कार आपल्याला भुलवतो, खुलवतो, खुळावतोही. सार्‍यांचं तसं होत असावं असंही वाटतं. मध्ये एका महिला संमेलनात ‘मला नाही मुलं फारशी आवडत’ किंवा ‘त्यांच्याबद्दल विशेष प्रेमही नाही वाटत’ असं मत एका प्रथितयश मराठी लेखिकेनं- माधुरी पुरंदरे- यांनी व्यक्त केलं तेव्हा त्यांच्या लिखाणावर मनस्वी प्रेम करणार्‍या आम्हा काही मैत्रिणींना नवलच वाटलं. जराशा चाटही पडलो आम्ही. अर्थात हे ज्याचं-त्याचं वैयक्तिक मत आणि ज्याचा-त्याचा प्रश्‍न असला तरी जिने मुलांची मानसिकता अतिशय तरल संवेदनशीलतेने जाणून घेऊन अतिशय सुंदर चित्रे त्यांच्यासाठी काढली; मुलांनाच काय मोठ्यांनाही पाहताच भावतील आणि चटकन उचलून वाचावीशी, पाहावीशी वाटतील अशी खास बालकांसाठी पुस्तके लिहिली- तीही वेगळ्या आकारात, सुटसुटीत आकारात; अतिशय सहजसोप्या भाषेत- बालकांच्या अंतःकरणाशी संवाद साधत- किशोरवयीन मुलांच्या भावजीवनाशी एकरूप होत, त्यांच्यासाठी सुंदर केवळ वेचक कथा, कविता, वेचे निवडून त्याखाली अतिशय आकर्षक, समर्पक चित्रे रेखाटली वा गोळा करून छापली आणि ‘वाचू आनंदे’ म्हणून वाचनाचे आणि जगण्याचे भान दिले- अशी ही बालस्वभावाची सखोल जाण असलेली विदुषी! त्यामुळे आम्हाला आश्‍चर्य वाटणे स्वाभाविक होते. कोण जाणे- पण साहित्य, त्यातली मतं आणि लेखकाचं वैयक्तिक आयुष्य यांची कधीकधी उगीचच सांगड घातली जाते, असंही वाटून गेलं.

‘मुलं चारपाच वर्षांपर्यंतच बरी असतात बाई! नंतर सगळा शहाणपणा कुठे जातो कोण जाणे!’ असंही कुणी बोलून दाखवतं तेव्हा वाटतं ती आपल्या आसपास घोटाळतात, आपल्यावर अवलंबून असतात, आपलं सगळं ऐकतात, त्यामुळे आपला अहंपणा जोपासला गेल्यामुळे ती तशी वाटत असावीत. पण नंतर ती बाह्यजगात गेली की त्यांना वेगळी माणसे, वेगळे विषय भेटतात आणि त्यांचे आकाश विस्तारू लागते. त्यात ती मुक्तपणे उडू पाहतात. त्यांना त्यांचं स्वत्व गवसतं आणि मग त्या नवीन जगात ती गुंततात, काही नवीन करू पाहतात. मात्र बालपणीचे संस्कार घट्ट मुळे धरून राहतात. त्यांना जमिनीची ओढ असतेच. मायेचा सोन्याचा पिंजरा सोडून त्या पाखरांनी आकाशी झेप घ्यावी हीच आपली इच्छा असते ना? त्यांनी यशवंत व्हावे, जयवंत व्हावे, कीर्तिवंत आणि बुद्धिमंत व्हावे हाच आपला ध्यास आणि त्यांना आशीर्वाद असतो. आजची सारी बालके कर्तृत्वाची शिखरे गाठोत आणि चांगले मानव बनून मनुष्यजातीला ललामभूत होवोत हीच प्रार्थना!