>> ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांचा सल्ला
बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी देखील काल मौन सोडले. बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश जिंकण्यासाठी नुसते नेते बदलून चालणार नाही. त्यासाठी पक्षाची रचनात्मक पुनर्बांधणी करावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीमुळे आपण गांधी कुटुंबाला दोष देत नाही. मात्र, पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पर्याय हवा असेल, तसेच पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर आता कॉंग्रेस नेतृत्वाने निवडणुका घेणे आवश्यक असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.
पक्षातील एका विशिष्ट गोष्टींमुळे सध्या कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. तळागाळातील पातळीवर जनतेशी संपर्क तुटला आहे. जो पर्यंत आम्ही प्रत्येक स्तरावर कॉंग्रेसच्या कार्यशैलीत बदल करत नाही, तो पर्यंत गोष्टी बदलणार नाही. पक्ष नेतृत्वाने पक्ष कार्यकर्त्यांना नियोजित कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे. विविध पदांसाठी निवडणुका घेणे देखील तितकेच गरजेचे असल्याचे आझाद म्हणाले.
या पूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी देखील बिहार निवडणुकीतील पराभवाबाबत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज व्यक्त केली होती.
पक्षनेतृत्वावर विश्वास : खुर्शीद
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षनेतृत्वावरून पक्षात दुफळी नसून सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदंबरम यांनी पक्षनेतृत्वाविषयी जाहीर मतप्रदर्शन केल्याने खुर्शीद यांनी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसमध्ये प्रत्येकाला त्यांची भूमिका मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत गोष्टी जाहीरपणे मांडणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. पक्षश्रेष्ठींनी आपले म्हणणे नेहमीच ऐकले आहे. मात्र, कोणाला संधी दिली जात नाही, म्हणणे न पटण्यासारखे आहे, असेे त्यांनी सांगितले.