नेसायमध्ये स्थानिकांनी रेलमार्गाचे काम रोखले

0
260

>> रेल्वे प्रशासन सोमवारी कागदपत्र सादर करणार

सां जुझे आरियल ‘नेसाय’ येथील रेल्वे फाटकाजवळ दुपदरी रेल्वे मार्गाचे काम रेल्वे अधिकार्‍यांनी रेल्वे सुरक्षा पोलीस दल व मायणा कुडतरी पोलिसांच्या संरक्षणात सुरू केले होते. ते काम स्थानिक पंचायत व ग्रामस्थांनी बंद पाडले. सोमवारी सकाळी १०.३० पर्यंत काम न करण्याचे वचन रेल्वे अधिकार्‍यांनी दिल्यानंतर लोक मागे हटले. मात्र त्या भागात तणाव कायम आहे.
काल शुक्रवारी सकाळी रेल्वे दुपदरी मार्गाचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी काम बंद पाडले असतानाही शस्त्रधारी पोलीस संरक्षणात ते चालू पुन्हा केले. त्यावेळी पंचायतीने व ग्रामस्थांनी रेल्वे अधिकारी व ठेकेदाराशी या कामासंबंधी भूसंपादन व पंचायतीचा ना हरकत दाखल्याची विचारणा केली. आणि जोपर्यंत कागदोपत्री पुरावे रेल्वे मंत्रालयाकडून उपलब्ध केला जाणार नाहीत तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे अधिकार्‍यांनी हे काम तात्पुरते थांबवले.
थोड्यावेळाने काम सुरू करण्यास कोणत्याच परवान्याची गरज नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगून ही जमीन रेल्वे संपादीत असल्याचे सांगितले. त्यावेळी ग्रामस्थांनी रेल्वेची संपादित जमीन कागदोपत्री दाखविण्याची व ते कागद सादर करण्याची मागणी केली. तेव्हा रेल्वे अधिकारी तसे कागद दाखवू शकले नाहीत.

रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीचे कागद व जमीन कागद सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी १०.३० वा. पंचायत व ग्रामस्थांना देण्याचे आश्‍वासन रेल्वे अधिकार्‍यांनी देत याप्रकरणी नमते घेतले. मात्र तोपर्यंत काम सुरू न करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी स्थानिकांना दिले. याप्रकरणी सरपंच मिंगेल त्रावासो यांनी कडक भूमिका घेत सांगितले की, सोमवारी सकाळी १०.३० वा. जमीन रेल्वेच्या मालकीची असल्याचे कागदोपत्री पुरावे पंचायतीला देण्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी मान्य केले आहे. सोमवारी सकाळी दुपदरीकरणाला विरोध करणार्‍या लोकांनी येथे जमा होण्याचे आवाहन त्रावासो यांनी केले आहे. त्रावासो पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत रेल्वेमंत्री गोव्यात येणार आहेत. तोपर्यंत दुपदरीकरणाचे काम करू दिले जाणार नाही असे सांगतात. पण रेल्वेचे काम सुरूच आहे. त्यासंबंधी रेल्वे अधिकार्‍यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांकडून लेखी हरकत आली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतरही लोकांनी तेथे जागता पहारा ठेवण्याचे ठरविले असून सोमवारी सकाळी लोक जमा होण्याची शक्यता आहे.