अवघा भारत देश दिवाळीच्या उत्सवी वातावरणात मग्न असताना भारत पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अगदी उरीपासून गुरेझपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने ज्या प्रकारे युद्धबंदीचे उल्लंघन केले, तो कुरापतखोरीचा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. समोरच्याचे सुख पाहावत नसलेली काही नतद्रष्ट माणसे असतात, तसे पाकिस्तानचे आहे. केवळ आणि केवळ भारताचा दुस्वास करणे हीच त्याची विदेशनीती. भारतीय हद्दीमध्ये सशस्त्र दहशतवादी घुसवण्याचा आटापिटा करायचा आणि ते शक्य झाले नाही की नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करून या घुसखोरांना वाट मोकळी करून द्यायची असा हा प्रकार जुनाच आहे. बालाकोटच्या धड्यानंतर काही काळ पाकिस्तान दातखीळ बसल्यागत गपगुमान बसला होता, परंतु आता पुन्हा खायचे दात वर आलेले दिसत आहेत. जवळजवळ चारशे घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आपल्या गुप्तचर यंत्रणांना आल्या होत्या. सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झालेली लॉंचपॅडस् पुन्हा सक्रिय झाली होती. नुकतेच मच्छील आणि केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊनच पाकिस्तानने ही कुरापतखोरी चालवली आहे हे उघड आहे. भारतीय लष्कराने ठोशास ठोसा न्यायाने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले हा भाग वेगळा, परंतु मुळामध्ये ऐन दिवाळीच्या उत्सवी वातावरणाचा असा बेरंग करण्यामागे पाकिस्तानचे दुष्ट हेतू साफ दिसतात.
केवळ नियंत्रण रेषेवर गोळीबार करूनच पाकिस्तान थांबलेला नाही, तर पाक विदेशमंत्र्यांनी मारे एक पत्रकार परिषद घेऊन भारतच कसा पाकिस्तानात दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे आणि त्याचे आपल्यापाशी कसे पुरावे आहेत, त्यासंबंधीच्या वल्गनाही काल जोरजोरात केल्या. अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीतील ‘रॉ’ची माणसेच पाकिस्तानातील विविध दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण पुरवीत आहेत, त्यांचे एकत्रीकरण करीत आहेत असा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यासंबंधीचे काही पुरावे आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे मांडण्याची धमकीही पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे बलुचिस्तान, गिलगीट – बाल्टीस्तान, खैबर पख्तुनख्वा, पाकव्याप्त काश्मीर या सर्व प्रदेशांमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याला पाकिस्तानची आजवरची दमननीतीच कारणीभूत आहे. बलुचींवरील अनन्वित अत्याचार, गिलगीट – बाल्टीस्तानातील हैदोस, पाकव्याप्त काश्मीरमधील स्वातंत्र्याच्या मागणीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न हे सगळे पाकिस्तान सतत करीत आला आहे. परिणामी या दडपशाहीविरुद्ध तेथील तरुणांनी शस्त्रे हाती घेतली तर त्याचे खापर भारतावर का? या सगळ्या असंतोषामागे भारतच आहे असा दावा पाकिस्तानने करणे मुळातच हास्यास्पद आहे. स्वतः भारत धगधगत ठेवण्याचे प्रयत्न करायचे, कारगील घडवायचे, भारताच्या संसदेवर हल्ला करायचा, आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करायचा, शहरा – शहरांतून बॉम्बस्फोट घडवायचे, काश्मीर आणि पंजाबमधील फुटिरतावादी प्रवृत्तींना सतत खतपाणी घालायचे, नक्षलवाद्यांशी संधान बांधायचे, आणि एवढे सगळे करून भारताने हे सगळे निमूट सोसायची अपेक्षा बाळगायची. वा रे वा पाकिस्तान!
नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये भारताची संरक्षणनीती आमूलाग्र बदलली आहे. आता भारत निमूट मार खाणार नाही हा संदेश पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमधूनच नव्हे, तर अगदी सर्जिकल स्ट्राईक असो अथवा बालाकोटची कारवाई असो, या सगळ्यातून धडक कृतीद्वारेही स्पष्टपणे पोहोचवला गेला आहे. एवढे असूनही जर पाकिस्तान सुधारणार नसेल तर युद्धशास्त्रामध्ये सूड उगवताना सारे क्षम्यच असते! परंतु भारत त्या पातळीवर उतरणार नाही आणि निरपराध नागरिकांचे रक्त सांडणार नाही. ती भारताची संस्कृती नाही.
बलुचिस्तानच्या लढ्याला भारताने जरूर पाठिंबा दिलेला आहे. तेथील दहशतवाद्यांना भारतीय ‘रॉ’ ने शस्त्रे पुरवली की नाही, प्रशिक्षण दिले की नाही, त्याबाबतचे पाकिस्तानचे अकांडतांडव कितपत खरे हा भाग वेगळा, परंतु पाकिस्तान जर भारताला ‘ब्लीड विथ थाऊजंड कट्स’ च्या आपल्या पूर्वापार नीतीने रक्ताळणार असेल, तर भारताने ठोशास ठोसा लगावला असे जरी मानले, तरी पाकिस्तानने कांगावा का बरे करावा? तो अधिकार त्याला आहे कुठे? दाऊद इब्राहिमपासून हाफीज सईद आणि मसुद अजहरपर्यंतच्या दहशतवाद्यांना आसरा आणि पाठबळ देणारा, भारतामध्ये सतत घातपात घडवणारा, भारताने सबळ पुरावे देऊनही कारवाई न करणारा पाकिस्तान ‘उल्टा चोर कोतवालको डॉंटे’ म्हणतात तसा भारतावरच आदळआपट करीत असेल तर त्यावर जग तरी कुठे विश्वास ठेवणार आहे??