राज्यात विवाह नोंदणी आता ऑनलाइन स्वरूपात

0
129

>> उपनिबंधक कार्यालयातील हेलपाटे वाचणार

राज्य सरकारने विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला असून आता यापुढे गोव्यात विवाह नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. विवाह नोंदणीच्या ऑनलाइन सुविधेचा शुभारंभ सोमवार १६ नोव्हेंबर २०२० पासून केला जाणार आहे, अशी माहिती कायदा मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

राज्यात दरवर्षी सरासरी अकरा हजार लग्नांची नोंदणी होते. विवाह नोंदणीसाठी इच्छुकांना उपनिबंधक कार्यालयात किमान तीन वेळा खेपा माराव्या लागतात. काही जणांना तीन पेक्षा अधिक वेळा खेपा घालाव्या लागतात. नागरिकांना होणारा हा सारा त्रास कमी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह नोंदणीसाठी इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ह्या अर्जाच्या सोबत योग्य ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शुल्क सुध्दा ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.

उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त होणार्‍या विवाह नोंदणी अर्जांवर कार्यालयातील संबंधित कर्मचारी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. अर्जदाराला फक्त एकदाच उपनिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थिती लावावी लागेल. अर्जदाराला उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहण्याच्या तारखेची माहिती एसएमएस संदेशाद्वारे दिली जाणार आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली जात आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

दरवर्षी सरासरी
११ हजार विवाह

राज्यात दरवर्षी सरासरी अकरा हजार विवाहांची नोंदणी होत असते. वर्ष २०१६ मध्ये ११,६३० लग्नाची नोंदणी झाली. वर्ष २०१७ मध्ये ११,४२६ आणि २०१८ मध्ये १०,६९८ लग्नांची नोंदणी झालेली आहे. लग्न नोंदणीच्या मागील शंभर वर्षांच्या दस्तऐवजाचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे.