आपल्याला तुरुंगात मारहाण झाली असून कुटुंबीयांशीही बोलू दिले जात नसल्याची तक्रार सध्या तुरुंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांनी केली असून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात काल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी चर्चा केली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी कोश्यारी यांनी काल सकाळी संपर्क साधला व अर्णव यांना दिल्या जाणार्या वागणुकीप्रती चिंता व्यक्त केली. त्याच्या कुटुंबियांना त्याची भेट घेऊ दिली जावी असेही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना सांगितले.
तुरुंगात मोबाईलचा वापर केल्याच्या कारणावरून अर्णव याला अलीबागहून तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. तेथे नेण्यात येत असताना अर्णव यांनी प्रसारमाध्यमांना आपल्याला तुरुंगात मारहाण झाल्याचे पोलीस व्हॅनमधून ओरडून सांगितले होते. आपल्या जिवाला धोका असून आपल्याला वकिलाशीही बोलू दिले जात नसल्याचे त्याने सांगितले होेते.