>> मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत गाठीभेटी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. यावेळी खास करून केंद्र सरकारच्या पाठिंब्याने गोव्यात सांस्कृतिक पर्यटनावर भर देऊन आतापर्यंत दुर्लक्ष झालेल्या सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याविषयी चर्चा झाली.
यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, केंद्र सरकारच्या पाठिंब्याने राज्यात सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याचा आमचा विचार आहे. त्याबाबत आपण सोमवारी केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
१९ डिसेंबर २०२० रोजी गोवा मुक्तीला ६० वर्षे पूर्ण होत असून गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला हजर राहण्याचे निमंत्रण प्रल्हाद पटेल यांना आपण दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले.
आपल्या दिल्लीच्या भेटीत काल मुख्यमंत्री सावंत यांनी सकाळी भारतीय आदिवासी सहकारी विपण्णन विकास महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रबीर कृष्णा यांची भेट घेतली. या भेटीत सावंत यांनी त्यांच्याशी प्रधानमंत्री वन धन योजना तसेच आदिवासी कल्याणाविषयीच्या अन्य योजनांबाबत चर्चा केली. बैठकीत आदिवासी कारागीरांना उत्तेजन देणे, त्यांची उत्पादने मूल्यवर्धित बनवणे, त्यांच्या वस्तूंचे ब्रॅण्डिंग करणे, पॅकेजिंग करणे व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्याबरोबर मुख्य सचिव परिमल राय हेही उपस्थित होते.