महत्त्व शक्तिउपासनेचे

0
436

योगसाधना – ४७९
अंतरंग योग – ६४

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आज कोरोनासारखा मायावी राक्षस सर्व विश्‍वाला आपल्या विळख्यात घेऊन नष्ट करायला बघतो आहे. प्रत्येकाला सर्व तर्‍हेच्या शक्तींची गरज आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि सर्वांत महत्त्वाची आध्यात्मिक.
म्हणूनच त्या सर्व सणांबरोबर शास्त्रशुद्ध योगसाधना अत्यावश्यक आहे.

भाद्रपद संपून आश्‍विन देखील संपला. यावेळी अधिक आश्‍विन. आता नीज आश्‍विन सुरू झाला. शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाली. नवरात्र आले. सर्वांनी होईल, जमेल तसे साजरे केले. दसरा (विजयादशमी) देखील होऊन गेला. प्रत्येकाच्या मनात भरपूर उत्साह आहे. पण कोरोनामुळे इच्छा असूनही हवे तसे हे उत्सव साजरे करता येत नाहीत.

खरें म्हणजे हे दिवस शक्तीच्या उपासनेचे. पौराणिक कथाच तशी आहे. महिषासुर राक्षसाने तपश्‍चर्या करून पुष्कळ शक्ती मिळविल्या. तो अत्यंत प्रभावी बनला. मनुष्यांनाच नाही तर सर्व देवांना त्याने छळायला सुरुवात केली. अनेक अत्याचार करायला लागला. सर्वांनाच ‘त्राहि माम’ करून सोडले. सगळेच सामर्थ्याविना हतबल झाले. त्यांनी त्रिदेवांची- ब्रह्मा, विष्णू, महेश यांची आराधना सुरू केली. या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचे पूजन केले. ती देवी प्रसन्न झाली. महिषासुराशी विविध दिव्य आयुधांनी सतत नऊ दिवस युद्ध करून तिने राक्षसाचा वध केला. अशा तर्‍हेने आसुरी शक्तीचा नाश होऊन दैवी राज्य पुन्हा प्रस्थापित केले. सर्वांना अभय मिळाले. मानवाच्या व देवांच्या राज्यात परत एकदा सुखसमृद्धी आली.

ही दैवी शक्ती म्हणजेच जगदंबा.
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. शक्ती कशासाठी? भौतिक फायद्यासाठी नव्हे तर आसुरी वृत्तींवर विजय मिळविण्यासाठी- आध्यात्मिक शक्ती मिळविण्यासाठी.
आपण दरवेळी विचार करतच आहोत की या सर्व कथा प्रतीकरूपात आहेत. त्यांचा फक्त शब्दार्थ नाही तर भावार्थ, गर्भितार्थ आणि सर्वांत मुख्य म्हणजे आध्यात्मिक अर्थ समजायला हवा. सर्व ज्ञानी सुशिक्षितांनी अभ्यास व चिंतन करणे अपेक्षित आहे. फक्त कर्मकांडे करून कसलाही फायदा होणार नाही. फक्त मौजमजा मात्र होणार.
हा ‘महिषासुर’ प्रत्येकाच्या हृदयात बसलेला राक्षस म्हणजे आसुरीवृत्ती आहे. आपल्यातील आत्म्याच्या दैवी शक्तीला जो त्रास करतो त्याला त्याने गुदमरवून सोडले आहे. म्हणून सुटकेसाठी, मुक्तीसाठी देवी जगदंबेची आराधना अत्यंत आवश्यक आहे. तीही हृदयापासून. राक्षस मायावी असतात. रामायणात त्याचे दर्शन होते. प्रत्येक युद्धात ते मायावी रूप घेतात. त्यामुळे त्यांचा नाश करणे कठीण होते. राम लक्ष्मणालादेखील रावणाच्या मायावी शक्तीमुळे त्याच्याकडे युद्ध करण्यास फार कष्ट पडत होते. आपणही आपल्या अंतर्गत महिषासुराच्या मायेला ओळखायला हवे. ह्यासाठीच नवरात्रीच्या नऊही दिवस अखंड दीप तेवत ठेवून माता जगदंबेची मनोभावे पूजा करतात.
बालपणी अनेक राक्षसांच्या आपणाला कथा सांगितलेल्या आहेत. त्यांचे भयानक चित्र रंगवले जाते. असुर म्हणजे मोठे शरीर, मोठे डोळे, दात, नखे… लांब केस. अगदी काळा कुळकुळीत…! सुज्ञ जनांनी असुर म्हणजे काय त्याचा अभ्यास करायला हवा. असुराची व्याख्या-
‘असुषु रमन्ते इति असुरः|’ – प्राणातच, भोगातच रममाण होणारेे म्हणजे असुर. खा, प्या, मजा करा हीच त्यांची संस्कृती असते.

तसेच ‘महिष म्हणजे रेडा’-
ह्या रेड्याची वृत्ती बाळगतो तो महिषासुर. असे म्हणतात, की रेडा स्वतःचेच सुख पाहतो. त्याला इतरांची थोडीदेखील पर्वा नसते. आजचा समाज दिवसेंदिवस स्वार्थी, स्वकेंद्रित, प्रेमविरहित, भावशून्य बनत चालला आहे. सारांश ही रेड्याची महिषासुरी वृत्ती सर्वत्र बिनविरोध पसरते आहे. व्यक्तिवाद व स्वार्थैक परवषता अमर्याद होत आहे. आज गरज आहे ती म्हणजे ह्या महिषासुर रेड्याच्या नाकात वेसण घालून त्याचे नियंत्रण करण्याची- परिणामी त्याचा संपूर्ण नाश करण्याची. म्हणूनच ह्या कठीण कार्यासाठी अमर्याद अशी शक्ती मातेकडे मागण्यासाठी हे नवरात्रीचे नऊ दिवस आहेत.
भारतीय संस्कृतीमध्ये आदिकाळापासून सर्वांनीच मानव व देव – शक्तीच्या उपासनेला अत्यंत प्राधान्य दिलेले आहे. आपले श्रेष्ठ असे महाकाव्य- महाभारत. त्याचा अभ्यास केला की लक्षात येते. त्यात क्षणाक्षणाला बलोपासना व शौर्यपूजा पूर्णपणे भरली आहे. मग ते पांडव असोत की कौरव असोत.

महर्षी व्यास, पितामह भीष्म अथवा पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण- या सर्वांची भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष, पराक्रम दाखवणारी अशीच आहेत. पांडव वनात असताना महर्षी व्यास त्यांना मुद्दाम भेटायला जातात. त्यावेळी त्यांनी शक्तीच्या उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना स्पष्टच बजावले आहे-
‘‘तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर स्वस्थ बसून चालणार नाही. शक्तीची उपासना हाच एकमेव उपाय आहे. अर्जुनाला अस्त्रे प्राप्त करण्यासाठी देवलोकी जाण्याची सूचना त्यांनीच दिली.
परमपूजनीय पांडुरंगशास्त्री सांगतात-
‘‘महर्षी व्यासांच्या ह्या उपदेशाला महाकवी भारतीने स्वतःच्या काव्यात उत्तम रितीने गुंफलेले आहे.’’
‘‘लभ्या धरित्री तव विक्रमेण ज्यायांश्च वीर्यास्त्रबलैविपक्षः|
अतःप्रकर्षाय विधिर्विधेयः प्रकर्षतन्त्रा हि रणे जयश्रीः ॥
(किरातार्जुनीयम्)

  • तुम्हाला सामर्थ्याने, पराक्रमाने पृथ्वी जिंकायची आहे. शत्रुपक्ष सामर्थ्याने व शस्त्रास्त्राने तुमच्यापेक्षा अधिक बलवान आहे. तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनायचे आहे. कारण जो अधिक सामर्थ्यशील व अधिक साधनसंपन्न असतो त्यालाच युद्धात विजय मिळतो.
    भारत देशाचा इतिहास फार उज्ज्वल आहे. पण अभ्यासल्यावर लक्षात येते की आसुरी वृत्ती सद्विचार व दैवी विचारांवर मात करते. म्हणूनच वेळोवेळी देवांना देखील भगवंतांजवळ शक्ती मागावी लागली. सामर्थ्य, बळ मागावे लागले.
    आपणातील बहुतेक सज्जनांना सद्विचार, संस्कार आहेत. पण तेवढे असून पुरत नाहीत. हात पसरून स्वस्थ बसून उपयोग नाही. त्यासाठी तपस्या हवी, कर्मयोग हवा. पण त्या सर्वांसाठी शक्ती ही मुख्य आहे. म्हणून शक्तीची उपासना अत्यावश्यक आहे.
    आज आपला भारत देश निर्बल झालेला आहे. ह्या देशावर कित्येक परदेशीयांनी आक्रमण केले. आपल्या महान राष्ट्रावर राज्य केले. मुसलमान, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच… खरे म्हणजे ही राष्ट्रे अगदी छोटीशीच होती. पण ती शक्तीची उपासक होती. त्यांच्यामध्ये ऐक्य होते. आपण मात्र वेळोवेळी एकमेकांशी भांडतच राहिलो. त्यांनी त्याचा फायदा घेतला. शेकडो वर्षे आम्हाला पारतंत्र्यात लोटले. आमच्यावर अमानुषी अत्याचार केले. सर्वांचे छळ केले. विशेषतः स्त्रिया व मुलांचे.

पू. पांडुरंगशास्त्री ह्या संदर्भात म्हणतात-
‘‘भारत निर्बल होण्याचे कारण म्हणजे वेदांनी उपदिशलेल्या व महाभारताने आदेशिलेल्या शक्तीउपासनेचा आपण उपहास करून तिचा त्याग केला. व्यास व कृष्ण त्यांच्या जिवंत व शक्तिवर्धक विचारांचे पालन आज रशिया, अमेरिका, जर्मनी व जपान येथे होत असलेले दिसते. परिणामतः ती राष्ट्रे उत्तरोत्तर संपन्न व समृद्ध बनत आहेत.’’
एक गोष्ट सत्य आहे की विश्‍वामध्ये कुठलीही नैतिक मूल्ये चांगली आहेत म्हणून टिकून उरत नाहीत. त्यासाठी समर्थ शक्तिशाली तपश्‍चर्या हवी आहे. कारण तपश्‍चर्येतच बळ असते. तपश्‍चर्या म्हणजे फक्त देवांचे नाव घेत बसायचे नाही. तर तत्त्वासाठी परिश्रम करायचे.
इतिहास साक्षी आहे- तपश्‍चर्येच्या बळाने पुष्कळवेळा असली मूल्ये देखील विजयी झाली आहेत. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार, संस्कृती ह्यांना कुणीही महत्त्व देत नाही म्हणूनच – ‘सत्यमेव जयते’ एवढेच सत्य नाही तर
‘सत्यसामर्थ्यमेव जयते’ – हेच सत्य आहे.
आपणातील प्रत्येकाने आळसाचा त्याग करून शक्ती व साधना यांचे महत्त्व समजायला हवे. सद्विचारी व्यक्तींनी एकत्र यायला हवे. कारण या कलियुगात संघाला महत्त्व आहे. म्हणून म्हणतात – ‘संघे शक्तिः कलौ युगे’|
आपल्या प्रत्येक सणाचा, उत्सवाचा विचार केला की हेच दिसून येते. अनेकजण एकत्र येऊन दैवी विचारांनी प्रभावित होऊन संगठीत होतात. नवरात्रीच्या दिवसांत केंद्रस्थानी जगदंबा देवी असते.
सर्वजन – तरुण – वृद्ध – स्त्रिया- पुरुष – एकत्र येऊन गरबा किंवा रास खेळतात. देवीच्या प्रतिमेच्या सभोवती फिरतात. ते नाचताना उत्साह, सहकार्य यांचे दर्शन घडते. त्यांच्या हातात ‘दंडे’ असतात. म्हणून त्याला ‘दांडियारास’ म्हणतात. तासन्‌तास हे लोक आनंद घेत असतात. पण आज हा फक्त एक कर्मकांडात्मक उत्सवाच्या रूपातच दिसतो.
पांडुरंगशास्त्री म्हणतात-
‘‘देवीच्या सभोवती फिरता फिरता तिला सांगितले पाहिजे….
माते! तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो. आमची महिषवृत्ती जागृत होते. आमचे दोष उफाळून येतात. त्यांना तू खाऊन टाक.’’
आज कोरोनासारखा मायावी राक्षस सर्व विश्‍वाला आपल्या विळख्यात घेऊन नष्ट करायला बघतो आहे. प्रत्येकाला सर्व तर्‍हेच्या शक्तींची गरज आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि सर्वांत महत्त्वाची आध्यात्मिक.
म्हणूनच त्या सर्व सणांबरोबर शास्त्रशुद्ध योगसाधना अत्यावश्यक आहे. आमचे योगसाधक तशी साधना करतातच म्हणा. त्यांना चिंता करण्याचे काहीही कारण नाही.
(संदर्भ: प. पू. पांडुरंगशास्त्री त्याच्या प्रवचनानंतर आधारित ‘संस्कृत पूजन’)