किंमत

0
103
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

असल्या पडलेल्या पैशांवर ताव मारणार्‍यांची किंमत किती? शंभर रुपये? ज्यानी ते कडवले ते भिकार्‍यातले भिकारी! ‘नरेचीं केला हीन किती नर’ची आठवण करून देणारी!
किंमत कळते ती अशी! अशा प्रसंगांतून व अनुभवांतून!

प्रत्येक गोष्टीला एक प्रकारची किंमत असते. वस्तूंची, पदार्थांची किंमत पैशात मोजतात. व्यवहाराला किंमत असते. मनाला, मताला असते. वागण्याला असते, उपदेशाला असते. पण ही किंमत म्हणजे पैशात मोजायची नव्हे. मग ही किंमत म्हणजे काय? तो एक प्रकारचा मान किंवा आदर असतो; जो पैशांमध्ये व्यक्त करता येत नाही! माणसाची किंमत पैशांत करता येत नाही. कोणी आपल्यावर केलेल्या उपकारांची, प्रसंगाला केलेल्या मदतीची, माणसाच्या प्रामाणिकपणाची किंमत करता येते का? आपण डॉक्टराचे सल्ले घेतो, वकिलाचे सल्ले घेतो व त्याचे पैसे त्यांना देतो म्हणजे पैशात किंमत देतो. अर्थात हा त्यांचा धंदा किंवा व्यवसायच असतो! त्यामुळेेेेे त्यानी आपल्या सल्ल्याचे पैसे घेणे म्हणजे किंमत घेणे चूक नव्हे. कोणा एकाला रस्त्यात पडलेलं पैशांचं पाकिट मिळतं, दागिना किंवा दागिने मिळतात, महत्त्वाची कागदपत्रे मिळतात. तो जर अप्रामाणिक असेल तर त्याचं फावतं, अलभ्यलाभ म्हणून. पण जर प्रामाणिक असेल तर तो त्या वस्तू पोलिस स्टेशनवर नेऊन देतो, कोणाला तरी सांगतो, वर्तमानपत्रात जाहिरात पण देतो की त्या ज्या कोणाच्या वस्तू असतील त्यानी ओळख पटवून घेऊन जाव्या. वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली असेल तर त्याचा खर्च मागतो व ते रास्तही आहे. अशा प्रामाणिकपणाची किंमत कशी करायची व किती करायची, कशा-कशावरून करायची, त्याचा मापदंड काय? अशावेळी कदाचित बक्षीस दिलं जातं; किंमत नव्हे! मग ते पैशात किंवा इतर कसल्या स्वरूपात असेल.

पण काही माणसं अशी असतात की त्याना प्रसंगी कोणी मदत केली, उपकार केले तर त्याची किंमत पैशात मोजून ते फेडायचा प्रयत्न करतात. पैशाला आशाळभूत असेल तर तो पैसे घेतो. पण जे खरे प्रामाणिक, सज्जन असतात ते पैसे घेत नाहीत; त्यांना ‘आभार’ व्यक्त केले तरी चालते; नाही केले तरी चालते. पैसे घेतले तर मदतीची, उपकाराची ती परतफेड ठरते, फेडलेल्या कर्जासारखी; कर्ज फेडलं की हिशेब संपला अशी!

दिवस शनिवार. उद्या सुट्टी… वीक एण्ड! आम्ही चौघे मित्र रात्रीचं जेवण करून गप्पागोष्टी, विनोद करत घराजवळच असलेल्या एका अड्‌ड्यावर बसलो होतो. गप्पागोष्टीत वेळ कसा व कधी संपतो ते कळतच नाही. म्हणता म्हणता रात्रीचे अकरा वाजून गेले. आम्ही सर्व आपापल्या घरी जायला उठलो, तेही रमतगमत. एवढ्यात एक स्कूटर रस्त्यावर थांबली. स्कूटर पंक्चर झाली होती. स्कूटरवर दोघेजण. एक चालवणारा व एक पाठीमागे. आम्हाला विचारलं, ‘‘इकडे मेकॅनिक मिळेल का?’’ रात्रीचे जवळजवळ साडेअकरा; अशावेळी मेकॅनिक कुठे मिळणार? म्हणाले, ‘‘आम्ही एका देवाच्या उत्सवाला चाललो आहोत. या इलाक्यात आम्ही नवीन.’’ आम्ही सांगितलं, ‘‘स्टेपनी काढून लावा म्हणजे झालं. मेकॅनिक कशाला?’ स्कूटरची डिक्की उघडली तर त्यात एकसुद्धा हत्यार नाही! पाना नाही की काही नाही! आम्हाला म्हणाले, ‘‘कृपा करून बघा ना, कोण जवळपासचा मिळतो का.’’ एवढ्या रात्री कोण मिळणार? आमच्यापैकी दोघांकडे स्कूटरी होत्या. आमची हत्यारं आम्ही आणली व आम्हीच मेकॅनिक बनतो. कोणी टायर काढायचा प्रयत्न केला, कोणी स्टेपनी; दोन्हीही बसवलेल्या जागेवरून हलेनात! नट बोल्ट गंजून गेलेले. महत्प्रयासानं आम्ही त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेत पास झालो. स्टेपनी व्यवस्थित बसवली व स्कूटर चालू करून दिली. देव बर्‍यापैकी पावला! खरं म्हणजे आम्हीच ते देव! मजा म्हणजे त्यानी आम्हाला कामाचा मोबदला विचारला. आम्हाला तिडक आली. आम्ही म्हटलं, ‘आम्हाला काही नको, चला तुम्ही, तुमचं काम झालं!’ एकानं खिशात हात घातला आणि शंभराची नोट काढली व आमच्यापुढे केली, चहापाण्यासाठी! आम्ही म्हटलं शंभर नव्हे आमच्या कामाचे पाचशे रुपये द्या.

‘‘आमच्याकडे पाचशे रुपये आता नाहीत.’’
‘‘तर स्कूटर स्टार्ट मारा व निघून जा. तुम्हाला पावला तो देव नव्हे, आम्ही! आमच्यातले तिघेजण शिक्षक आहेत व एक बँकेत काम करतो. अशा अपरात्री आम्ही तुम्हाला मदत केली त्याची तुम्ही चहापाण्याशी तुलना व किंमत केली?’’
ते ओशाळले. त्या माणसांची किंमत आम्हाला कळली. आम्हाला आमची किंमत सांगावीच लागली. आम्ही त्यांचेच आभार मानले आम्हाला सेवेची संधी दिल्याबद्दल!
दुसरी गोष्ट, माझ्या एका मित्राला शहरातल्या मुख्य बसस्टॅण्डवर मिळालेल्या शंभर रुपयांच्या नोटीची. तो एका दूरच्या गावी जाणार्‍या बससाठी थांबला होता. बस सुटण्याची वेळ झाली होती, पण अजून स्टँडला लागली नव्हती. त्याच्या पायाकडे पडलेली एक शंभर रुपयांची नोट त्याला दिसली. थोडावेळ त्यानं वाट बघितली कोणी येतो का म्हणून; पण कोणी आला नाही. त्यानं ती नोट उचलली कोणा गरिबाला देण्यासाठी. पण आजूबाजूला बघूनही असा कोणी दिसला नाही. बस कधीही येऊन लागेल व सुटेल. त्याला साधारणसा ‘अप टू डेट’ असा एक असामी दिसला त्याच्याकडे त्याने ती नोट दिली व सांगितले की कोणी गरीब मनुष्य दिसला तर त्याला ते पैसे दे.

पैसे घेऊन तो मनुष्य गेला. अजून दहा मिनिटांपर्यंत बस आली नाही म्हणून व्यवस्थापनाकडे चौकशी केली तेव्हा कळलं की बस अर्धा तास उशिरानं सुटेल. माझ्या मित्रानं तोपर्यंत स्टण्डमध्ये फेरफटका मारला. त्याचं लक्ष स्टॅण्डमधल्या कॅण्टीनकडे गेलं. ज्या मनुष्याकडे त्याने ती नोट दिली होती तो त्याच्या आणखी दोन मित्रांसमवेत भाजी-पुरी खात असताना दिसला. माझा मित्र आणखी थोडावेळ तिथेच थांबला. तोपर्यंत एक छोटंसं पार्सल पण त्या मनुष्याकडे वेटरनं आणून दिलं. खाणं संपल्यावर तिघेही बाहेर आले. माझा मित्र तिथे उभा होताच. त्यानं विचारलं, ‘‘मी दिलेले शंभर रुपये कोणा गरिबाला दिलेस का?’’ त्याचं उत्तर, ‘‘आम्हीच भाजीपुरी खाल्ली, कारण असले उघड्यावर मिळालेले पैसे खिशात ठेवायचे नसतात, कडवायचे असतात.’’
धन्य-धन्य त्यांची!
असल्या पडलेल्या पैशांवर ताव मारणार्‍यांची किंमत किती? शंभर रुपये? ज्यानी ते कडवले ते भिकार्‍यातले भिकारी! ‘नरेचीं केला हीन किती नर’ची आठवण करून देणारी!
किंमत कळते ती अशी! अशा प्रसंगांतून व अनुभवांतून!