वार्षिक सनबर्न महोत्सव यंदा २७, २८ व २९ डिसेंबर रोजी वागातोर येथे होणार असून राज्य सरकारने या महोत्सवासाठी तत्वत्त: मान्यता दिली आहे, अशी माहिती काल पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. यंदाचा महोत्सव हा कोविड महामारीमुळे तुलनेने बराच लहान व मर्यादित स्वरुपाचा असेल. महोत्सवासाठी आयोजकांना परवाना देताना गृहमंत्रालयाच्या एसओपीचा अवलंब करण्याची अट घालण्यात आल्याचे आजगावकर म्हणाले. यंदा फक्त १० ते १५ हजार लोकांनाच या महोत्सवात सहभागी करून घेण्याची अट आयोजकांना घालण्यात आली आहे. सनबर्नचे आयोजन करणार्या ‘परसेप्ट’ कंपनीकडून सरकारला करोडो रु. येणे असून हे सर्व पैसे फेडण्याची अटही कंपनीला घालण्यात आली असल्याची माहिती आजगांवकर यांनी दिली.