>> सालेली प्रकरण सीबीआयकडे द्या
भाजपचे पर्ये मतदारसंघातील उमेदवार विश्वजीत कृ. राणे यांच्यावर सालेली येथील शाणू गांवकर या युवकाचा २००६ साली होंडा येथे गोळ्या झाडून खून केल्याचा जो आरोप आहे ते प्रकरण चौकशीसाठी सीबीआय्कडे सोपवण्यात यावे अशी मागणी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी काल उच्च न्यायालयाकडे
केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला लिहिलेल्या पत्रातून रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे की या खुनासंबंधीचे पुरावे समोर आलेले असताना एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या व केंद्रीय मंत्र्याच्या सूचनेमुळे पोलीस तपासकामात रस घेत नाहीत. विश्वजीत राणे यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचेही ऍड. रॉड्रिग्ज यांनी न्यायालयाच्या नजरेत आणून दिले आहे.
२००५ साली जेव्हा पृथ्वीराज कृ. राणे यांची हत्या झाली होती तेव्हा पृथ्वीराज यांच्या पत्नीने पृथ्वीराज याचे बंधू विश्वजीत कृ. राणे यानीच आपल्या भावाची कट रचून हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी असल्याचेही ऍड. रॉड्रिग्ज यांनी पत्रातून म्हटले आहे.
शाणू गावकर याचे निधन कसे झाले हे गोव्यातील जनता तसेच त्याच्या कुटुंबीयांना कळायला हवे, असेही रॉड्रिग्ज यांनी पत्रातून म्हटले आहे.