चेन्नईचा सुपर विजय; पंजाब स्पर्धेबाहेर

0
247

>> ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे अर्धशतक

>> लुंगी एन्गिडीचा प्रभावी मारा

चेन्नई सुपर किंग्जने काल रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ गडी राखून विजय मिळवत त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईचे आव्हान यापूर्वीच आटोपले आहे. ‘प्ले ऑफ’मधील प्रवेशासाठी पंजाबला काल कोणत्याही परिस्थितीत विजयाची आवश्यकता होती. परंतु, फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्यानंतर गोलंदाजही निष्प्रभ ठरल्याने पंजाबला गाशा गुंडाळावा लागला आहे. पंजाबने विजयासाठी ठेवलेले १५४ धावांचे माफक लक्ष्य चेन्नईने १८.५ षटकांत केवळ १ गडी गमावून गाठत मोहिमेचा शेवट गोड केला.

विजयासाठी १५४ धावांचा पाठलाग करताना फाफ ड्युप्लेसीला अर्धशतकाने हुलकावणी दिली, ऋतुराज गायकवाडने सलग तिसरे अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला. फाफ आणि ऋतुराज गायकवाड जोडीने चेन्नईला धडाकेबाज सलामी मिळवून दिली. या दोघांनी ९.५ षटकांत ८२ धावांची खणखणीत भागीदारी केली, पण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना ड्युप्लेसी ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा काढून माघारी परतला. जॉर्डनने त्याला झेलबाद केले. यानंतर पंजाबला चेन्नईचा दुसरा गडी बाद करणे शक्य झाले नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने अंबााती रायडूच्या मदतीने संघाला विजयी केले. ऋतुराजने ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावा केल्या. रायडूनेही नाबाद ३० धावा केल्या. या द्वयीने दुसर्‍या यष्टीसाठी ७२ धावांची अविभक्त भागीदारी केली.

तत्पूर्वी, लुंगी एन्गिडीच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर चेन्नईने पंजाबच्या संघाला २० षटकात ६ बाद १५३ धावांत रोखले. एन्गिडी सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने राहुल आणि अगरवाल या धोकादायक सलामीवीरांना बाद करत पंजाबवर दडपण आणले. विशेष म्हणजे या दोघांचा त्याने त्रिफळा उडवला. त्याच्यासह ठाकूर, ताहीर आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी घेतला. पंजाबकडून दीपक हुडा याने ३० चेंडूत ६२ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. हुडासह राहुलने २९ आणि अगरवालने २६ धावांचे योगदान दिले.

चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले. फिटनेस चाचणी पास केल्यानंतर फाफ ड्युप्लेसी याचे संघात पुनरागमन झाले. इम्रान ताहीरही संघात परतला. त्यामुळे शेन वॉटसन व मिचेल सेंटनर यांना बाहेर बसावे लागले. कर्ण शर्माची जागा शार्दुल ठाकूरने घेतली. पंजाबने आपल्या संघात दोन बदल करताना ग्लेन मॅक्सवेल व अर्शदीप सिंग यांना वगळून जिमी नीशम व मयंक अगरवाल यांना पुन्हा संधी दिली.

धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल त्रि. गो. एन्गिडी २९, मयंक अगरवाल त्रि. गो. एन्गिडी २६, ख्रिस गेल पायचीत गो. ताहीर १२, निकोलस पूरन झे. धोनी गो. ठाकूर २, मनदीप सिंग त्रि. गो. जडेजा १४, दीपक हुडा नाबाद ६२ (३० चेंडू, ३ चौकार, ४ षटकार), जिमी नीशम झे. गायकवाड गो. एन्गिडी २, ख्रिस जॉर्डन नाबाद ४, अवांतर २, एकूण २० षटकांत ६ बाद १५३
गोलंदाजी ः दीपक चहर ३-०-३०-०, सॅम करन २-०-१५-०, शार्दुल ठाकूर ४-०-२७-१, लुंगी एन्गिडी ४-०-३९-३, इम्रान ताहीर ४-०-२४-१, रवींद्र जडेजा ३-०-१७-१
चेन्नई सुपर किंग्ज ः ऋतुराज गायकवाड नाबाद ६२ (४९ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), फाफ ड्युप्लेसी झे. राहुल गो. जॉर्डन ४८ (३४ चेंडू, ४ चौकार, २ षटकार), अंबाती रायडू नाबाद ३०, अवांतर १४, एकूण १८.५ षटकांत १ बाद १५४
गोलंदाजी ः जिमी नीशम ३-०-२६-०, मोहम्मद शमी ४-०-२९-०, ख्रिस जॉर्डन ३-०-३१-१, रवी बिश्‍नोई ४-०-३९-०, मुरुगन अश्‍विन ४-०-१७-०, ख्रिस गेल ०.५-०-५-०