कोरोना बळींची संख्या ६०० जवळ

0
97

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६०० च्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने ४३ हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात चोवीस तासांत आणखी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकूण संख्या ५९७ झाली आहे. तर, नवीन २३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार २०१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २४३६ एवढी झाली आहे.
बांबोळी येथील गोमेकॉतील कोविड प्रयोगशाळेत नवीन १६८३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २३३ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ९७ हजार ०७५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

१९४ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी १९४ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार १६८ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९७ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखीन ८३ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ५८१ एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन ५२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

आणखी ५ रुग्णांचा बळी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत १६९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आल्तिनो येथील ५८ वर्षीय महिला, कर्नाटकातील ५५ वर्षीय महिला, फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ६० वर्षीय पुरुष आणि साखळी येथील ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले.

पणजीत नवे १७ रुग्ण
पणजी परिसरात नवे १७ रुग्ण आढळून आले असून पणजीतील रुग्णांची सध्याची संख्या ११६ झाली आहे. उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक १३१ रुग्ण आहेत. चिंबल येथे १२८ रुग्ण, कांदोळी येथे ११० रुग्ण आहे. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक २१८ रुग्ण आहेत. फोंडा येथे १५४ आणि वास्को येथे ११७ रुग्ण आहेत. इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरापेक्षा कमी आहे.

राज्यातील दक्षिण आणि उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील बहुतांश खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ९५ रुग्ण आणि दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ९३ रुग्ण उपचार घेत आहेत.