बायंगिणी कचरा प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा निर्णय नाही ः लोबो

0
266

बायंगिणी ओल्ड गोवा येथील नियोजित २५० टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्य ठिकाणी हालविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हा कचरा प्रकल्प अन्य ठिकाणी नेऊ इच्छित असल्यास त्याला आक्षेप घेतला जाणार नाही, असे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बायंगिणी कचरा प्रकल्पाला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ना हरकत दाखला दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या देखरेखीखाली कचरा प्रकल्प उभारला जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

तिसवाडी तालुक्यात कचरा प्रकल्पाची नितांत गरज आहे. या तालुक्यातील ओल्या व सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने कचरा मांडवी नदी, तलाव व इतर ठिकाणी फेकला जातो. तिसवाडी तालुक्यात कचरा प्रकल्प उभारणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.

सीप्लेनचा प्रस्ताव नाही
राज्यात पर्यटनासाठी सीप्लेनचा कोणताही प्रस्ताव नाही, असे बंदर कप्तानमंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. मांडवी नदीतील बंदर कप्तान खात्याच्या फ्लोटींग जेटीवर रविवारी एक सीप्लेन उतरले होते. पर्यटनासाठी सीप्लेनचा वापर करण्यासाठी पूर्वी परवाना दिला होता. तथापि, विद्यमान सरकारने सीप्लेनसाठी परवाना दिला नसल्याचे लोबो म्हणाले.