अतिचंचल बालकांना सांभाळताना…

0
316
  • डॉ. प्रदीप महाजन

३७ आठवड्यांच्या आधी झालेला जन्म, जन्मवेळेचे कमी वजन, गर्भावस्थेत वा नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत, गर्भारपणात आईने केलेले अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान, शिसे यासारख्या विषारी गोष्टींचा बालवयात आलेला अवाजवी संपर्क यामुळे अतिचंचलता अवस्था निर्माण होऊ शकते.

कोरोना देशात येऊन आज जवळपास ८ महिने होत आहेत. हळूहळू लॉकडाऊनचे नियम टप्प्या-टप्प्याने शासनाने शिथिल केले असले तरीदेखील नागरिक काळजीपोटी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करायचा की नाही या व्दिधा मनःस्थितीत असून प्रवास केला तर संसर्ग कसा टाळता येईल याबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करताना घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जे घरी राहिल्यानंतर पुन्हा कित्येक महिन्यांनंतर बाहेर पडण्यास सक्षम असल्याबद्दल उत्साही होतील. लवकरच शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून कोविड १९चा संसर्ग रोखण्यासाठी घरातील मुलांना वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेच्या इतर बाबींबद्दल माहिती देणे महत्त्वाचे आहे.

लहान मुले ही अतिशय चंचल असल्याचं आपण पाहतो. अशा मुलांना या टाळेबंदीत सांभाळणे पालकांना अवघड होऊन बसले आहे. अभ्यासात किंवा कोणत्याच गोष्टीत लक्ष केंद्रित करता न येणं, एका जागी स्वस्थ, जास्त वेळ न बसणं अशी लक्षणं लहान मुलांमध्ये सहज पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जेव्हा गंभीर रूप धारण करतात तेव्हा ते मानसिक आजाराचं लक्षणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच अशा मुलांमध्ये उतावळेपणा जास्त वाढतो. या मुलांना सांभाळणं पालकांनाही दिवसेंदिवस कठीण होतं. लहान मुलांमधील या मानसिक विकाराला ‘‘अटेंशन डेफिसीट हायपर ऍक्टीव्हीटी डिसऑर्डर (एडीएचडी)’’ असं म्हणतात. ही लक्षणं साधारण सहा ते बारा वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये पाहायला मिळतात. वेळीच या आजारावर उपचार केले नाही तर आणखीन गंभीर रूप धारण करू शकतात. बर्‍याच प्रकरणात अतिचंचलता ही पालकांकडून काही गुणसूत्रांद्वारे संक्रमित होते. संशोधनामधून असे समोर आले आहे की अतिचंचलता अवस्था असणार्‍या लोकांच्या मेंदूची रचना इतर लोकांपेक्षा काही अंशी वेगळी असते. तसेच या लोकांच्या मेंदूच्या वाढीला इतर लोकांच्या मेंदूच्या वाढीपेक्षा जास्त काळ लागतो.
काही वेळा ३७ आठवड्यांच्या आधी झालेला जन्म, जन्मवेळेचे कमी वजन, गर्भावस्थेत वा नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत, गर्भारपणात आईने केलेले अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान, शिसे यासारख्या विषारी गोष्टींचा बालवयात आलेला अवाजवी संपर्क यामुळे अतिचंचलता अवस्था निर्माण होऊ शकते. याचे निदान काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या वर्तनाबाबत काही चिंता किंवा शंका असल्यास त्यांनी मनोविकार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. योग्य निदान झाले तर वेळीच उपचार होऊ शकतात. औषधोपचारांबरोबर ‘एडीएचडी’ समस्या शास्त्रीय माहिती, विचार वर्तनोपचार, वेळेचे नियोजन, सुस्पष्ट सीमारेषा व सूचना, सकारात्मकता, प्रोत्साहनात्मक गोष्टी, सविस्तर निरीक्षण, नियमित व्यायाम, सकस आहार आणि शांत झोप यासारख्या सवयींमुळे दूर करता येते. रोजच्या आयुष्यात अतिचंचलतेमुळे या मुलांना प्रत्येक अवस्थेशी जुळवून घेणे कसे शक्य होईल हे पालकांनी जाणून घ्यावे.

अशा चंचल मुलांना अनलॉक आणि स्वच्छतेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे शिकवण्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की ही माहिती त्यांना आत्मसात करण्यास किंवा त्यादृष्टीने क्रिया करण्यास काहीसा गोंधळ उडू शकतो. तसेच काही कालावधी लागू शकतो. म्हणून, जास्तीत जास्त माहिती देऊन मुलांवर ते आत्मसात करण्याचे ओझे येऊ देऊ नका. त्यांना विशिष्ट कालावधी देणे गरजेचे आहे.
आपण ज्या पद्धतीने माहिती पोहचविता त्या दृष्टीने ती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष प्रयत्न करा. उदाहरणार्थ,

  • आपण सूचनांसह पोस्टर किंवा प्लेकार्ड बनवू शकता.
  • मुलांना शिकवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चित्र, चित्रांच्या माध्यमातून त्यांना माहिती आत्मसात करणे अधिक सोपे ठरते.
    न्यूरो-डेव्हलपमेन्टल परिस्थिती असलेल्या मुलांना शाळेत परत जाताना अतिरिक्त आव्हानांचा सामना करावा लागू नये याची विशेष खबरदारी घ्यावी. पालकांनी आपली मुले सुरक्षित आहेत याची विशेष खबरदारी घ्यावी.