राजकीय आव्हान

0
275

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कोणाशीही हातमिळवणी न करता आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी नुकताच व्यक्त केला. गेल्या निवडणुकीत जनतेने भरघोस सतरा आमदार निवडून देऊनही आपसातील लाथाळ्यांपोटी सरकार बनवता न आलेल्या, आपले बहुतेक आमदार भाजपने टाकलेल्या गळात गमावून बसलेल्या आणि आजवर प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही स्वतःचे अस्तित्व नीट दाखवून न देऊ शकलेल्या कॉंग्रेसमध्ये या निर्धारातून थोडी तरी धुगधुगी येईल अशी अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी पक्षसंघटना मजबूत हवी, त्यामुळे येणार्‍या काळामध्ये बुथ पातळीवर पक्ष मजबूत करण्याचा विचारही गुंडूराव यांनी बोलून दाखविला आहे. कॉंग्रेसचा प्रत्येक प्रभारी जेव्हा राज्यात पाऊल टाकतो, तेव्हा राज्यातील गलितगात्र पक्ष संघटनेला नवसंजीवनी आपणच देणार आहोत असा त्याचा एकूण आव असतो. यापूर्वीही अनेकदा अशा वरून येणार्‍या प्रभारींनी असला अतिआत्मविश्वास बोलून दाखवून शेवटी हात पोळून घेतले आहेत. प्रदेश कॉंग्रेसमधील तरुण तुर्क नेते स्वतःची राजकीय कारकीर्द घडविण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी का होईना, प्रतिकूल परिस्थितीतही पक्षकार्यात स्वतःला झोकून देताना दिसतात, परंतु कॉंग्रेसमध्ये सर्वांत मोठी कमतरता काय असेल तर पक्षातील बडे नेते मात्र स्वतःची कातडी बचावूनच वावरताना दिसतात. पक्षासाठी वैयक्तिक झळ सोसण्याची त्यांची तयारी दिसत नाही. गोव्यातील कॉंग्रेसचे खरे दुखणे हे आहे.
आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा जो निर्णय कॉंग्रेसने इतक्यातच घेऊन टाकलेला आहे, तो कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपकारक जरी असला, तरी राजकीयदृष्ट्या कितपत लाभदायक ठरेल याबाबत शंका आहे, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वशक्तिमान बनलेल्या भारतीय जनता पक्षाला समर्थपणे रोखायचे असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणे हाच गुरुमंत्र आहे. जेथे जेथे तो प्रभावीपणे अवलंबिला गेला, तेथे यशस्वी ठरला आहे. विरोधकांनी स्वतंत्रपणे लढणे म्हणजे शेवटी भाजपला फायदा करून देणारेच ठरते, कारण निवडणुकोत्तर अशा कुंपणावरील लोकांना जवळ करून सत्ता काबीज करणे हा आतापावेतो भाजपचा हातखंडा बनलेला आहे. खरे तर कॉंग्रेसला राज्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका स्वीकारून सर्व विरोधी पक्षीयांना एकत्र आणता आले असते, परंतु स्वबळाची भाषा बोलून कॉंग्रेसने मुहूर्तालाच कुजका नारळ फोडला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षविस्तारामागे अत्यंत सुनियोजितपणे लागलेला दिसतो आहे. काल किरण कांदोळकरांना त्यांनी पक्षात सामावून घेतले. आम आदमी पक्ष पुन्हा एकवार नव्या जोमाने राज्यात अवतरलेला आहे आणि ‘ऑक्सिमीटर’मोहिमेपासून प्रत्यक्ष आंदोलनांपर्यंत सर्व दृष्टींनी सक्रिय होऊ लागला आहे. गेल्यावेळी ‘आप’ ला पडलेला विशिष्ट मंडळींचा गराडा यावेळी दूर सारला गेला असल्याने तेवढी त्याला यावेळी राज्यात पदार्पणाची अधिक संधी आहे. बहुजनसमाजाचा आवाज असलेला मगो पक्ष अजूनही झालेल्या धुळधाणीतून वर आल्याचे दिसत नाही, कारण त्याचे आर्थिक स्त्रोत आता मर्यादित झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सरकार गेल्या निवडणुकीनंतर रातोरात सर्जिकल स्ट्राइक करून सत्तेवर आले आणि घाऊक पक्षांतरांच्या बळावर मजबूतही बनले, परंतु त्याला नैतिक पाया नाही. त्याचे प्रशासनही यावेळी ढेपाळलेले आहे. कोरोनासंदर्भातील कामगिरी तर निराशाजनक आहे. केवळ नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर आणि सत्ता काबीज करण्याच्या खटपटी – लटपटींवर नेहमीच यश मिळत नसते हे शेजारच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी दाखवून दिलेलेच आहे. त्यामुळे आपली सत्तेची गुर्मी सोडून अधिक लोकाभिमुक होण्यासाठी पक्षाने कंबर कसणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या वास्तवाची जाण आहे, परंतु त्यांना अभिप्रेत असलेली ‘अंत्योदया’ची भूमिका पक्षातही झिरपण्याची आवश्यकता आहे. राज्यात भाजपा पर्रीकरांच्या मृत्युपश्‍चात् उफाळलेल्या बेदिलीतून वर येऊ शकलेला दिसत नाही. सत्ता बळकट करण्याच्या हव्यासापोटी पक्षात आणल्या गेलेल्या उपर्‍यांमुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे. चर्चसंस्था पक्षापासून दूर आहे. पर्रीकरांसारखा सर्वांना जोडणारा नेता यावेळी नाही. त्यामुळे सत्तेच्या गुर्मीत आणि अतिआत्मविश्वासात न राहता या सार्‍या परिस्थितीचा साकल्याने विचार भाजपने निश्‍चितच करावा लागेल!