>> तिरंगा वादात नॅशनल कॉन्फरन्सनेही हात झटकले
काश्मीरमध्ये राज्याचा जुना ध्वज उभारू दिला जाणार नसेल तर आपला पक्ष यापुढे भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण करणार नाही या पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संतप्त पडसाद उमटू लागले असून खुद्द काश्मीरमध्ये तीन नेत्यांनी काल त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला. टी. एस. बाजवा, वेद महाजन आणि हुसेन वफ्फा अशी या नेत्यांची नावे आहेत.
गुपकार घोषणापत्राद्वारे पीडीपीची साथ देणार्या नॅशनल कॉन्फरन्सनेही या वादातून अंग काढून घेतले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते देवेंद्रसिंग राणा यांनी सांगितले की आपला पक्ष देशाची एकता आणि अखंडता यांच्याशी प्रतारणा करणार नाही. राणा हे नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मूतील नेते आहेत. आपली नाराजी आपण पक्षनेते फारुख अब्दुल्ला व उमर अब्दुल्ला यांच्याही कानी घातली असून गुपकार गटातील कोणत्याही नेत्याकडून राष्ट्रहितास हानी पोहोचवणारे वक्तव्य यापुढे केले जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याचे राणा यांनी सांगितले.