केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री असलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे सुमारे अडीच महिन्यानंतर आज सोमवारी नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तेथे जाऊन आपल्या कार्यालयातील सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली.
गेल्या १४ ऑगस्ट रोजी नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोविडमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना दोनापावला येथील खासगी इस्पितळात सुमारे महिनाभर उपचार घ्यावे लागले होते. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एम्स येथील इस्पितळातील डॉक्टरांचे एक पथकही गोव्यात आले होते.
कोविडमधून मुक्त झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे नाईक यानी सुमारे महिनाभर गोव्यात राहून विश्रांती घेतली. मात्र, विश्रांतीच्या काळात गोव्यातूनच त्यांनी आपल्या दोन्ही खात्याच्या फाईल्स हाताळल्या होत्या. आता प्रकृती सुधारल्याने त्यांनी नवी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.