‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ’मन की बात’ मध्ये नागरिकांना सण आणि उत्सवाच्या या काळात संयम बाळगा असे आवाहन केले. देशातील नागरिकांना पंतप्रधानांनी दसर्याच्या शुभेच्छाही दिल्या.
दसरा सणानिमित्त ठिकठिकाणी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा सर्वच कार्यक्रमांवर अनेक निर्बंध आहेत. दसर्याचा हा सण असत्यावर सत्याचा विजय आहे. परंतु, एकातर्हेने हा दिवस संकटावर धैर्याचा विजयाचाही सण असल्याचे मोदी म्हणाले.
स्वदेशीचा मंत्र
कोरोनाच्या या संकटकाळात आपल्याला संयम बाळगायचा आहे. यापुढे आणखीही अनेक सण येत आहेत. सण आणि बाजार एकमेकांशी जोडलेले आहेत. यंदा खरेदी करताना तुम्हाला व्होकल फॉर लोकलचा संकल्प ध्यानात ठेवायचा आहे. बाजारातून खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या असे आवाहन त्यांनी केले.
जवानांसाठी दिवा लावा
यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सैनिकांना दसर्याच्या शुभेच्छा देताना यंदा दिवाळीत सीमेवर तैनात सैनिकांच्याही नावाने एक दिवा लावावा, असे आवाहन नागरिकांना केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ३१ ऑक्टोबर रोजी देशाने गमावले. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.