>> सरसंघचालक मोहन भागवत यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन
सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही. सीएएविरोधी देशात निदर्शने झाली. निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण सीएएचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर कोरोनाचे संकट आल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल सांगितले.
ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव काल रविवारी नागपुरात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला कवायती नव्हत्या. तसेच यावेळी फक्त ५० स्वयंसेवकांचा सहभाग होता. सरसंघचालक भागवत यांनी हेडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केले. त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली.
चीनपेक्षा शक्तिशाली होण्याची गरज
पुढे बोलताना श्री. भागवत म्हणाले की, कोरोना काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल माहिती नाही. त्यामुळे भारताला चीनपेक्षा आधिक शक्तिशाली होण्याची गरज असल्याचे भागवत म्हणाले. यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. या काळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आले. शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. हे निर्णय देशाने संयमाने स्वीकारल्याचे भागवत म्हणाले.
सरकार पाडून दाखवा : ठाकरे
मी ज्यावेळी मुख्यमंत्रिपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेकजण हे सरकार पडेल म्हणून स्वप्न बघत आहेत. तेव्हा दिल तसेच आजही मी आव्हान देतोय की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे खुले आव्हान पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला दिले. दसर्या मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असाही सवाल त्यांनी केला.