>> पीपीपी सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी सुकाणू समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत मध्यप्रदेशातील कोळशाच्या खाणीसाठी सल्लागार कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कोळसा खाणीचा विकास व चालविण्यासाठी येत्या १० नोव्हेंबरपर्यंत निविदा जारी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा सरकारच्या औद्योगिक विकास मंडळाला वर्ष २०१९ मध्ये मध्यप्रदेशात एक कोळसा खाण मंजूर झालेली आहे. राज्य सरकारला ही कोळसा खाण अद्यापपर्यंत कार्यान्वित करण्यात यश प्राप्त झालेले नाही. या कोळसा खाणीसाठी सल्लागार कंपनीची निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गोवा औद्योगिक मंडळाला मंजूर झालेली ही खाण पीपीपी तत्त्वांवर चालविली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी सुकाणू समितीच्या बैठकीत कोळसा खाणीच्या सल्लागारपदासाठी आलेल्या कंपन्यांच्या अर्जांवर चर्चा करून एका कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीपीपी सुकाणू समितीने घेतलेला निर्णय राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर कोळसा खाणीसाठी सल्लागार कंपनीची अधिकृतपणे निवड केली जाणार आहे. कोळसा खाणीच्या सल्लागारपदासाठी दोन-तीन कंपन्यांनी अर्ज केले होते. सल्लागार कंपनीकडून कोळसा खाणीचा विकासाबाबत सल्ला घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
औद्योगिक मंडळाच्या संचालक
मंडळाची नियुक्ती प्रलंबित
गोवा औद्योगिक मंडळाच्या संचालक मंडळाची मुदत पूर्ण होऊन महिना उलटला तरी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती प्रलंबित आहे. या मंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन टिकलो यांनी बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, संचालक मंडळाची मुदत संपलेली असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या मंडळाच्या संचालक मंडळाचा विषय लवकरच मार्गी लावला जाणार आहे, अशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.