लुटणार्‍यांना पुन्हा संधी नको ः मोदी

0
273

>> बिहारमध्ये पंतप्रधानांच्या तीन प्रचार सभा

बिहारला लुटणार्‍या लोकांना पुन्हा राज्यात संधी देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहार येथील जाहीर प्रचार सभांत केले. बिहारची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून पंतप्रधान मोदींनी काल पहिल्यांदा राज्यात सासाराम, गया आणि भागलपूर येथे तीन प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार देखील होते.
यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले की, बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार आले तर बिहारी नागरिकांना स्वामित्व कार्ड दिले जाईल. ही योजना बिहारमध्ये लागू होईल. मला नीतिश कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी ३ वर्षेच मिळाली आहेत. मात्र अनेक ठिकाणी मी तिप्पट कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, लवकरच सर्व तांत्रिक प्रशिक्षण मातृभाषेतूनन सुरू करणार असल्यामुळे दलित आदिवासी आणि गरीब विद्यार्थी देखील आता अभियंते बनू शकतील. तसेच दलित, आदिवासींसाठी पुढील दहा वर्षांसाठी आरक्षण वाढवण्यात आले आहे. सवर्ण समाजातील गरिबांना देखील १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवताना, देशाला कमजोर करणार्‍या लोकांच्या बाजूने हे लोक उभे राहत आहेत. यांच्यासाठी देशहीत नाही, तर दलालांचे हीत अधिक महत्त्वाचे आहे. हे लोक विकासाच्या आड येत आहेत. आम्ही दलालांच्या विरोधात काम करत असताना हे लोक दलालांच्या बाजूने उभे राहिले असल्याची टीका त्यांनी केली.