खासगी कंपनीच्या मदतीने संजीवनी कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव

0
267

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राज्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी एक नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला असून या प्रकल्पाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी भेट घेऊन संजीवनी साखर कारखान्याच्या विषयावर चर्चा केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍याच्या हितासाठी संजीवनी आगामी हंगामात सुरू करण्याची गरज आहे. हा कारखाना सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपनीची मदत घेऊन कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍याकडील ऊस कारखान्यात आणून दिल्यानंतर खासगी कंपनीकडून उसापासून साखर तयार केली जाणार आहे.

हा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी दोन तीन कंपन्यांशी चर्चा केली आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यास कारखान्यातील यंत्रणेची गरजेनुसार दुरुस्ती करावी लागेल. हा प्रस्ताव शेतकरी व सरकारच्या हिताचा आहे, असेही आमदार गावकर यांनी सांगितले. साखर कारखान्याच्या गैरव्यवस्थापनामुळे कारखाना नुकसानीत आलेला आहे. कारखान्याच्या योग्य नियोजनावर भर देण्याची गरज आहे. या खासगी प्रस्तावानुसार आगामी तीन ते चार वर्षात तोटा कमी होऊ शकतो. असे ते म्हणाले.