- प्रतिभा वासुदेव कारंजकर
स्त्री-शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून, जिथे तिची पूजा होते तिथे देवाचे अधिष्ठान असते हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. ज्या संस्कारांत आपण वाढलो ती संस्कृती, ते संस्कार जपले गेले पाहिजेत व तसे वागण्याची बुद्धी तिने सर्वांना दिली पाहिजे हीच तिच्याकडे प्रार्थना!
पावसाने आपले कार्य पूर्णत्वाला नेऊन काढतापाय घेतला की हिरवाईने नटलेल्या चराचराला ओढ लागते ती सणासुदीच्या दिवसांची. शिवारात शेत उभं असतं, बळीराजालाही उसंत असते. मग गणपतीपाठोपाठ येतो तो नवरात्रीचा सण. यंदा मधे अधिक मासाचे आगमन झाल्याने नवरात्र थोडे उशिरा आले. नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी म्हणजे साक्षात स्त्री-शक्ती. नवरात्रीत केली जाणारी नवदुर्गेची पूजा ही एका दृष्टीने स्त्रीचीच पूजा. कारण देवी जशी स्त्री आहे तशी ती माता, भगिनी, पुत्री, पत्नी, सखी ही सारी नाती निभावून नेणार्या स्त्रीचेच प्रतीक. या देवी स्वरूपाची पूजा केली की आपोआपच देवतांचे सान्निध्य प्राप्त होते. स्त्रीच्या अंगी या भूमातेसारखीच नवनिर्मितीची शक्ती आहे. नवरात्रीत घट बसवून मातीतून नवधान्य पेरून ते उगवले जाते. या भूमातेची पूजा म्हणजे जी आपले भरण-पोषण करते त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक तिला मान देण्याचा एक अवसर असतो.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. देवीच्या शक्तीरूपाची पूजा बांधली जाते. महाराष्ट्रात घराघरांत घट स्थापना केली जाते, तर गोव्यात फक्त देवळात घट बसवले जातात. काही लोक नऊ दिवसांचा उपवास करतात, तर कुणी उठता-बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपास करतात. नऊ दिवस सतत नंदादीप तेवत असतो. रोज मुली एकत्र येऊन घरोघरी जाऊन भोंडल्याची गाणी म्हणतात. हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणून मध्ये हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून फेर धरून गाणी म्हणतात. रोज नवी खिरापत खायला मिळते. गुजरातमध्ये गरबा, दांडिया खेळला जातो, तर बंगालमध्ये दुर्गापूजेचा जल्लोष असतो. चौकाचौकांत मांडव घालून सार्वजनिक स्वरूपात तिचे पूजन होते. कुणाकडे नऊ सवाष्ण तर कुणाकडे नऊ कुमारिकांना पुजलं जातं. नवव्या दिवशी होमहवन केलं जातं. गोव्यात दररोज मखरात बसलेल्या देवीची आरास बदलली जाते. दरदिवशीचे तिचे रूप वेगळे असते व ते पाहाण्यासारखे असते. कधी ती वाघावर आरूढ झालेली दुर्गा असते, कधी मोरावर बसलेली शारदा असते, तर कधी महिषासुर मर्दिनी असते. देवीच्या विविध रूपांची पूजा करून तिची आराधना केली जाते. कोल्हापूर-तुळजापूर अशा देवीच्या देवळांतून घागरी फुंकल्या जातात. काही स्त्रियांच्या अंगात देवीचा संचार होतो. काही स्त्रिया जोगवा मागताना दिसतात. एकूणच हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा सण आहे. नऊ देवींची रूपं जरी वेगवेगळी असली तरी दुर्गादेवीचीच ही रूपं आहेत. आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून या सणाकडे बघितले जाते. शैलपुत्री ते चंद्रघंटापर्यंतचा तिचा प्रवास हा बालपणापासून यौवनापर्यंत असतो. कुष्मांडा ते कात्यायनीचे रूप गर्भिणी आणि शिशुपालन करणारी माता आणि कालरात्री ते सिधीदात्रीपर्यंतच्या अवस्थेत ती रजोनिवृत्त प्रौढा असते. अशी ही देवीची स्वरूपे आपण स्त्रीतच पाहू शकतो. पहिली शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे. दुसरी ब्राह्मचारिणी तपाचे आचरण करणारी साध्वी आहे. तिसरी चंद्रघंटा कल्याणकारी अशी मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र धारण केलेली आहे. चौथी कुष्माण्डा आपल्या हास्यामुळे ब्रह्मांड निर्माण करणारी म्हणून कुष्माण्डा. पाचवी स्कंदमाता म्हणजे कार्तिकेयाची माता, कात्यायनी कात्य ऋषींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरी तिने जन्म घेतला म्हणून कात्यायनी. कालरात्री ही काळ्या रंगाची भयकारी रूपातली आहे, तर महागौरी शिवाच्या प्राप्तीसाठी कठोर व्रत करणारी गौरी आणि सिधीदात्री ही सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून सिधीदात्री हे नाव तिला सार्थ ठरते. आणखीही तिच्या रूपावरून पडलेली नवे आहेत उमा, गौरी, जगदंबा, भवानी, पार्वती ही सौम्य रूपाची नवे आहेत, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं आहेत.
स्त्रीच्या जीवनाशी जुळणारे प्रेमबंध कन्या, बहीण, पत्नी, आई अशा अनेक रूपांत ती आपल्या आजूबाजूला वावरत असते. ही सगळी रूपं आपल्याला देवीच्या रूपाशी साधर्म्य साधणारी वाटतात. देवीच्या रूपात संकट हरण करणं किंवा कल्याणकारी असणं हे गर्भित असतं तसं सामान्य जीवनात स्त्रीचंही कर्तव्य मानलं गेलंय.
देवीने महान पराक्रम गाजवून महिषासुर, धूम्रलोचन, चंडमुंड, रक्तबीज, शुंभ-निशुंभ या बलाढ्य राक्षसांचा वध केला तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला. देवीवर देवादिकांनी पुष्पवृष्टी केली. या तिच्या पराक्रमाचे नवरात्रीत पूजन केले जाते. सप्तशतीचा पाठ दररोज वाचला जातो, होमहवन केले जाते. या सप्तशतीमध्ये सातशे मंत्र आहेत. यात देवीची स्तुती व तिने दैत्यांना कसे मारले याचे वर्णन आहे. पहिल्या भागात पाशवीशक्तीवर बुद्धिशक्ती मात करू शकते हे सांगितलेय, तर दुसर्या भागात संघशक्तीचे महत्त्व वर्णले आहे. आपल्यातील सुप्तशक्ती जागृत केल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही हे पटवून दिले आहे. यात देवीने पुढे भविष्यात ज्या-ज्या वेळी राक्षस निर्माण होतील तेव्हा मी वेगवेगळ्या नावांनी अवतार घेऊन त्यांचा नाश करेन असे म्हटले आहे व हे तत्त्व प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्यातली सुप्त शक्ती स्त्रीला ओळखता आली पाहिजे. स्त्री ही दुर्बल नसून सबला आहे हे दाखवून दिले पाहिजे. आजकालच्या स्त्रीने देवीची ही रूपं नुसती मनात साठवून न ठेवता अन्याय, अत्याचार अशा गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी त्या स्त्रीशक्ती देवीसारखं बनलं पाहिजे. आत्मरक्षणासाठी, आपल्या पावित्र्यासाठी, समाजातल्या दैत्यांचा नायनाट करण्यासाठी तिच्याकडे शक्तीचं वरदान मागितलं पाहिजे.
महाराष्ट्र व गोव्यात जसा गणेशोत्सव साजरा केला जातो तशी बंगालमध्ये नवरात्रीची धूम असते. ठिकठिकाणी दुर्गामातेच्या भव्य मूर्ती स्थापण्यासाठी मोठमोठे मांडव घातले जातात. ही दुर्गामाता कालीमातेचे रूप असते. आधी कित्येक दिवसांपासून मूर्ती घडवण्याचं काम सुरू झालेलं असतं. मांडवाची रोषणाई, लायटिंग खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. पूर्वीच्या काळी राजे, जमीनदार, संस्थानिक आपल्या घरात अशा मूर्ती बसवायचे; पण नंतर त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. पंचमीला देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. तिच्यासोबत लक्ष्मी, सरस्वती, गणपती व कार्तिकेय यांच्याही मूर्ती बसवल्या जातात. दोन्ही वेळा आरती, पूजा केली जाते. आपल्याकडे दिवाळीला जसे एकमेकांना भेटी दिल्या जातात तशा त्यांच्याकडे दसर्याला भेटी देण्यासाठी जोरदार खरेदी केली जाते. साड्या, कपडे, मिठाई, फळफळावळ असे आपल्या ऐपतीप्रमाणे भेट म्हणून देण्याची पद्धत आहे. अष्टमीचा दिवस मुख्य असतो. त्या दिवशी होमहवन केले जाते. पूर्वी बळी द्यायची पद्धत होती; आता नाही. दसर्याला सर्व मूर्तींचे नदीत विसर्जन केले जाते. यावर्षी मात्र करोनाच्या पाश्वर्भूमीवर कुठलाही सार्वजनिक स्वरूपाचा उत्सव साजरा होणार नाही हे लक्षात घेता आपली आपण सुरक्षा घेतली पाहिजे.
गुजरातमध्ये दांडिया-गरबा खेळला जातो. नऊ दिवस रास-गरबाची धूम बघायला मिळते. देवळात किंवा एखाद्या ठिकाणी मांडवात देवीची स्थापना केली जाते. इथे ही दुर्गामाताच असते. पण गुजरातची देवी अंबा असते. नाच-गाण्याच्या निमित्ताने तरुण मुले-मुली एकत्र येतात, नातेवाईक भेटतात, एकत्रितपणे सणाचा आनंद लुटतात. एकत्र येणं, एकमेकांच्या सहवासात राहणं, संपर्कात असणं हे सुरक्षिततेची, एकीची भावना जोपासते, संस्कृती जोपासते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य होणार नसलं तरी घरात राहून जेवढी पूजाअर्चा करता येईल तेव्हढी करून त्या आदिशक्तीला या महामारीच्या संकटातून अखिल मानवजातीचं रक्षण कर असं साकडं घातलं पाहिजे.
कर्नाटकात मातीच्या घड्याची पूजा केली जाते. तिथे निसर्गाच्या माती या सृजनशील घटकाची पूजा केली जाते. तर म्हैसूर इथल्या राजवाड्याला पूर्णपणे लायटिंग करून सजवले जाते. उत्तर प्रदेशात रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला तो दिवस दसर्याचा होता म्हणून रावणाची मोठी प्रतिमा बनवून त्याला पेटवून देतात. त्या आधी नऊ दिवस ठिकठिकाणी रामलीलाचं आयोजन केलं जातं. रावण दहन म्हणजे वाईटाचा नायनाट करून म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून चांगल्यावर विजय मिळवणे होय. तर महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. देव्हारी मोठ्या परातीत किंवा दुरडीतल्या मातीत नऊ धान्ये पेरली जातात. मधोमध कलशाची स्थापना केली जाते व तसे घट नऊ दिवस मांडलेले ठेवतात. वरती माटोळीसारखी पण छोटी चौकट बांधून त्याला फळे बांधतात. त्यावर रोज तिळाच्या पिवळ्या फुलांची एक माळ सोडतात, त्यावरून आज कितवी माळ असं विचारलं जातं. सातव्या माळेला कडकण्या म्हणजे गोड, खार्या पुर्या बांधतात. जसे नवरात्र हे देवीचे असतात, तसे काही लोकांकडे तिरुपती बालाजीचे नवरात्र बसवायची पद्धत असते. देवळात जाऊन देवीची ओटी भरणे, सवाष्ण स्त्रीला जेवायला बोलवून तिला मान देणे म्हणजे एका अर्थाने स्त्री शक्तीचीच पूजा केल्यासारखे होते. दसर्याच्या दिवशी पेरलेल्या धान्यातून उगवलेली रोपे देवाच्या देवळात नेऊन वाहायची व संध्याकाळी आपट्याच्या पानांची एकमेकांना सोने म्हणून द्यायची पद्धत आहे. त्याला सीमोल्लंघन म्हणतात. त्यादिवशी मुहूर्त चांगला असल्याने पूजा, सोने खरेदी केली जाते. दसर्याला घरातल्या साधनसामग्रीची किंवा शस्त्रास्त्रां पूजा केली जाते. याच दिवशी राम विजयी होऊन परत आले म्हणून या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. दारी तोरणं लावून या सणाचे स्वागत केले जाते.
नवरात्रीतले नऊही दिवस देवीचे वेगवेगळे रूप बघायला मिळते व त्या प्रत्येक रूपातले तिचे वैशिष्ट्यही वेगवेगळे असते. ती सरस्वती असते तेव्हा शुभ्रज्योत्स्ना मयुरावर बसलेली विद्येची देवता असते, ती दुर्गा असते तेव्हा अष्टभुजा राक्षसाला मारणारी उग्र स्वरूप धारण केलेली असते, चंडिका ही महाकालीचे रूप घेऊन राक्षसांशी युद्ध करणारी रणरागिणी असते, कधी लक्ष्मी बनून धनाचे दान देते, कधी पार्वती शंकराची अर्धांगी असते, कधी दैत्यांचे निर्दालन करून समस्त प्रजेला, देवांना संरक्षण देणारी, संकटाचा नाश करणारी असते अशा प्रत्येक स्वरुपात ती पूजनीय असते म्हणूनच स्त्री-शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून तिची पूजा केली जाते.
या देवी सर्व भुतेषू बुद्धी रूपेण संस्थिता| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:|
नवरात्रीचा उत्सव हा खासकरून देवीचा उत्सव. आणि देवी म्हणजे साक्षात स्त्री-शक्ती. म्हणजे देवीची पूजा ही एका अर्थाने स्त्रीत्वाची पूूजा. देवी ही स्त्री आहे तशीच ती माता, भगिनी, पत्नी, पुत्री, सखी अशी सर्व नाती निभावून नेणार्या स्त्रीचं प्रतीक म्हणता येईल. स्त्रीच्या अंगी भूमातेसारखीच प्रजनन म्हणजे नवनिर्मितीची शक्ती असल्याने या काळात केली जाणारी भूमातेची पूजा ही पण मातृत्वाच्या शक्तीची पूजा म्हणता येईल. हेच शारदीय नवरात्र म्हणूनही साजरे केले जाते जी विद्येची देवता आहे.
नवरात्र म्हणजे प्रतिपदापासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. नवरात्रीत घट बसवून मातीतून नऊ प्रकारची धान्ये पेरून ती उगवली जातात. दररोज ‘उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो’ अशी नऊ दिवस तिच्या विविध रूपांची महती सांगणारी आरती केली जाते. देवीचे पूजन म्हणजे तिच्या वेगवेगळ्या अवतारांत तिने केलेल्या पराक्रमांची महती जाणून घेणे. पण हल्ली नऊ दिवस तिने नेसलेल्या रंगाच्या साड्या नेसून स्त्रिया नवरात्र साजरा करताना दिसतात. नऊ रंगात नेसलेल्या साड्या हे तर तिचं बाह्य रूप. त्याचे अनुकरण करण्यापेक्षा तिच्या शौर्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्त्रियांनी समाजात होणार्या अत्याचाराचा प्रतिकार केला पाहिजे. तिच्या अनेक रूपांचा विचार करताना देवी म्हणून तिची अर्चना करताना माणूस म्हणून तिच्यात व आपल्यात जे जे साम्य आहे ते विचारात घेतले पाहिजे. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात धनुष्यबाण, कमळ, सुदर्शनचक्र, त्रिशूळ, शंख अशी शस्त्रे असतात व एक हात तिने वर देण्यासाठी रिकामा ठेवलेला दिसतो. तसेच स्त्रीनेही अष्टवधानी राहिले पाहिजे. अर्थात हात दोनच असले तरी त्यांच्यात आठ बाहूंचं बळ एकवटावं लागतं. आपली प्रत्येक भूमिका पार पाडताना सजग राहावं लागतं. देवीच्या अष्टभुजांचा विचार करताना तिने आपल्या अष्ट अवधानांचा विचार केला पाहिजे.
देवीने महान पराक्रम गाजवून महिषासुर, धूम्रलोचन, चंड्मुंड, रक्तबीज, शुंभ, निशुंभ या बलाढ्य राक्षसांचा वध केला तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला. देवीवर देवांनी पुष्पवृष्टी केली. या तिच्या पराक्रमाचं पूजन केलं जातं.
गोव्यात दररोज मखरात बसलेल्या देवीची आरास बदलली जाते. दर दिवशीचे तिचे बदललेले रूप पाहण्यासारखे असते. कधी ती वाघावर आरुढ झालेली दुर्गा असते, कधी मोरावरची शारदा, तर कधी सिंहारूढ महिषासुराला मारणारी महिषासुर मर्दिनी असते. ही नऊ दिवसांतली रूपं वेगळी असली तरी ती दुर्गेचीच आहेत. आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून या सणाकडे बघितले जाते. शैलपुत्री ते चंद्रघंटापर्यंतचा तिचा प्रवास हा शिशू अवस्थेपासून यौवनापर्यंतचा असतो तर कुष्मांडा ते कात्यायनी ही रूपं गर्भिणी व शिशुपालन करणारी माता असा असतो, आणि कालत्रयी ते सिद्धीदात्री या अवस्थेत ती रजोनिवृत्तीतली प्रौढा असते. आणि तुलना करायची झाली तर ही सगळी रूपं आपण स्त्रीतच पाहू शकतो. मंदिरे पुन्हा उघडतील तर हे मंदिरातले सोहळे पाहायला मिळतीलही, पण त्यासाठी गर्दी करणे टाळले पाहिजे.
पहिली शैल पुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या, दुसरी ब्राह्मचारिणी तपाचे आचरण करणारी साध्वी, तिसरी चंद्र घंटा ही कल्याणकारी अशी मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र धारण करणारी, चौथी कुष्मांडा आपल्या हास्यातून ब्रह्मांण्ड निर्माण करणारी, पाचवी स्कंद माता ही कार्तिकेयाची माता, कात्यायनी ही कात्य ऋषींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरी जन्म घेतला म्हणून कात्यायनी. कालरात्री ही काळ्या रंगाची भयकारी रूपातली आहे तर महागौरी शिवाच्या प्राप्तीसाठी कठोर व्रत करणारी आणि सिद्धी दात्री ही सिद्धी प्राप्त करून देणारी. आणखीही तिच्या रूपावरून तिला नावे ठेवली आहेत.
नवरात्रीत सप्तशतीचे पारायण केले जाते. यात सातशे मंत्र आहेत. देवीची स्तुती व तिने राक्षसाना कसे मारले याचे वर्णन आहे. यात देवीने पुढे जेव्हा जेव्हा राक्षस निर्माण होतील तेव्हा तेव्हा मी वेगवेगळ्या रूपांत आणि वेगवेगळ्या नावांनी अवतार घेऊन त्यांचे निर्दालन करीन असे सांगितले आहे.
नऊ दिवस वेगवेगळी वैशिष्ट्ये, वेगळे रूपं घेऊन देवी रोज आपल्याला दर्शन देत असते. कुठल्याही रूपात ती पूजनीयच असते. म्हणूनच स्त्री-शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून, जिथे तिची पूजा होते तिथे देवाचे अधिष्ठान असते हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. ज्या संस्कारांत आपण वाढलो ती संस्कृती ते संस्कार जपले गेले पाहिजेत व तसे वागण्याची बुद्धी तिने सर्वांना दिली पाहिजे हीच तिच्या ठायी प्रार्थना. तरच आजकाल कानावर पडणार्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांना आळा बसेल. स्त्री खर्या अर्थाने सुरक्षित बनेल. स्त्री-शक्तीच्या अशा सर्व रूपांची जिथे पूजेची परंपरा आहे तिथेच तिची उपेक्षा होताना दिसते. तिच्यावर अत्याचार, बलात्कार होताना दिसतात. हे मनाला पटत नाही. आपल्या संस्कृतीत न बसणारे आहे. स्त्रीची देवी म्हणून पूजा करण्याची गरज नाही तर तिला एक माणूस म्हणून वागवलं गेलं तरी खूप आहे.