- सुधाकर रामचंद्र नाईक
भन्नाट वेगाबरोबरच दिशा आणि टप्प्यावर विलक्षण नियंत्रण असलेला नवदीप ‘स्लोवर वन’मध्येही माहीर असून ‘रिव्हर्स स्विंग’ तसेच ‘यॉर्कर’ आदी प्रभावी ब्रह्मास्त्रांमध्येही नैपुण्य साधल्यास भविष्यात भारतीय द्रुतगतीचा आधारस्तंभ बनू शकतो.
इंडियन प्रिमियर लीगचा झंझावात आखातात सुरू झाला असून पहिल्या टप्प्याअखेर विजेत्या ‘मुंबई इंडियन्स’, ‘दिल्ली कॅपिटल्स’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ या तीन संघांनी प्रत्येकी पाच विजयासह दहा गुण जमविले आहेत. ‘कोलकाता नाइटरायडर्स’ (८), ‘सनरायझर्स हैदराबाद’ (६), ‘राजस्थान रॉयल्स’ (६), ‘चेन्नई सुपर किंग्ज’ (४) आणि ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ (२) असा त्यानंतर क्रम आहे. देशांतर्गत ‘कोरोना महामारी’चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अबुधाबी, कुवेत आणि शारजा येथे विनाप्रेक्षक खेळविण्यात येत असलेल्या या प्रतियोगितेत देशी-विदेशी आंतरराष्ट्रीय स्टार क्रिकेटरांच्या साथीने भारतीय युवा दमाच्या खेळाडूंनीही आपला ठसा उमटविलेला आहे. ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चा कर्णधार के. एल. राहुल, त्याचा सलामीवीर साथी मयंक अगरवाल यांनी शतके झळकविली आहेत. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’चा सलामीवीर देवव्रत पडिक्कल, ‘मुंबई इंडियन्स’चा सूर्यकुमार यादव, ‘कोलकाता नाइटरायडर्स’चा शुभमन गिल, ‘राजस्थान रॉयल्स’चे राहुल तेवतिया, रियान पराग आदींनी आपापल्या संघांच्या विजयात योगदान देत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गोलंदाजीत द. आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा १७ बळींसह आघाडीवर, तर जसप्रित बुमराह ११ बळींसह दुसर्या क्रमावर आहे. कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई आदी युवा गोलंदाजांनीही आपली चुणूक दर्शविलेली आहे.
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’चा तेज गोलंदाज नवदीप सैनीने ‘मुंबई इंडियन्स’विरुद्धच्या ‘सुपर ओव्हर’मधील विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. पण आतापर्यंत सात सामन्यांत त्याला केवळ चार बळी घेण्यात यश आले आहे. गतवर्षी ‘इंडियन प्रिमियर लीग’मध्ये नवदीपने प्रभावी कामगिरीत ११ बळी घेतले होते. ‘आयपीएल’चा महत्त्वपूर्ण टप्पा आता सुरू झाला असून भारतीय तेज गोलंदाजीचे आशास्थान म्हणून पाहिला जाणारा सैनी आखातातील संथ खेळपट्ट्यांवर आपली गुणवत्ता निश्चितच सिद्ध करून कर्णधार वीराट कोहलीच्या विश्वासास पात्र ठरेल यात वाद नाही.
२३ नोव्हेंबर १९९२ रोजी हरयाना येथील कर्नाल जिल्ह्यातील तरावडी गावात जन्मलेल्या नवदीपचे वडील अमरजीतसिंग सैनी सरकारी कर्मचारी (ड्रायव्हर) होते. त्यांचे आजोबा करमसिंग हे स्वातंत्र्यसेनानी होते व सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचे सदस्य (ड्रायव्हर) होते. नवदीपची इंजिनिअर बनविण्याची पालकांची इच्छा होती; पण त्याला बालपणापासून क्रिकेटचे भारी वेड! वडील घरी नसले की अंगणात वा घरातही जागा मिळेल तेथे भावंडांसमवेत क्रिकेट खेळण्यात तो रमायचा. कर्नाल येथील दयालसिंग महाविद्यालयात शिकत असताना तर तो क्रिकेट मॅच खेळण्यासाठी क्लासेस चुकवायचा. एवढेच नव्हे तर ट्युशनला बंक मारून टेनिसबॉल क्रिकेट खेळायला जायचा. टेनिसबॉल क्रिकेट सामन्यात त्याला क्लसकडून रु. २५० ते ५०० पर्यंत मानधनही मिळायचे. त्यातून तो आपल्या क्रिकेट प्रशिक्षणाची फी भरायचा.
२०११ मधील हरियानातील कर्नाल प्रिमियर लीगमध्ये खेळताना दिल्लीचे माजी रणजीपटू तथा स्पर्धा संयोजक सुमित नरवाल यांनी त्याला पाहिले आणि त्याच्या गोलंदाजीवर प्रभावीत होऊन आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेेले. सुमित नरवाल यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभल्याने नवदीपला नवा आत्मविश्वास, नवी दिशा लाभली आणि त्याची गोलंदाजी बहरली.
दिल्लीमध्ये नेटसरावात माजी भारतीय कसोटीपटू तथा दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर याच्याशी त्याची भेट झाली. उमद्या नवदीपच्या गोलंदाजीवर खूष झालेल्या गौतमने त्याला मदत केली आणि चक्क ‘क्रिकेट शूज’ही दिले. एवढेच नव्हे तर नवदीपचा रणजी संघात समावेश करण्यासाठी गंभीरने दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा माजी कसोटीपटू चेतन चौहान यांच्याशीही हुज्जत घातली.
२०१३-१४ मधील रणजी मोसमात २१ वर्षीय सैनीने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली रणजी पदार्पण केले. भारतीय सलामीवीर वीरेेंद्र सेहवाग आणि द्रुतगती आशिष नेहरा यांचाही दिल्ली संघात समावेश होता. नवदीपने पहिल्याच सामन्यात आपला प्रभाव दर्शविताना १८ धावांत २ बळी घेतले. या प्रभावी कामगिरीनंतर सैनी दिल्ली रणजी संघाचा नियमित सदस्य बनला.
२०१७-१८ मधील मोसमात सैनीने प्रभावी गोलंदाजीत आठ सामन्यांत ३४ बळी घेत दिल्लीला रणजी अंतिम फेरीत नेले. २०१८-१९ मधील ‘विजय हजारे चषक’ स्पर्धेंतही त्याने १६ बळी घेतले अन् ‘देवधर चषक’ स्पर्धेत भारतीय ‘क’ संघात त्याची वर्णी लागली.
बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीगमध्ये २०१७ मधील मोसमात ‘दिल्ली डेअरडेविल्स’ने त्याला रु. १० लाखांच्या करारावर घेतले. २०१८ मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू’ने ३ कोटींच्या बोलीवर संघात राखले. आरसीबीतर्फे त्याने प्रभावी कामगिरी बजावीत कर्णधार वीराट कोहलीला आकर्षित केले. २०१९ मधील आयपीएलमध्ये द. आफ्रिकेच्या कॅगिसो रबादाने (१५४.२३) वेगवान गोलंदाजीची नोंद केली, तर त्यापाठोपाठ नवदीपने (१५२.८५) दुसरा क्रम मिळविला. या प्रतियोगितेतील दहा वेगवान गोलंदाजीत चार चेंडू नवदीपचे होते. आरसीबीतर्फे त्याने १५१.४ कि.मी. या भन्नाट वेगाने टाकलेला एक तेज उसळता चेंडू ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू शेन वॉटसनच्या हॅल्मेटवर आदळून तो यष्टिवर पडला होता.
आयपीएलमध्ये भन्नाट वेग, स्विंग आणि नियंत्रित गोलंदाजीवर भल्याभल्या देशी-विदेशी क्रिकेटपटूंना चकवीत आपला ठसा उमटविलेल्या नवदीप सैनीला जून २०१८ मधील अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मोहम्मद शामीच्या जागी भारतीय संघात निवडले, पण या कसोटीत खेळण्याची संधी मात्र त्याला मिळाली नाही. तथापि, नंतर इंग्लंड तसेच न्यूझिलंड दौर्यावरील भारतीय ‘अ’ संघातर्फे आपली गुणवत्ता, नैपुण्य प्रगटविण्याची त्याला संधी मिळाली.
२०१९ मधील विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात नवदीपला राखीव ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेटसरावातील गोलंदाजीसाठी इंग्लंडला जाण्याची त्याला संधी मिळाली. इंग्लंडमधील हवामानाचा अनुभव तसेच कर्णधार कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आदी नामवंत भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.
विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यात राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडीज ‘अ’ संघाविरुद्ध प्रभावी कामगिरी बजावलेल्या भारतीय युवा संघातील उभरत्या खेळाडूंना संधी दिली. मयंक अगरवाल, श्रेयश अय्यर यांच्यासह नवदीपलाही राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
३ ऑगस्ट २०१९ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात नवदीपने आपल्या पहिल्याच षटकात निकोलस पुरन आणि शिमरॉन हेटमायर या उमद्या युवा कॅरेबियन खेळाडूंना बाद केले आणि नंतर आपल्या चौथ्या व अखेरच्या निर्धाव षटकात अनुभवी किरॉन पोलार्डचा महत्त्वपूर्ण बळी घेत भारताच्या विजयात प्रमुख योगदान देत सामनावीर पुरस्कार मिळविला. डिसेंबरमध्ये कॅरेबियन संघ भारत दौर्यावर आला होता आणि यावेळी नवदीपने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. कसोटी संघात निवड होऊनही पदार्पणाची संधी अद्याप त्याला मिळालेली नाही.
टी-२० क्रिकेटमधील भारताचा ८० वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरलेल्या नवदीपने पदार्पणातील सामन्यात आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचा तसेच पदार्पणातील सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारा सहावा भारतीय बनण्याचा मान प्राप्त केला. आंतरराष्ट्रीय सामन्यात अखेरचे षटक निर्धाव टाकणारा तो पहिला गोलंदाज होय. २२ डिसेंबर रोजी नवदीपने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दिल्लीतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४३ सामन्यांत २८.३३ च्या सरासरीने १२० (सर्वोत्तम ७-७९) आणि ४० स्थानिक वन-डे सामन्यांत ४३ (सर्वोत्तम ५-४६) बळी घेतलेल्या नवदीपने ९ टी-२० सामन्यांत १३ तर पाच वन-डे सामन्यात तेवढेच बळी घेतले आहेत.
एकेकाळी फिरकीवर भारतीय गोलंदाजीची मदार असायची; पण गेल्या काही वर्षांत चित्र पालटलेले दिसत असून नव्या युवा दमाच्या तेज गोलंदाजांनी भारतीय संघाला स्वगृहीही यश मिळवून दिलेले आहे. जसप्रित बुमराह, भूवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा, उमेश यादव, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी अशा खंद्या तेज गोलंदाजांची फळी विद्यमान भारतीय संघात असून भारत ‘अ’ तसेच अंडर १९ संघात चमकलेले युवा खेळाडूही राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास सज्ज आहेत. भन्नाट वेगाबरोबरच दिशा आणि टप्प्यावर विलक्षण नियंत्रण असलेला नवदीप ‘स्लोवर वन’मध्येही माहीर असून ‘रिव्हर्स स्विंग’ तसेच ‘यॉर्कर’ आदी प्रभावी ब्रह्मास्त्रांमध्येही नैपुण्य साधल्यास भविष्यात भारतीय द्रुतगतीचा आधारस्तंभ बनू शकतो.