रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०%

0
270

>> कोरोनाने ६ मृत्यू, रविवारी १८७ बाधित

राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कित्येक महिन्यांनंतर २०० पेक्षा कमी आली असून चोवीस तासांत नवे १८७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना पॉझिटिव्ह आणखी ६ रुग्णांचे काल निधन झाले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ५४४ झाली आहे. तसेच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले असून ते ८९.६७ टक्के झाले आहे.
राज्यातील कोविड स्वॅबच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत १२४६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १८७ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ५८७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३६४८ एवढी आहे.

आणखी ६ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून दरदिवशी सरासरी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ५ कोरोना रुग्णांचा आणि मडगाव येथील ईएसआय इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सिंधुदुर्गातील एका ४८ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा समावेश आहे. कुठ्ठाळी येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्ण, कुडतरी येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्ण, पेडणे येथील ७५ वर्षाच्या पुरुष रुग्ण, सांगे येथील ५१ वर्षाच्या पुरुष रुग्ण, वास्को येथील ८० वर्षाच्या महिला रुग्ण रुग्णाचे निधन झाले आहे.

३६० रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३६० रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६,३९५ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६७ टक्के एवढे आहे. नवीन ११५ सौम्य कोरोना लक्षण असलेल्या रुग्णांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयझोलेशनखालील रुग्णांची संख्या २० हजार ०३१ एवढी झाली आहे. नवीन ५२ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पणजी परिसरात १९७ रुग्ण
पणजी परिसरात दरदिवशी नवे रुग्ण आढळून येत असून पणजीतील सध्याच्या रुग्णांची संख्या १९७ एवढी झाली आहे. उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक ३०५ रुग्ण आहेत. चिंबल येथे २५७ रुग्ण, म्हापसा येथे १९२ रुग्ण, साखळी येथे १७६ रुग्ण, कांदोळी येथे १४८ रुग्ण, खोर्ली येथे १२० रुग्ण, वाळपई येथे १०३ रुग्ण आहेत.