>> पाचही आरोपींना आठ दिवसांची कोठडी
तोर्डा-साल्वादोर दु मुंद येथील विलास मेथर यांच्या हत्याप्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आठ दिवसांचा रिमांड मिळाला आहे. या हत्याप्रकरणी शनिवारी तळेरे कणकवलीमधून श्रीकांत बडिगर (म्हापसा) आणि प्रशांत लक्ष्मण दाभोळकर (हणजूण) या दोन संशयितांना व बिल्डर अल्ताफ येरगट्टी यांना ताब्यात घेतले होते. शनिवारी उशिरा या प्रकरणातील साथीदार खैय्याद शेख (ताळगाव) व पाचवा आरोपी इक्बाल नानपुरी (म्हापसा) या दोघांना ताब्यात घेतले.
दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास विलास यांना तोर्डा पाट्यावर गाडी अडवून पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्वरित श्रीकांत बडिगर आणि प्रशांत लक्ष्मण दाभोळकर यांना फॉरचून (जीए ०३ वाय ०९९०) या कारमधून प्रवास करताना तळेरे कणकवली येथे ताब्यात घेतले.
तत्पूर्वी बिल्डर अल्ताफ, एक साथीदार खैय्याद शेख यास ताळगाव येथे जेरबंद करण्यात आले. तर पाचवा आरोपी इक्बाल नानपुरी (म्हापसा) याला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे अभिनंदन
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक एडविन कुलासो, निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येप्रकरणी गुप्तपणे तपास करून आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळविले असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली फॉरचून ही आलिशान कारची गोवा राज्यात नोंदणी झाली असून त्यासंबंधी विशेष चौकशी चालू आहे.