गडचिरोली येथील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.
सी ६०चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात चार महिलांसह एकूण सहा नक्षलवादी ठार झाले. उरलेल्या माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला.