सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करणार्या सहाव्या टोळीला गोव्यात काल जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. कळंगुट पोलिसांची ही चौथी कारवाई आहे, तर गुन्हा अन्वेषण विभागानेही अशा दोन प्रकरणांत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या सहाही प्रकरणांमध्ये पकडले गेलेले म्होरके परप्रांतीय आहेत आणि केवळ सट्टेबाजीचा आपला धंदा चालवण्यासाठी त्यांनी गोव्यात मुक्काम ठोकल्याचे दिसून आले आहे. गोव्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर ही सट्टेबाजी चालते याचे हे दर्शन अवाक करणारे आहे.
आयपीएलवरील सट्टेबाजी ही बाब खरे तर काही नवी नाही. ऑनलाइन विश्वामध्ये अशा प्रकारची सट्टेबाजी उघडउघड चालवणारी असंख्य संकेतस्थळे आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये तर मोबाईल ऍप्सही फोफावली आहेत. भारतामध्ये जुगार प्रतिबंधक कायद्याखाली जुगाराला बंदी असली तरी ऑनलाइन विश्वाला आजवर हे कायदे लागू होत नसत, कारण या सार्या संकेतस्थळांची सूत्रे विदेशांतून चालवली जातात. मात्र, भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा आणल्यापासून अशा प्रकारच्या अवैध गोष्टींवर नियंत्रण मिळविण्याचे आणि अशी संकेतस्थळे बंद पाडण्याचे अधिकार सरकारपाशी आले आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी ज्या प्रभावीपणे व्हायला हवी तेवढी होताना दिसत नाही. त्यामुळे गुगलवर नुसता ‘आयपीएल बेटिंग’ असा कीवर्ड टाकला तरी सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांच्या जगातील असंख्य ‘प्रतिष्ठित’ संकेतस्थळांची नामावली एका क्षणात समोर येते. आजही तेथे करोडोंच्या घरात सट्टा लावला जाताना दिसतो. मात्र, हे अशा प्रकारचे व्यवहार आपल्या गोव्यातून चालवले जात असतील याचा अंदाज मात्र तुम्हा – आम्हाला सोडाच, आपल्या पोलीस यंत्रणेलाही आजवर नव्हता हे धक्कादायक आहे.
आयपीएल सामन्यांना सुरूवात झाली २००८ साली. यंदाची ही तेरावी आयपीएल आहे. आयपीएलच्या जमान्यापूर्वीच भारतीय क्रिकेटवर सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचे वादळ घोंगावून गेले होते. आयपीएलचा जन्मच मुळात अशा प्रकारच्या सट्टेबाजीला चालना देणारा ठरला आहे, कारण पाच दिवशीय कसोटी सामने आणि आठ तास चालणारे एक दिवशीय क्रिकेट सामने यांच्या तुलनेत अवघ्या वीस षटकांचे आणि तीन तासांत आटोपणारे हे सामने म्हणजे सट्टेबाजांसाठी तर पर्वणीच आहे. त्यामुळे आयपीएलवर गेली अनेक वर्षे प्रचंड प्रमाणात सट्टेबाजी चालत आली आहे आणि कोणी सांगावे, त्यातून सामने आणि खेळाडू यांना ‘फिक्स’ करणारे ‘फिक्सर’ही कार्यरत असू शकतात. तहानभूक विसरून क्रिकेटमय झालेल्या कोट्यवधी भारतीय चाहत्यांशी ही घोर प्रतारणा आहे, कारण सट्टेबाजांकडून कोणकोणत्या गोष्टींचे फिक्सिंग झालेले असेल याचा अंदाजही सामान्य प्रेक्षक बांधू शकत नाही. यंदा ज्या यूएईमध्ये आयपीएल सामने अट्टाहासाने भरवले गेले आहेत, ती तर बेटिंगच्या जगाची पंढरीच आहे. कोरोनाचा कहर सर्वत्र असतानाही एवढ्या अट्टाहासाने आयपीएल सामने भरवण्याचे कारण काय असेल?
गोव्यामधून चाललेल्या सट्टेबाजीची ही कीड समूळ उपटून फेकण्याची आता वेळ आहे. यापैकी अनेक सट्टेबाज केवळ त्यासाठीच गोव्यात यायचे, त्यासाठीच गोव्यामध्ये त्यांनी सदनिका घेतलेल्या आहेत असे आढळून आलेले आहे. गेली किती वर्षे त्यांचे हे प्रकार चालू होते याच्या मुळाशी आता तपास यंत्रणांनी गेले पाहिजे. अशा गैरकृत्यांसाठी आजवर गोवा हा त्यांना सुरक्षित का बरे वाटत आला होता? कोणाचा आश्रय या मंडळींना यापूर्वी असायचा का? असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये उभे राहिले आहेत.
गोवा जुगार कायद्याखाली आता या सार्या मंडळींविरुद्ध कारवाई चालेल. हा कायदा १९७६ चा. त्यामध्ये २००३ मध्ये, २०१२ मध्ये ज्या सुधारणा झाल्या, त्यामागे जुगाराला प्रतिबंध करण्यापेक्षा सरकारी कृपादृष्टीखाली त्याला अधिकृतता देण्याचाच प्रयास अधिक दिसला. कॅसिनोंना वाव देण्यासाठी सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि ‘‘सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणांबाहेरील’’ जुगार तेवढा अवैध ठरवून टाकला. सरकारनेच रोवलेल्या विषवल्लीची आजची ही फळे आहेत. एकीकडे मटक्याला उघडउघड राजाश्रय मिळतो, कॅसिनोंसाठी सरकारकडूनच दार मोकळे केले जाते, मग सट्टेबाजांना गोव्यात यावेसे वाटले तर दोष त्यांना का द्यायचा? पकडल्या गेलेल्या सट्टेबाजांची सखोल चौकशी झाली, ते किती वर्षे गोव्यातून हा सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत आहेत त्याचा मुळातून तपास केला गेला आणि अशा गैरकृत्यांना कायमची जरब बसेल अशा प्रकारची कठोर कारवाई झाली, तरच सध्याच्या या छाप्यांना अर्थ असेल. अन्यथा एकाएकी सुरू झालेल्या या छापासत्रांबाबत प्रश्नचिन्हच मागे राहील