- सौ. नीता महाजन
हो, मी स्त्री आहे. मी स्वयंसिद्धा आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मला स्वयंसिद्ध बनण्यासाठी प्रेरित केलेल्या माझ्या आईस माझे कोटी कोटी प्रणाम. समस्त नारीशक्तीला माझे शतशः प्रणाम.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः|
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥
वरील श्लोकाचा अर्थ असा की ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते म्हणजेच तिचा सत्कार केला जातो, त्या घराचे भविष्य उज्ज्वल असते व जेथे असे घडत नाही तेथे सर्व विफल होते.
‘स्त्री’ ही आदिशक्तीचे रूप आहे. तीच प्रकृती आहे. आपल्या भारत देशाला स्त्रीशक्तीची उज्ज्वल अशी परंपरा लाभली आहे. आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत याचा खरंच खूप अभिमान वाटतो. अगदी पुरातन काळात आपल्या कर्तृत्वाने जगाला दीपवणार्या गार्गी व मैत्रेयी या दोन विदुषी पंडिता होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा व मंदोदरी या पंचकन्याही श्रेष्ठ मानल्या जातात. अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या या देशात आजही भोगवस्तू या नजरेनेच स्त्रीकडे पाहिले जाते याची मात्र खरेच खूप चीड येते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला नेहमी उपेक्षित, हीन, तुच्छ अबला नारी असाच दर्जा दिला गेला. तिच्याच उदरातून जन्माला आलेला हा पुरुष स्वतःला श्रेष्ठ मानू लागला. आजही काही ठिकाणी स्त्री ही फक्त ‘चूल व मूल’ सांभाळण्यासाठीच आहे. तिला व्यक्तिस्वातंत्र्य नाही. आजही तिच्या पायात अदृश्य बेड्या आहेत. ती स्वतंत्र नाही; बंधनात जखडलेली आहे हे चित्र बदलणे गरजेचे आहे. काही ठिकाणी अजूनही मुलगी जन्माला आली तर शोककळा पसरते. तिची भ्रूणहत्या केली जाते.
स्त्री मुळातच खूप सहनशील असते. तिच्याइतकी सहनशीलता पुरुषात नसते. ती चिवटही आहे व लवचीकही. जेवढी नाजूक तेवढीच कठोर आहे. जितकी भावनाशील तेवढीच उग्र. अन्याय सहन करण्याची तिच्याकडे अफाट शक्ती आहे. परंतु आज स्त्री संपूर्णतेकडे, स्वयंसिद्धतेकडे वाटचाल करीत आहे. सावित्रीची लेक शिकली आणि शिक्षणाच्या बळावर स्वतःला स्वयंसिद्ध बनवत आहे. शिक्षणामुळे लोकांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते हा विचार प्रसारित होऊ लागला. आज असे एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रीचा समावेश नाही. स्त्री आज विमान चालवते. मेट्रो ट्रेन चालवते. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. हे करत असताना तिला अनेकदा अन्यायाला सामोरे जावे लागते. परंतु ती मागे हटत नाही. खंबीरपणे उभी राहते. ती आज स्वयंसिद्धतेकडे वाटचाल करते आहे. स्वतःला सिद्ध करते आहे. तिला तिच्या शक्तीची जाणीव आहे. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. काही अपवाद वगळले तर आज स्त्रियांच्या यशस्वितेमागे पुरुषही खंबीरपणे उभे आहेत. तिची अनेक रूपे ती तन्मयतेने साकारते. ती आई आहे, भगिनी आहे, भार्या आहे, मैत्रीण आहे. कितीतरी नाती ती निभावत असते. तिच्याकडे एकाच वेळेला अनेक जबाबदार्या पार पाडण्याचे सामर्थ्य असते जिजाऊशिवाय ‘शिवबा’ घडलाच नसता, नाही का?
आज अशिक्षित स्त्रियासुद्धा काम करून, कष्ट करून छोटे-मोठे उद्योग करत, पापड-लोणची इ. खाद्यपदार्थ तयार करून स्वतःच्या पायांवर उभ्या राहू लागल्या आहेत. स्वतःच्या उज्ज्वल संसारासाठी हातभार लावत आहेत.
हो, मी स्त्री आहे. मी स्वयंसिद्धा आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मला स्वयंसिद्ध बनण्यासाठी प्रेरित केलेल्या माझ्या आईस माझे कोटी कोटी प्रणाम. समस्त नारीशक्तीला माझे शतशः प्रणाम.