दीनदयाळ योजनेखाली कोरोना रुग्णांवर उपचार

0
269

सरकारने दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेमध्ये दुरुस्ती करत त्यात कोरोना उपचारांचा समावेश केला आहे. यासंबंधीची अधिसूचना अवर सचिव (आरोग्य) स्वाती दळवी यांनी जारी केली आहे.
राज्य सरकारच्या दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेमध्ये कोरोना उपचारांचा समावेश नव्हता. त्यामुळे दीनदयाळ कार्डधारकांना कोरोना बाधेवर खासगी इस्पितळात उपचार घेण्यासाठी भरमसाठ शुल्क भरावे लागत होते. राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी खासगी इस्पितळासाठी निश्‍चित केलेले शुल्क सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यावर टीका झाल्यानंतर सरकारने कपात केलेले शुल्कही जास्तच असल्याने कोरोना उपचारांचा दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी केली जात होती.

उपचारांसाठी दोन पॅकेज
कोरोना उपचारासाठी दोन पॅकेज तयार करण्यात आल्या आहेत. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाला इस्पितळातील खाटेचे दरदिवशी शुल्क १२०० रुपये, तपासणीसाठी दरदिवशी ८०० रुपये, आधार उपचारासाठी दररोज २००० रुपये, डॉक्टर सल्ल्यासाठी दरदिवशी ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गंभीर लक्षणे असलेल्यांना खाटेचे दरदिवशी शुल्क १२०० रुपये, तपासणीसाठी दरदिवशी ८०० रुपये, आधार उपचारासाठी दररोज २००० रुपये, डॉक्टर सल्ल्यासाठी दरदिवशी ६०० रुपये आणि व्हेन्टीलेटर (०२) साठी दरदिवशी २००० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

१४ दिवसांपर्यत तरतूद
कोरोनाचे मध्यम लक्षण असल्यास इस्पितळात उपचारासाठी दरदिवशी एकूण ४६०० रुपये, कोरोनाचे गंभीर लक्षण असल्यास दरदिवशी एकूण ६६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षण असलेल्या रुग्णाला १४ दिवसांसाठी एकूण ६४,४०० रुपये आणि गंभीर लक्षण असलेल्या रुग्णाला १४ दिवसांसाठी एकूण ९२ हजार ४०० रुपयांची तरतूद केली आहे.