केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान (७४) यांचे दीर्घ आजाराने काल गुरुवार दि. ८ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पुत्र लोजपचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करून याची माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
बिहार येथील खगडिया या गावात १९४६ मध्ये जन्मलेले रामविलास पासवान १९६९ मध्ये विधानसभेेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केले होते.
पासवान पहिल्यांदा १९६९ मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशलिस्ट पक्षाकडून बिहारच्या विधानसभेत पोहोचले होते. १९७४मध्ये राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे खंदे अनुयायी म्हणून ते लोकदलाचे सरचिटणीस बनले. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची देशाच्या राजकारणात छाप राहिली.
मोदींकडून दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.