>> हवाई दल प्रमुख भदौरिया यांची ग्वाही
देशाच्या दोन्ही सीमांवर एकाचवेळी लढण्यास भारतीय हवाई दल समर्थ असून सर्व संबंधित विभागांमध्ये मजबूत तैनाती करण्यात आली आहे अशी ग्वाही हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी काल दिली. पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला गोळीबार व पूर्व लडाखमधील चीनशी उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. येत्या आठ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिन असून त्याच्या पूर्वतयारीसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना भदौरिया यांनी वरील ग्वाही दिली.
चीनचे हवाई दल भारतापेक्षा जास्त मजबूत नाही, परंतु तरीही शत्रूला कमी लेखण्यात येणार नाही असे भदौरिया म्हणाले. उभरत्या आव्हानांमुळे भारतीय हवाई दलाने आपल्या क्षमता वाढविल्या आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली. गरज भासल्यास चीनविरुद्ध हवाई हल्ले चढवण्यासही भारत सज्ज असल्याचे त्यांनी सूचित केले. पूर्व लडाखमध्ये बोलणी सुरू आहेत. त्यांची प्रगती संथ गतीने होत आहे, परंतु दोन्ही बाजूंनी इरादे नेक आहेत असेही ते उद्गारले.