- डॉ. सोमनाथ कोमरपंत
या प्रदीर्घ प्रवासानंतरही अजाणतेपणामुळे त्याच्या हातून प्रमाद घडतात. निसर्गाच्या प्रलयकारी शक्तीचा त्याला तडाखा बसतो. म्हणून काही माणसाची धडपड आणि तडफड थांबत नाही. या सत्यावर प्रकाश टाकणारी ही कविता.
जाति, झंपा
थांब खालीं उतर, परत जा परत जा!
क्षुद्र जीवा तुझा गर्व वायां ॥
मंत्रदर्शी मुनी आदरें मज नमुनी
सिद्ध झाले उषःसूक्त गाया
या हिमस्थण्डिलीं भानुकिरणावली
कांपते होत जड बधिर काया
वायु चढतां वरी गुदमरे अंतरीं
घसरुनि खालतीं धरित पायां
वरुण अभिषेक धरि, आरती वीज करि
माळ घाली गळां इंद्रराया
सागराधीश तो चळचळां कांपतो
खंडणी धाडितो तोषवाया
क्षुद्र तूं? मूढ तूं? ज्ञानदर्पांध तूं?
उतर जा! हट्ट कां धरिशीं वायां?
जाति-गिरिराय
कां आडविशी गिरिराया, रे
देह आमुचा जावो राहो, आलों तुज भेटाया
ज्ञानमहोदधि अफाट भरला उतरलोंत पोहाया
दुर्बल देहांतिल दुर्दम मन सिद्ध विश्व जिंकाया
अनंत अज्ञाता उकलाया अनंत आकांक्षा या
खुलें कुरण आम्हांस जगाचें परतविशी कां वायां?
जिकडे तिकडे ज्ञानरूप परमेश खुणवितो ‘‘या! या!’’
चढेल तोची पडेल, आम्ही सदा तयार मराया
सोड हिमास्त्रें खुशाल आतां, आलीं तुज गांठाया
‘महाराष्ट्र-रसवंती’च्या तिसर्या भागात विठ्ठलराव घाटे यांच्या ‘गौरीशंकर आणि मानव’ या कवितेचा चिंतनपर कवितांमध्ये समावेश केलेला आहे. वि. द. घाटे हे कवी दत्त यांचे पुत्र. कवी दत्त यांचे अकाली निधन झाल्यावर त्यांच्या कवितांचे वि. द. घाटे यांनीच संपादन केले. काव्यनिर्मितीचा वारसा त्यांना वडिलांकडून प्राप्त झाला होता. शिक्षणाच्या निमित्ताने त्यांना अनेक ठिकाणी भ्रमंती करावी लागली. त्यातील त्यांचे बडोद्याचे वास्तव्य काव्यसंस्कारांच्या दृष्टीने महत्त्वाचे. कवी दत्तांचे निकटचे स्नेही राजकवी चंद्रशेखर आणि स्नेही माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांच्या सहवासात तारुण्यसुलभ वयात त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण इंदूरच्या होळकर कॉलेजमध्ये झाले होते. तेथे त्यांच्या मनात साहित्य- संस्कृती- इतिहासविषयक प्रेम रुजले. कवित्वशक्ती रुजायला बालपणीचा संस्कार महत्त्वपूर्ण असतो. विठ्ठलरावांच्या लहानपणी आजोबांच्या नगरच्या वाड्यात प्रार्थनासमाजाची मंडळी येत असे. त्यावेळी अनेक व्यक्तींचा आणि त्यांच्या विचारांचा संस्कार त्यांच्यावर झाला.
पुण्याला आल्यावर ‘रविकिरणमंडळा’च्या संपर्कात ते आले. त्याचे सदस्य झाले. येथे त्यांची कविता बहरास आली. काव्यचर्चेचे ते मंतरलेले दिवस होते. त्यांच्या आणि माधव जूलियन यांच्या कवितांचा संग्रह ‘मधु-माधव’ या नावाने ‘रविकिरणमंडळा’ने प्रसिद्ध केला. १९२९-३० या काळात लंडनला जाऊन ते टी.डी. होऊन परतले. त्यांचे कार्यक्षेत्र बदलले. ‘नवयुग वाचनमाले’च्या संपादनकार्यातही ते सहभागी झाले. त्यांच्या काव्यनिर्मितीत मात्र पुढे सातत्य राहिले नाही. पण मराठी साहित्यक्षेत्रात उत्तम व्यक्तिचित्रे लिहिणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी आपली संवेदनशीलता आयुष्याच्या उत्तरायणापर्यंत ताजी टवटवीत ठेवली. याच वृत्तीमुळे चिंतनशीलता, काव्यात्मकता आणि तरलता यांचा गुणसंगम असलेले ललितनिबंधलेखन त्यांनी केले. ते प्रसन्न आणि चिररूचिर स्वरूपाचे आहे. समांतरपणे अंतर्मुखही करणारे आहे. ‘नाना देशांतील नाना लोक’ हे त्यांचे भिन्नभिन्न संस्कृतीच्या लोकांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणारे पुस्तक. अध्यापनशास्त्रात त्यांनी अधिकाधिक लक्ष घातले. त्यांचे ‘इतिहास ः शास्त्र आणि कला’ हे शालेय शिक्षकांसाठी लिहिलेले पुस्तक उपयुक्त आहे. ‘दिवस असे होते’ हे त्यांचे आत्मचरित्र जगलेले समृद्ध जीवन स्मरणोज्जीवित करणारे आहे.
असे संपन्न जीवन जगलेल्या व्यक्तिमत्त्वातून साकार झालेली ‘गौरीशंकर आणि मानव’ ही कविता. संस्कृतिविकासाच्या या अखंडित प्रक्रियेत मानव निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करीत आलेला आहे. बर्याच अंशी त्याला यश आलेले आहे. पण निसर्गाकडे असलेल्या अमर्याद आणि प्रमाथी शक्तीची अजूनही त्याला जाणीव झालेली नाही. या प्रदीर्घ प्रवासानंतरही अजाणतेपणामुळे त्याच्या हातून प्रमाद घडतात. निसर्गाच्या प्रलयकारी शक्तीचा त्याला तडाखा बसतो. म्हणून काही माणसाची धडपड आणि तडफड थांबत नाही. या सत्यावर प्रकाश टाकणारी ही कविता.
गौरीशंकर हे हिमालयातील अत्युच्च शिखर. ‘कुमारसंभव’ या महाकाव्यात कालिदासाने सृष्टिकर्त्याने पृथ्वीची लांबी मोजण्यासाठी मानदंड म्हणून हिमालयाची योजना केलेली आहे असे प्रारंभीच म्हटले आहे. भारताच्या चतुःसीमांचे उत्तरेकडून संरक्षण करणारी ही अजस्र भिंत असे त्याला मानण्यात येते. सिंधू, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा यांची उगमस्थाने याच उत्तुंग पर्वतप्रदेशातली. अनेक तीर्थक्षेत्रे याच्याच अंगप्रत्यंगावर आहेत. हिमालय आणि मानव यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण विजिगीषू मानवाचे पाऊल मागे हटत नाही. असा हा संघर्ष आहे. कवितेच्या पूर्वार्धात गौरीशंकर शिखराचे मानवाला आव्हान आहे आणि उत्तरार्धात मानवाने त्याला दिलेले आपले निर्धारयुक्त उत्तर आहे. पण या संवादाच्या सरलार्थात कविता संपत नाही. ती आपल्या कंपनांमधून अनेक अर्थवलये निर्माण करते. मानवी इतिहासाचे यशापयश, पाऊलखुणांचा शोध घेण्याची प्रेरणा येथे निर्माण होते. अंतर्मुखता हे या कवितेचे बलस्थान आहे.
गौरीशंकर उद्गारतो ः
हे मानवा! थांब, खाली उतर. येथूनच परत फिर. क्षुद्र जीवा! तुझा अहंकार वृथा ठरणार आहे. आजवर मंत्रदर्शी मुनिजन अत्यंत आदरभावाने आणि नम्रतापूर्वक उषःसूक्त गायला सिद्ध झालेले आहेत. या हिमरूपी यज्ञकुंडावर प्रखर सूर्यकिरणांची मालिकादेखील कंपित झालेली आहे. त्याची काया जड अन् बधीर झालेली आहे. वायू येथे आरोहण करताना अंतर्यामी गुदमरत आहे. तो घसरून खाली पडतो. स्वतःच्या पायांचा आधार घेतो. वरूण वरून अभिषेक करतो. वीज आरती ओवाळते. देवाधिराज इंद्र गळ्यात माळ घालतो. महासागरदेखील चळचळा कापतो. मला संतुष्ट ठेवण्यासाठी तत्परतेने खंडणी पाठवून देतो.
येथे निसर्गविभ्रमांचा कल्पनाविलास जो कवीने प्रकट केला आहे तो सृष्टीतील वस्तुजातावर आधारलेला आहे. निसर्गाचे मानुषीकरण करण्यात येथे कवी यशस्वी झालेला आहे.
कवितेच्या उत्तरार्धात मानव गौरीशंकराला उद्देशून उत्तर देतो ः
हे गिरिराया, का बरे मला अडवतोस? मी ज्ञानपिपासू आहे. मला तुझ्याविषयी प्रचंड कुतूहल आहे. म्हणूनच देह जावो अथवा राहो या अभंग जिद्दीने तुला भेटायला येथवर आलो आहे. तुझ्यात ज्ञानमहोदधी उदंड भरलेला आहे. त्यात मला अवगाहन करायचे आहे. माझे शरीर दुर्बल असेल; पण मन मात्र दुर्दम्य शक्तीने भारलेले आहे. म्हणूनच मी विश्व जिंकण्यासाठी सिद्ध झालेलो आहे. माझ्या अनंत आकांक्षा या अनंत अज्ञाताला उकलायला सिद्ध झालेल्या आहेत. आम्हाला (मानवजातीला) जगाचे कुरण खुले आहे. असे असताना आम्हाला वृथा का बरे परतवून लावतोस?
जिकडे तिकडे ज्ञानरूपी परमेश्वर आम्हाला स्वागतशील वृत्तीने खुणावतो ः ‘‘या! या!’’
‘‘चढणारा आहे तो पडणारच आहे. आम्ही सदैव मरायलाच सज्ज आहोत. तुझी हिमास्रे आता खुशाल सोड. तुला गाठण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत.’’
या कवितेतून माणसाची गिर्यारोहणामागची मनोभूमिकाही कवीने समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या धाडसी मनोवृत्तीचे हे निदर्शक आहे.